Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Farming : वाढीच्या अवस्थेनुसार खत व्यवस्थापनावर भर

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Banana Production :

शेतकरी नियोजन

पीक : केळी

शेतकरी : संतोष भावडू पाटील

गाव : भोकरी, ता. रावेर, जि. जळगाव

एकूण क्षेत्र : सात एकर स्वमालकीचे, १३ एकर लीजवर

केळीखालील क्षेत्र : साडेसहा एकर (१० हजार झाडे)

संतोष पाटील यांच्या संयुक्त कुटुंबाची भोकरी (ता. रावेर, जि.जळगाव) शिवारात सात एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. याशिवाय त्यांनी भाडेतत्त्वावर १३ एकर जमीन घेतली आहे. वयाच्या चोविसाव्या वर्षांपासून संतोष शेती करीत आहे. स्वतःच्या शेतजमिनीमध्ये मुख्य पीक म्हणून केळी लागवड केली जाते. तर भाडेतत्त्वावरील क्षेत्रामध्ये खरिपात कापूस, मका, तूर, तर रब्बीत हरभरा, मका लागवड असते.

शेतजमिनीला भोकर नदीसह काही जलसंधारणाच्या कामांचा सिंचनासाठी फायदा होतो. शिवाय सिंचनासाठी १ विहीर देखील आहे. शेती पूर्णपणे बागायती आहे. केळी लागवड दोन क्षेत्रामध्ये विभागली गेली आहे. सध्या साडेसहा एकरांत केळीची सुमारे १० हजार झाडांची लागवड आहे. त्यापैकी पिलबागेत ४ हजार झाडे, तर नवीन लागवडीत ६ हजार झाडे आहेत.

बाजारातील आवक आणि दरांतील चढ-उतार यांचा फटका बसू नये यासाठी टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन असते. लागवडीसाठी काही वेळेस १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा, तर काही वेळेस दर्जेदार कंदांचा उपयोग केला जातो. केळी लागवडीतील व्यवस्थापनामध्ये पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ महेश महाजन, धीरज नेहेते यांचे मार्गदर्शन मिळते.

उंच गादीवाफ्यावर लागवड केली जाते. गादीवाफा सुमारे एक फूट उंच असतो. गादीवाफा साडेतीन फूट रुंद ठेवला जातो. सिंचनासाठी सिंगल लॅटरल असतात. पाच बाय साडेपाच फूट पद्धतीने लागवड केली जाते. जमीन सुपीकतेसाठी तूर, हरभरा ही पिके घेतली जातात.

लागवड नियोजन

सध्या साडेसहा एकरांत केळीची सुमारे १० हजार झाडे आहेत. नवीन लागवड साडेतीन महिने, तर पिलबाग पाच महिन्यांची आहे.

लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून महिनाभर तापू दिली. त्यामुळे जमिनीतील कीड-रोगांच्या अवस्था नष्ट होण्यास मदत झाली.

नवीन लागवडीसाठी एक फूट उंचीचे आणि साडेतीन फूट रुंदीचे गादीवाफे तयार केले. त्यात शेणखताची एकरी मात्रा ३ ट्रॉली प्रमाणे भर घालून घेतली.

केळी रोपांचे उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी व जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढीसाठी अनेकदा धैंचा पिकाची लागवड केली जाते. केळी लागवडीच्या १५ दिवस आधी धैंचा लागवड केली जाते. ही लागवड रोपांच्या पश्चिम व दक्षिण बाजूस केली जाते.

गादीवाफे तयार केल्यानंतर वाफ्यांवर सिंगल सुपर फॉस्फेट खताची मात्रा दिली. त्यानंतर पुन्हा वाफे व्यवस्थित करून घेतले.

सिंचनासाठी शेताच्या लांबीनुसार लॅटरल अंथरून घेतल्या. दोन ड्रीपमध्ये सव्वाफूट अंतर राखले आहे. त्यातून ताशी चार लिटर पाणी डिस्चार्ज होते.

साधारण १६ मे च्या दरम्यान दोन रोपांत साडेपाच फूट अंतर राखत लागवड करून घेतली.

मागील कामकाज

केळी रोपांचे खोडकीड व हुमणी अळीपासून संरक्षण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा केला. फवारणीतून किंवा आळवणीतून ही प्रतिबंधात्मक मात्रा दिली जाते.

लहान रोपांवर सुरुवातीच्या काळात कुकुंबर मोझॅक विषाणूचा (सीएमव्ही) प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीच्या ३ महिन्यांत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत घटकांच्या नियमितपणे फवारण्या घेतल्या आहेत.

सुरवातीच्या काळात दर १५ दिवसांनी १३ः४०ः१३ प्रति एक हजार झाडांना मात्रा दिली. त्यासोबत बोरॉन, मॅग्नेशिअम सल्फेट, सल्फर यांच्या मात्रा दिल्या.

रासायनिक खतांच्या मात्रा दिल्यानंतर १० ते १५ दिवसांनंतर जिवामृताचा वापर केला.

पाऊस असल्यामुळे बागेत सिंचनाची फारशी गरज भासली नाही. फक्त खते देण्याच्या वेळी सिंचन करण्यावर भर दिला. जमिनीत वाफसा स्थिती कायम राखण्यात आली.

गादीवाफ्यावर लागवड असल्याने आंतरमशागतीची फारशी गरज भासत नाही. दोन वेळेस तणनियंत्रण करून फक्त मातीची भर दिली.

आगामी नियोजन

सध्या बागेतील रोपे वाढीच्या अवस्थेत आहे. पीक वाढीची अवस्था लक्षात घेऊन वेळापत्रकानुसार रासायनिक खतमात्रेत वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल केले जातील. दर दिवसांनी युरिया व पोटॅश खताच्या प्रति एक हजार झाडांना मात्रा दिल्या जातील. तसेच २४ः२४ः०ः१० ची मात्रा दिली जाईल.

सध्या पावसाचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार बागेत वाफसा स्थिती कायम ठेवत आहे.

ड्रीपच्या माध्यमातून अधिकाधिक खते देण्यावर भर दिला आहे. दर आठवड्याला १३ः४०ः१३ खताच्या मात्रा दिल्या जातील. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातील.

बागेतील फुटवे व पिवळी, कोरडी पडलेली पाने काढली जातील. दर १० दिवसांनी ही कार्यवाही केली जाईल.

कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे नियमित निरीक्षण केले जाईल. रसशोषक किडी व बुरशीनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातील.

पावसामुळे बागेत तणांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. तण नियंत्रणाची कार्यवाही केली जाईल.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

लागवडीनंतर १ ते २ दिवसांनी शिफारशीत रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक व पीक वाढीसाठी विद्राव्य खतांची आळवणी केली. साधारण महिनाभर १० दिवसांच्या अंतराने ही आळवणी करण्यात आली.

लागवडीनंतर साधारण १ महिन्याने दुसऱ्या बेसल डोसमध्ये १०ः२६ः२६, युरिया आणि पोटॅश या खताची प्रति एक हजार झाडांना मात्रा दिली.

तिसऱ्या महिन्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यात आला. कॅल्शिअम, गंधक, मॅग्नेशिअम, फेरस यांचा बेसल डोसमध्ये वापर केला. उर्वरित सूक्ष्म अन्नद्रव्यांचा ठिबकद्वारे वापर केला जातो.

त्यानंतर निंबोळी पेंड तसेच सेंद्रिय खतांचे मिश्रण दिले जाते.

संतोष पाटील, ८३२९९३४२४९

(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात काहिशी नरमाई; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत हरभरा दर?

Wheat Sowing : खानदेशात गव्हाची २४ हजार हेक्टरवर पेरणी शक्य

ZP School : कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळात जिल्हा परिषद शाळेची भरारी

Agriculture Awards Ceremony : महाराष्ट्र शासनातर्फे २९ सप्टेंबरला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा!

Krishi Sahayyak : कृषी सहायकांच्या समस्यांवर पुण्यातील बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT