Sitaphal Orchard Management :
शेतकरी नियोजन : सीताफळ
शेतकरी : सुजित सीताराम झेंडे
गाव : दिवे, ता पुरंदर, पुणे
एकूण क्षेत्र : नऊ एकर
सीताफळ : पाच एकर
दिवे शिवारात सुजित झेंडे यांची साडे नऊ एकर शेती असून, त्यातील पाच एकरांमध्ये सीताफळ, दोन एकरांवर पेरू लागवड आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये वाटाणा, कांदा व इतर भाजीपाला पिके घेतले जातात. आम्ही सीताफळाची दहा ते बारा वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने लागवड केली आहे. दरवर्षी एप्रिल -मे महिन्यांत सीताफळ झाडांची छाटणी करून घेतो. छाटणी करतेवेळी झाडांच्या मर फांद्या, जुनी वाळलेली फळे काढून टाकतो.
त्यानंतर बुरशीनाशकाची एक फवारणी घेतली जाते. झाडाच्या खोडापासून काही अंतर सोडून शेणखत, निंबोळी पेंड ही सेंद्रिय खते देतो. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी दिले जाते. सीताफळाला पालवी व कळी निघाल्यानंतर अधिक काळजी घ्यावी लागते. कळीवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करतो.
त्यानंतर हळूहळू फळधारणा होते. फळधारणेनंतर फळावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यातून फळे काळी पडतात. त्यासाठी आवश्यक त्या कीडनाशकांच्या फवारणीचे नियोजन केले जाते. साधारणतः सप्टेंबर महिन्यापासून फळे विक्रीयोग्य होतात. ताजी फळे तोडून सासवड बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात.
सेंद्रिय खतांचा वापर :
दरवर्षी फळबागेला दरवर्षी बहर धरण्याच्या एक महिना आधी प्रति झाड तीन ते चार किलो चांगले कुजलेले शेणखत हे टाकतो. त्यामुळे फळाची प्रत सुधारून दर्जा व रंग चांगला येण्यास मदत होते. साधारणपणे एका झाडाला तीन ते चार किलो लेंडीखत टाकले जाते. मात्र लेंडी खत नसेल तर शेणखताचे प्रमाण वाढवतो.
वेळेवर काढणी :
फळे पक्व झाल्यानंतर व मोठ्या आकाराची झाल्यानंतर फळाची तोडणी केली जाते. बहार धरल्यानंतर साधारणपणे चार ते पाच महिन्यात फळ काढणीला येते. त्यातच बाजारभावाचीही माहिती घेऊन फळे काढणीचे योग्य केले जाते. काढणी केल्यानंतर आकारानुसार प्रतवारी केली जाते. त्यामुळे चांगला दर मिळू शकतो.
सासवड, पुणे मार्केटमध्ये विक्री :
हंगामात फळांच्या काढणी, प्रतवारी यासाठी मजुरांची मदत घेतली जाते. कॅरेटमध्ये भरून फळे सासवड किंवा पुणे बाजार समितीत विक्रीसाठी पाठवली जाते. हंगामात रोज १५ ते २५ कॅरेट विक्रीसाठी जातात. एका कॅरेटमध्ये साधारणपणे १८ ते २० किलो माल बसतो. मार्केटमध्ये किलोवर किरकोळ ग्राहकांना किंवा नियमित व्यापाऱ्यांना कॅरेटवर विक्री करतो.
उत्पन्न :
सीताफळाचे एकरी पाच ते सहा टन उत्पादन मिळते. दर प्रति किलो दहा ते १५० रुपयांपर्यंत राहतो. हंगामाची सरासरी काढल्यास ती साधारणपणे ७० रुपयांपर्यंत दर मिळतो. त्यानुसार एकरी दोन ते सव्वादोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती येते. सीताफळ हे काटक झाड असल्यामुळे तुलनेने उत्पादन खर्च कमी (५० ते ६० हजार रुपयांपर्यंत) होतो. खर्च वजा जाता वर्षाला दीड ते पावणेदोन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. आमच्या भागात पाण्याची कमतरता असल्याने सीताफळासारखे कमी पाण्यावर येणारी फळबाग लाभदायक ठरते.
गेल्या १५ दिवसांत बागेत केलेली कामे
ट्रॅक्टरच्या मदतीने काकरणी केली आहे
ड्रीपने संपूर्ण बागेला पाणी दिले जाते.
सध्या फळबाग फळाच्या अवस्थेत असून, काढणी सुरुवात झाली आहे.
येत्या ३० दिवसांत करावयाची कामे
फळे काळी पडून नये, यासाठी आवश्यकतेनुसार फवारणीचे नियोजन केले जाईल.
फळवाढीच्या अवस्थेत सिंचनाचे नियोजन महत्त्वाचे असते.
फळांच्या पक्वतेवर लक्ष वेळीच काढणी केली जाईल.
सुजित सीताराम झेंडे, ९६८९१५१६३८
(शब्दांकन : संदीप नवले)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.