Sitaphal Cluster : खेमजईने विकसित केले सीताफळ क्‍लस्टर

Agriculture Success Story : चंद्रपूर या दुर्गम जिल्ह्यातील खेमजई (ता. वरोरा) या गावाने ग्रामविकासामध्ये आदर्श निर्माण केला आहे. सीताफळ क्‍लस्टरच्या माध्यमातून रोजगाराचा नवा पर्याय उपलब्ध करत लोकवर्गणीतून इतरही भरीव कार्य तडीस नेण्यावर भर दिला आहे.
Sitaphal Cluster
Sitaphal ClusterAgrowon
Published on
Updated on

Sitaphal Farming : वरोरा तालुक्‍यात कापसाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. या भागात कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगाची संख्यादेखील मोठी आहे. नऊपेक्षा अधिक जिनिंग प्रेसिंग युनिट या भागात आहेत. याच तालुक्‍यात असलेल्या खेमजई गावाने ग्राम विकासाच्या क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली आहे.

खेमजई हे १७०० लोकवस्तीचे गाव. पूर्वी गावशिवारातील मोकळ्या शासकीय जागेत बहुसंख्य सीताफळ झाडे होती. त्यातील फळांचा लिलाव करून ग्रामपंचायतीला अतिरिक्त उत्पन्न मिळत असे. सरासरी पाच हजार रुपयांत लिलाव झाल्यास खरेदीदाराला त्यापासून दहा हजार रुपयांचे उत्पन्न होत होते. पाच हजार रुपयांचा खर्च वजा जाता, तब्बल पाच हजार रुपयांचा नफा मिळत होता. त्यामुळे खरेदीदार देखील बोली लावण्यासाठी उत्सुक राहत होते. कालांतराने या परिसराचा वापर गिट्टी खदान म्हणून होऊ लागला. मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन होत असल्याने हा परिसर उजाड झाला. ग्रामपंचायतीचा देखील उत्पन्नाचा एक स्रोत कमी झाला.

गावात घडले परिवर्तन

तीन वर्षांपूर्वी खेमजई ग्रामपंचायतीची निवडणूका जाहीर झाली. यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी विकासात्मक कोणत्याच मुद्द्यावर भर दिला नाही. त्यामुळे गावाला बकाल स्वरूप आले होते. परिणामी गावाला विकासाच्या दिशेला नेणाऱ्या सदस्यांची निवड व्हावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. ग्राम विकासाला पूरक पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी ही निवडणूक सर्वानुमते बिनविरोध होण्यासाठी भर देण्यात आला.

सध्या ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांमध्ये सरपंच मनीषा चौधरी, उपसरपंच चंद्रहास मोरे तर सदस्यांमध्ये रमेश चौधरी, भाऊराव दडमल, धनराज गायकवाड, वंदना नन्नावरे, माधुरी निब्रड, सितल साळवे, शैला चवरे, सचिव मेघश्‍याम येचलवार यांचा समावेश आहे. गावच्या उपक्रमांमध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रमोद गंपावार, डॉ. संदीप भेले यांची भूमिका राहते.

वादावर शोधला तोडगा

नव्या पदाधिकाऱ्यांनी सत्ता सूत्रे हाती घेताच ग्राम विकासाला पूरक कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. गौण खनिज उत्खननाकरिता एक वर्षाचा करार असतो. तो संपल्यानंतर कंत्राटदाराला पुन्हा त्या जागेवर उत्खनन करू नये असे सांगण्यात आले. मात्र कंत्राटदार याला जुमानत नव्हता. त्यावर तोडगा म्हणून उत्खननाकरिता गावापासून काही अंतरावरील जागा देण्याचे ठरविण्यात आले. अखेर यावर सहमती झाली.


लोकवर्गणीतून सीताफळ बाग

वादावर योग्य तोडगा निघाल्यावर त्याच जागी नव्याने रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करण्याचे ठरले. मात्र योजनेअंतर्गत सीताफळ वगळता इतरच फळझाडे उपलब्ध होती. त्यामुळे शासकीय निधीवर अवलंबून न राहता ग्रामपंचायत सदस्यांनी आपले मानधन द्यावे, तसेच लोकवर्गणी काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यातून एक लाख रुपयांचा निधी संकलित झाला. निधीतून सुमारे सात हजार सीताफळ रोपांची खरेदी करण्यात आली. झाडांना पाणी देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मजुरांची नियुक्ती करण्यात आली. आगामी काळात या बागेपासून ग्रामपंचायतीला शाश्‍वत उत्पन्न मिळणार आहे.

Sitaphal Cluster
Agriculture Success Story : नाईकनवरे बंधूंनी माळरान जमीन केली कसदार

गाव विकास दिनदर्शिका :

गावस्तरावर राबविलेल्या विविध उपक्रमांची ग्रामस्थांना माहिती होण्यासाठी ग्रामपंचायतीद्वारे दरवर्षी गावविकास दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. यात पंचायत समिती, जिल्हा परिषद अधिकारी तसेच सर्पमित्रांचे संपर्क देखील देण्यात येतात. विशेष म्हणजे या उपक्रमात मागील तीन वर्षांपासून सातत्य राखण्यात आले असून, लोकवर्गणीतून हे काम होते.

विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजवंदन :

स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवसांना माझ्या हस्ते ध्वजवंदन व्हावे अशी स्पर्धा अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याचे दिसून येते. मात्र ग्रामविकासात पुढारलेल्या खेमजई गावाने या बाबतही वेगळेपण जपले आहे. गेल्या तीन वर्षांपासून शाळा, महाविद्यालय स्तरावर पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रजासत्ताक तसेच स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करण्याचा पायंडा गावाने पाडला आहे.

संस्कारक्षम पिढीसाठी शिबिर

गावातील मुले सुदृढ आणि संस्कारक्षम घडावी याकरिता दरवर्षी १०० निवासी मुलांचे शिबिर गावस्तरावर आयोजित केले जाते. विविध तज्ज्ञ या शिबिरात मार्गदर्शन करतात. मुलांसाठी मैदानी खेळांचे आयोजन केले जाते. सोबतच इंग्लिश स्पीकिंगमध्येही त्यांना पारंगत केले जाते. या महिनाभराच्या शिबिरावर सुमारे पन्नास हजार रुपयांचा खर्च होतो. हा खर्च देखील लोकवर्गणीतूनच केला जातो.

विकास ग्रुपच्या माध्यमातून मिळतो निधी :

१७०० लोकवस्तीच्या या गावातील सुमारे ३० कुटुंब हे शासकीय किंवा खासगी नोकरीसाठी बाहेर राहतात. मात्र त्यांची गावाप्रती ओढ कायम आहे. त्यांनी देखील ग्रामविकासाच्या या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता व्हॉट्‌सॲपवर ‘विकास ग्रुप’ या नावाने ३० व्यक्तींचा ग्रुप करण्यात आला आहे. या माध्यमातून दरमाह सुमारे पाच हजार रुपये संकलित होतात. हा निधी गावस्तरावर विविध उपक्रमांसाठी खर्च होतो. सर्व हिशेब एक्‍सेल शीटच्या माध्यमातून काटेकोर ठेवला जातो.

Sitaphal Cluster
Sitaphal Management : सीताफळ बहराचे तंत्र

कर्तबशहा दर्गा पर्यटनाचे केंद्र :

गावापासून जवळच निसर्गाच्या सान्निध्यात वली बाबा कर्तब यांचा दर्गा आहे. या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल कायम असते. मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. त्यामुळे हे पर्यटन स्थळ दुर्लक्षित होते. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या पर्यटन स्थळाच्या विकासाचा निर्णय घेतला. त्याकरिता पहिल्या टप्प्यात श्रमदान तसेच लोकवर्गणीतून तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला. तेथे बोअरवेलच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. विजेवरील अनावश्‍यक खर्च टाळण्यासाठी सौर दिवे बसविण्यात आले.

गावात वृक्षारोपणावर भर :
गावाचा परिसर हिरवळीने बहरलेला असावा याकरिता गावात ६०० वृक्षांच्या लागवडीवर भर देण्यात आला आहे. त्यात फुलझाडांसह सावली देणाऱ्या वृक्षांचाही समावेश आहे. विकास ग्रुपच्या माध्यमातून या झाडांच्या संरक्षणासाठी १००० रुपयांप्रमाणे शंभर ट्री गार्डची खरेदी करण्यात आली. झाड मोठे झाले की तेच ट्री गार्ड दुसऱ्या झाडाकरिता वापरले जाते.

पाच हजार सीडबॉल :

गावशिवारात चारापिके लागवड तसेच फळझाडांच्या संख्येत वाढ होण्यासाठी यंदा पाच हजार सीडबॉल तयार करण्यात आले. या सीडबॉलच्या मातीत आतील बाजूस आंबा कोय तर वरील बाजूस चारा बियाणे टोकण्यात आले. संरक्षण होण्याच्या उद्देशाने ते काटेरी झुडपांच्या परिसरात रोवण्यात आले. जास्त आंबा कोयी संकलित व्हाव्यात, याकरिता एक रुपये प्रति कोय अशी रक्‍कम देण्यात आली. हा निधीदेखील लोकवर्गणीतून जमा करण्यात आला.

दुग्धोत्पादनातही घेणार आघाडी :

गावात श्रेणी-१ दर्जाचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. येथील पशुवैद्यक डॉ. सतीश अघडते यांच्या पुढाकाराने गावात आघाडीच्या दूध कंपनीचे संकलन केंद्र सुरू झाले. सद्यःस्थितीत दूध पुरवठा कमी प्रमाणात आहे. मात्र दुग्धोत्पादनाला चालना मिळावी याकरिता गावशिवारात चारा लागवडीवर भर दिला जाणार आहे. त्याअनुषंगाने पडीक क्षेत्रावर बहुवार्षिक चारा बियाणे लागवड करण्याचे प्रस्तावित आहे.

गावतलावाचे खोलीकरण :

सिंचन सुविधा बळकटीकरणाच्या प्रयत्नांतर्गत गावशिवारातील बोडी (छोटा तलाव) याचे खोलीकरण करण्यात आले. त्याकरिता खासगी कंपनीच्या सीएसआर फंडचा वापर करण्यात आला आहे.

मुलांची विशेष बॅंक

शालेय वयातच मुलांना बॅंकिंग व्यवहाराची जाण व्हावी याकरिता जिल्हा परिषद शाळेत बॅंक उघडण्यात आली आहे. त्यामध्ये खाऊ म्हणून मिळालेले पैसे विद्यार्थी जमा करतात. त्यासोबतच गरजेच्यावेळी खात्यातून काढूनही घेतात.

अनाथ मुलींना दिला मायेचा हात :

गावामधील स्थायिक एका पती-पत्नीचा दुर्धर आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या दोन्ही मुली अनाथ झाल्या. यातील एक मुलगी गेवराई बीड, तर दुसरी बीडच्या अनाथालयात आहे. या आश्रमाला भेट देत ग्रामस्थांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत केली. एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांनी दोघींना दहा दिवसांसाठी गावी आणत त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदतही केली.

दहा लाखांचा मिळाला पुरस्कार :

‘आर. आर. पाटील सुंदर गाव योजना’ शासनाकडून राबविली जाते. या योजनेतील सर्व निकष पूर्ण केल्यामुळे गावाला दहा लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला. नुकताच हा निधी ग्रामपंचायत खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती सरपंच मनीषा चौधरी यांनी दिली.

भटाळीत सीताफळापासून लाखांचे उत्पन्न :

खेमजईपासून अवघ्या पाच किमीवर भटाळी हे गाव आहे. या गावात नैसर्गिक सीताफळ वन आहे. तेथील सीताफळ झाडांचा जाहीर लिलाव केला जातो. त्याआधारे ग्रामपंचायतीला दोन लाखांवर उत्पन्न मिळते.

सद्यःस्थितीत पाच हजारांवर सीताफळांची लागवड करण्यात आली आहे. यापुढील काळात आणखी पाच हजार रोपांची लागवड केली जाईल. बाजारपेठेत कमी दर असेल त्या वेळी सीताफळ पडून राहू नये याकरिता प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रस्तावीत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मुलांसाठी अभ्यासिका
उभारली असून लोकवर्गणीतून पुस्तके उपलब्ध केली आहेत.

रमेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते ९५११७१५४९५
मनीषा चौधरी, सरपंच
७६२०९४९१७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com