Buldana News : जिल्ह्यात खामगाव, शेगाव तालुक्यांत रविवार (ता. ७) आणि सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ११ हजार १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना या आपत्तीला सामोरे जावे लागले आहे. नदी-नाल्या काठावरील जमीनही खरडून गेली आहे.
जिल्ह्यात शेगाव, खामगाव तालुक्यांत सर्वत्र अतिवृष्टी झाली होती. या दोन तालुक्यांत १३८ गावांना याचा फटका बसला. सोयाबीन, कपाशी, तूर, केळी, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक ७१६० हेक्टरचे नुकसान खामगाव तालुक्यात झाले.
या तालुक्यात ९५ गावांतील ९३५० शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांच्या काठावरील शेतजमीन खरडून गेली. खामगाव तालुक्यात आवार या महसूल मंडलात तब्बल २१९ मिलिमीटर पाऊस झाला होता.
सध्या महसूल, कृषी, व ग्रामविकास विभागाकडून अंदाजित नुकसान सादर करण्यात आले आहे. खामगाव तालुक्यात आवार, पिंपरी गवळी, नागपूर, विहिगांव, रामनगर, मक्ता, रोहणा या गावांना जास्त फटका बसला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी पीक नुकसानाची पाहणी केली.
शेगाव तालुक्यात ४००३ हेक्टरचे नुकसान
या आपत्तीचा शेगाव तालुक्यातही मोठा फटका बसला. ४३ गावांत सुमारे ४००३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ५७२५ शेतकऱ्यांना या आपत्तीला सामोरे जावे लागले आहे.
शेतकऱ्यांना मदतीची आस
हंगामाच्या तोंडावरच ही मोठी आपत्ती आली. पेरणी केल्यानंतर पिकांची उगवण चांगली झाली होती. शेतकऱ्यांनी आंतरमशागतही केली होती. अशातच ही अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूर वाहिले. हे पाणी शेतांमधून गेल्याने जमीन पिकासह खरडून गेली.
अनेक शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. काही शेती खरडून गेल्याने संपूर्ण सुपीक भाग आता नष्ट झाला. ही जमीन पिकाऊ करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागेल. शासनाने या आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.