Agriculture ` Agrowon
ॲग्रो विशेष

Watershed Management: संसाधने अन् जैवविविधता संवर्धनावर भर हवा

Agrobiodiversity: पाणलोटाच्या माध्यमातून अन्नधान्य, जलसंसाधने आणि जैवविविधतेच्या संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भारतामध्ये २२ कृषी जैवविविधता क्षेत्रे निश्‍चित केली असून, तिथे स्थानिक जैवविविधतेला अनुरूप शेती करण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकार प्रयत्न करीत आहे.

Team Agrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Indian Agriculture: जगातील जैवविविधतेने नटलेल्या १७ राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश होतो. जगातील एकूण जैवविविधतेने नटलेल्या राष्ट्रांपैकी ८ टक्के जैविक संसाधने ही भारताला लाभली आहेत. जगातील एकूण ३४ जैवविविधतेने समृद्ध अशा ठिकाणांमध्ये (हॉटस्पॉट) भारतातील पूर्व -पश्‍चिम हिमालय, पश्‍चिम घाट, इंडोबर्मा, सुंदालँड या चार ठिकाणांचा समावेश होतो. कृषिप्रधान अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतामध्ये शेती क्षेत्रातील जैवविविधतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

मात्र या क्षेत्राशी निगडित संशोधनांमध्ये ‘जैवविविधतेचे महत्त्व’ खूपच कमी प्रमाणात अधोरेखित झाले असल्याचे लिऊ (२०१५) आणि वर्गास (२०२३) या शास्त्रज्ञांचे मत आहे. भारतासारख्या देशांमध्ये वेगाने वाढलेली लोकसंख्या आणि वातावरणातील बदल यामुळे जलसंसाधनांच्या शाश्‍वत वापराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असल्याचे गोसेन (२०११) या शास्त्रज्ञाने म्हटले आहे. अन्न, जल व जैवविविधता यांचा परस्पर सहसंबंध गुंतागुंतीचे आहेत.

जागतिक अन्नधान्य निर्मितीमध्ये भारताचा मोठा वाटा असून, त्यात पर्जन्याधारीत कडधान्य, तृणधान्य, तेलबिया आणि आणि एकदल पिकांचा बोलबाला दिसून येतो. उदा. ज्वारी, बाजरी, नागली, रागी इ. इत्यादी पिकांचा बोलबाला आजही पर्जन्याधारित क्षेत्रांमध्ये दिसून येतो. मात्र पडणाऱ्या पावसावर ‘ला निना’ आणि ‘एल निनो’ या दोन्ही पर्यावरणीय प्रक्रियांमुळे परिणाम होतो. पावसाच्या पाण्याची उपलब्धतेमध्ये विविध कारणांमुळे अशाश्‍वतता निर्माण होते. त्याचा फटका पर्जन्याधारीत पिकांना बसतो.

तो कमी करण्यासाठी सिंचन व्यवस्थेच्या निर्मितीसाठी करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या मर्यादांमुळे सिंचनासाठी भूजल साठ्यांवरील अवलंबित्व वाढत आहे. भारतामध्ये ८९% भूजलसाठे हे सिंचनासाठी वापरले जात असल्याचे जैन (२०१९) सांगतात. जागतिक बँकेच्या २०१२ च्या अहवालात, भारतामध्ये वाढते शेती क्षेत्र आणि त्याच्या सिंचनासाठी होत असलेल्या भूजल उपशामुळे जलटंचाईचे चित्र निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे. भूजलाच्या वाढत्या वापरामुळे भारत हा देश जगातील जलटंचाईचा केंद्र बिंदू बनेल, असा अंदाज गॉसलिंग व अर्नेल (२०१६) हे शास्त्रज्ञांनी मांडला आहे. विविध पद्धतीने वाढत असलेल्या सिंचन व्यवस्थेमुळे पूर्वी कोरडवाहू क्षेत्रामध्ये जपली गेलेली कृषी जैवविविधता वेगाने कमी होत आहे.

शेती क्षेत्रामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीतून पावसाच्या पाण्यासोबत निचरा होऊन विशेषतः फॉस्फेट्स आणि नायट्रेट्स ही मूलद्रव्ये भारतीय जलाशयांमध्ये वाढत गेली आहेत. (कुमार, २०२१). रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे पाण्याचे गुणधर्म बदलल्याचे भूतिंग (२०१५) नमूद करतात. असेच निष्कर्ष पश्‍चिम घाटामध्ये वाहणाऱ्या नद्यांमधील परिसंस्था व पर्यायाने जैवविविधता धोक्यात येत असल्याचा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्था (IUCN) ही जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने २०११ च्या अहवालामध्ये नमूद केले आहेत.

शहरी लोकवस्तीचे व औद्योगिक वसाहतींतून निघणारे सांडपाणी विनाप्रक्रिया नद्यांमध्ये सोडले जाते. उदा. मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी या नदीकाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे व त्यांच्या औद्योगिक वसाहती वसलेल्या आहेत. तिथून बाहेर पडणारे सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते. हेच पाणी पुढे उजनी धरणात साठते. या उजनीच्या पाण्यावर पुढील असंख्य गावे पिण्याचे पाणी, सिंचनासाठी अवलंबून आहेत.

जलसाठ्यामध्ये मिसळलेल्या सांडपाण्यामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होऊन गोड्या पाण्यातील जलचरांचे नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधता यावर विपरीत परिणाम झाल्याचे दूधगेव (२०००), अमरसिंगे (२०१३), कुमार (२०२२) या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या अभ्यासात नमूद केले आहे. पाण्याच्या बिघडलेल्या गुणवत्तेचा परिणाम मानवाच्या सामाजिक, परिस्थितिकीय, आर्थिक परिस्थितीवरही होत असल्याचे उदमले (२०१४) मांडतात.

अशाच प्रकारे यमुना नदीच्या बिघडलेल्या पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास जोशी (२०१६) यांनी केला होता. त्यांच्या मते यमुना नदीच्या खोऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनासाठी व औद्योगिक वसाहतींसाठी पाण्याचा उपसा होतो. त्याचे सांडपाणी तयार होऊन पुन्हा नदीमध्ये मिसळले जाते. पाण्याची गुणवत्ता घसरून गोड्या पाण्यातील जैवविविधता विशेषतः माशांच्या प्रजाती, वनस्पती व प्राणी प्लवके यांच्यावर गंभीर परिणाम झाला आहे. लाकरा (२०११) या शास्त्रज्ञाने १९७० ते २००३ या कालखंडामध्ये ३० टक्के माशांच्या प्रजाती केवळ सिंचनामुळे नष्ट झाल्याचे नमूद केले आहे.

भारताच्या राष्ट्रीय जलधोरणानुसार, शेतीसाठी जलसंसाधनांचा वाटा निश्चित केला जातो. त्याच पद्धतीने जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी पाण्याचा वाटा आरक्षित केला जातो, मात्र घटत्या जलसंसाधनांमुळे जैवविविधतेचा होणारा ऱ्हास कुठेही अधोरेखित केला जात नसल्याचे राष्ट्रीय धोरण २०१२ मध्ये म्हटले आहे. यात प्रवाही परिसंस्थेचे महत्त्व गेल्या काही लेखामध्ये पाहिले आहे. सिंचन व्यवस्थेसाठी नद्यांचे प्रवाह अडवून मोठ्या धरणांची निर्मिती करून त्या माध्यमातून शेती क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती करण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे.

याचे चांगले, वाईट असे दोन्ही परिणाम नैसर्गिक परिसंस्थांवर दिसून येतात. धरणांच्या माध्यमातून तयार झालेल्या जलसाठ्यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी शक्य होते, मात्र बदललेल्या पर्यावरणीय व्यवस्थेमुळे मासे, कार्पस, कॅटफिश, ओडोनेट या प्रवर्गातील अनेक प्रजाती प्रभावित होत असल्याचे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेने त्यांच्या भारतातील पश्‍चिम घाटातील नद्यांसंदर्भातील संशोधनामध्ये मांडले आहे.

दुष्काळ, शेती आणि जैवविविधता

नंदकिशोर व सुश्रुत जाधव (२०२१) या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, भारतामध्ये १९९५ ते २०१८ या कालखंडामध्ये चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ‘डाउन टू अर्थ’ व राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग २०२३ यांच्या माहिती नुसार सन २०२१ मध्ये १०,२८१ शेतकऱ्यांनी, तर २०२२ या वर्षांमध्ये ११,२९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील कारणांमध्ये दुष्काळ (पाणीटंचाई), वातावरणीय बदल, पीककर्ज, वाढत्या खर्चाच्या तुलनेत न मिळालेले उत्पन्न यांचा समावेश होतो.

भारतामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण १९८० च्या दशकानंतर वाढत गेले आहे. हाच कालखंड शेतीमध्ये स्थानिक बी - बियाण्यांच्या प्रजातींना फाटा देऊन संकरित व अधिक उत्पादनक्षम बियाणांच्या स्वीकाराचाही आहे. देणाऱ्या बी बियाण्यांना स्वीकारण्याचा कालखंड आहे. शेती क्षेत्रातील या बदललेल्या व्यवस्थेमुळे हजारो वर्षे जपलेल्या स्थानिक वाणांचा ऱ्हास जेमतेम तीन ते चार दशकांमध्ये घडून आला आहे. याबाबत कोणतीही चर्चा शासकीय किंवा धोरण पातळीवर दिसत नाही.

आजही राज्यामध्ये मराठवाडा, खानदेश, विदर्भ या ठिकाणी जलसंधारणाच्या कार्यक्रमांची आखणी केली जात असली तरी त्यामागील उद्देश केवल जलस्रोतांचा विकास आणि शेती उत्पादकता या दोनच मुद्द्याभोवती घुटमळताना दिसते. त्यात स्थानिक कृषी जैवविविधता जपण्याचा उल्लेख दिसत नाही. मोठा गाजावाजा करत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले गेले. पण त्याच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम राबविल्याचे दिसत नाही. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये दुष्काळामुळे सजीवांची जैवविविधता विशेषतः गोड्या पाण्यातील जैवविविधता झपाट्याने कमी झाल्याचे मिश्रा (२०२२) मांडतात.

वाढत्या शेती क्षेत्रामुळे जैवविविधतेसाठी आवश्यक असणारे नैसर्गिक अधिवास नामशेष होणाऱ्या देशांमध्ये भारताचा वरचा क्रमांक लागतो. अशा बिघडलेल्या नैसर्गिक अधिवासांवर आधारित साधन संपत्तीवर देशातील १५० दशलक्ष लोकांचे जीवनमान अवलंबून असल्याचे बावा (२०२२) हे शास्त्रज्ञाने नमूद करतात.

काही अभ्यासानुसार या शेती क्षेत्रातून वाहून जाणाऱ्या प्रवाहाबरोबर नैसर्गिक पाण्याचे रासायनिक गुणधर्म, सामू, विद्राव्य ऑक्सिजन व खते व कीटकनाशकांमधील रसायन यामुळे माशांच्या प्रजातींवरती गंभीर परिणाम झाल्याचे जोशी (२०१६) यांचा अभ्यास सांगतो. याशिवाय नद्या जोड प्रकल्प (आंतर व बाह्य खोऱ्यातील पाणी वळविणे), कालव्यांची निर्मिती इ.मुळेदेखील प्रवाही पाण्यातील परिसंस्था प्रामुख्याने माशांच्या प्रजाती धोक्यात आल्याचे लाकरा (२०११), बंटीग (२०१५), ग्रँट (२०१५) या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

नैसर्गिक अधिवासांतील बिघाडाचे विपरीत परिणाम...

देशामधील मोठ्या प्रकल्पांसाठी होणारी वनतोड, अतिपर्यटन आणि परदेशी प्रजातींच्या लागवडी यामुळे देखील नैसर्गिक अधिवासांमध्ये मोठा बिघाड होत आहे. त्याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे...

गरवाल या हिमालयीन गवताळ प्रदेशामध्ये पिग्मी हॉग (Pygmy Hog) यासारखी जगातील सर्वांत छोट्या आकाराची व कमाल ८ किलोपर्यंत वाढणारी डुकराची प्रजाती धोक्यात आली आहे. ही डुकरे गवताळ प्रदेशाशिवाय राहू शकत नाहीत. निसर्ग साखळीमध्ये प्रत्येक जीव अनमोल आहे, हे मानवाला कधी कळणार?

अशाच प्रकारे पुण्याजवळच्या सिंहगड किल्ल्यावरील ‘कोंढाणा उंदीर’ (Kondhana Rat) ही प्रजात तेथील वाढत्या पर्यटन आणि मानवी हस्तक्षेपामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही उंदीर प्रजात प्रदेशनिष्ठ असून, ती निसर्गातून नामशेष झाल्यास तिचे अन्यत्र पुनर्स्थापना शक्य होत नाही.

गंगा नदीतील गोड्या पाण्यातील डॉल्फिनचे संवर्धनावर थोडे काम झाल्यामुळे आता कुठे त्यांची संख्या ६००० च्या आसपास स्थिरावली आहे. गंगा व सिंधू नद्यांची खोरी वगळता जगामध्ये फार कमी ठिकाणी गोड्या पाण्यातील डॉल्फिन आढळतात. निसर्गाची ही खूप मोठी देण आहे.

- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे) - डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT