Crop Protection Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Protection : उपयुक्त बुरशींद्वारे पर्यावरणपूरक पीक संरक्षण

Team Agrowon

डॉ. योगेश इंगळे

आपल्याला बुरशी म्हटले, की दरवेळी पिकांवरील विविध रोगच आठवतात. पण त्या निसर्गामध्ये विविध पर्यावरणपूरक कामे करत असतात. निसर्गातील काही बुरशी पिकांवरील विविध किडींमध्ये साथीचे रोग पसरवितात. निसर्गातून त्यांच्या विलगीकरणानंतर प्रयोगशाळेत निवडक माध्यमांवर वाढ केली जाते. त्यांच्या बुरशी तंतू, बीजाणूपासून जैविक कीडनाशके तयार केली जातात. या लेखामध्ये त्यांची ओळख करून घेऊ.

पायसिलोमायसिस फ्युमोसोरोसियस (Paecilomyces fumosoroseus)

ही बुरशी कीटकाचे तोंड, त्वचेवरील रंध्रछिद्रे, गुदद्वार याद्वारे कीटकाच्या शरीरात शिरते. डीप्टेरा, हेमिप्टेरा, लेपिडोप्टेरा आणि अशा अनेक वर्गातील किडींमध्ये या बुरशीचे अवशेष आढळून आले आहेत. त्यात मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, तंबाखूची पान खाणारी अळी, कोबीवरील चौकोनी ठिपक्यांचा पतंग अशा अनेक किडींचा समावेश आहे. या बुरशीत असलेल्या डिपिकोलिनीक आम्लामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म दिसून आले आहेत.

किडी ः भात, कपाशी, मका, कोबीवर्गीय पिके यामधील वेगवेगळ्या कोळी (माईट्स) किडीच्या नियंत्रणासाठी याचा वापर करतात.

वापर ः भुकटी स्वरूपातील संवर्धन २.५ किलो प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस.)

पायसिलोमायसिस लिलॅसिनस( Paecilomyces lilacinus )

ही बुरशी सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. रूटनॉट सूत्रकृमी (मुळांवर गाठी करणारे), रेनिफॉर्म सूत्रकृमी, संत्र्यातील सूत्रकृमीसाठी वापरता येते. माती, कुजलेले वनस्पतिजन्य पदार्थ, कीटक, सूत्रकृमी, किंवा वनस्पतींच्या मुळांजवळ ही बुरशी आढळते. कीडनियंत्रणाच्या व्यतिरिक्तही ही बुरशी जैविक उत्तेजक म्हणूनही पिकांमध्ये काम करते. मेलीडोगायने प्रकारातील सूत्रकृमींवर प्रभावी काम करते. तिच्या अंड्यांवर ही बुरशी आपली भूक भागवते.

किडी ः वांगी, टोमॅटो, झेंडू, मिरची, काकडी, कारले इ. पिके यामधील रूटनॉट सुत्रकृमी नियंत्रणासाठी याचा वापर करतात.

वापर ः भुकटी स्वरूपातील बुरशी संवर्धन ३ किलो प्रति ५०० किलो सेंद्रिय खतात मिसळून वापरण्याची शिफारस आहे. (वांगी पिकासंदर्भात लेबल क्लेम, बाकीसाठी ॲग्रेस्को शिफारस.)

लेकॅनिसिलिअम लेकॅनी (Lecanicillium lecanii)

विविध पिकांवरील रसशोषक किडी व विशेषतः मृदू किंवा मऊ शरीर असलेल्या किडींच्या व्यवस्थापनासाठी या बुरशीचा वापर सर्वाधिक होतो. या बुरशीचे बीजाणू किडींच्या शरीराच्या संपर्कात आल्यावर पृष्ठभागावर त्यांचे अंकुरण होते. अंकुरित तंतू तयार होऊन ती किडीच्या शरीरात प्रवेश करते. अंतर्गत अवयवांना निष्क्रिय करते. तसेच त्यांच्याकडून स्रवणाऱ्या विषारी द्रव्यांमुळे कीड मरते.

किडी ः कपाशी, कांदा, कोबी, टोमॅटो, भेंडी या सारख्या पिकातील पांढरी माशी, फुलकिडे यासारख्या रस शोषक किडींच्या विविध अवस्था या बरोबरच चौकोनी ठिपक्याचा पतंग, हेलिकोव्हर्पा अळी यांचे नियंत्रण शक्य.

वापर ः फवारणीसाठी ४ ते ५ ग्रॅम किंवा मिलि प्रती लिटर पाणी. (लेबल क्लेम.)

बिव्हेरिया बॅसियाना (Beauveria bassiana)

बिव्हेरिया या बुरशीच्या तीन प्रजाती कीटकांना संक्रमित करतात. त्यापैकी बिव्हेरिया बॅसियाना ही प्रजाती अधिक परिणामकारक आणि मारक आहे. ती जगभरात जवळपास १००० किडींच्या नियंत्रणासाठी वापरली जाते. सदर बुरशी कीटकामध्ये ‘व्हाइट मस्करडाईन’ नावाचा रोग उद्‌भवते. हवा आणि जमिनीतून या बुरशीचा प्रसार होतो. ती किडीच्या त्वचेच्या संपर्कात येऊन किंवा तोंडावाटे शरीरात शिरते. स्वतःची वाढ करून घेते. या प्रक्रियेत ‘बिव्हेरिसीन’ नावाचे विषारी द्रव स्रवून कीटकांची प्रतिकारशक्ती कमी होते. या बुरशीमुळे कीड मेल्यानंतर त्यांच्या शरीराभोवती पांढऱ्या रंगाचे बुरशीचे आवरण तयार होते. त्यातून नवे संसर्गजन्य बिजाणू निरंतर प्रसारित होत राहतात. त्यामुळे हे बिजाणू अन्य किडींच्या संपर्कात येऊन त्यांना बाधित करतात.

किडी ः कोबी, फुलकोबी, भात, कडधान्य, भेंडी, टोमॅटो या सारख्या पिकात आढळणाऱ्या विविध पाने गुंडाळणाऱ्या, पाने खाणाऱ्या, फळ पोखरणाऱ्या, मुळे खाणाऱ्या किडींच्या अळ्या, चौकोनी ठिपक्याचा पतंग यांच्या विविध अवस्थांवर या बुरशीचा वापर होतो.

वापर ः फवारणीसाठी ५ किलो प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी शिफारस आहे. जमिनीतून वापर करण्यासाठी ५ किलो बुरशी ५०० किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी लागवडीआधी आणि नंतर पुन्हा १ महिन्याने वापरावे. (लेबल क्लेम)

मेटाऱ्हायझीअम रिलई (Metarhizium rileyi) / पूर्वीचे नाव: नोमुरिया रिलई)

नोमुरिया रिलई या बुरशीचे नाव बदलून आता मेटाऱ्हायझिअम रिलई असे झाले आहे. जगात अनेक देशांमध्ये या बुरशीमुळे किडींच्या अळी अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य रोगाची नोंद आढळून आली आहे. भारतातही या बुरशीची विविध पिकांतील पतंगवर्गीय किडींमध्ये नैसर्गिकरीत्या संसर्गजन्य रोगाची साथ आढळून येते.

कीटकांच्या त्वचेच्या संपर्कात किंवा तोंडावाटे शरीरात गेल्यास तिच्या तंतूची वेगाने वाढ होते. किडीचे शरीर टणक होऊन ती दगावते. त्याच्या शरीरावर हिरव्या रंगाचे बिजाणू तयार होऊन पुन्हा वातावरणात मिसळत राहतात. ते अन्य किडींना संसर्ग करत राहतात. सर्वात महत्त्वाचे ही बुरशी उपयोगी कीटकांना संसर्ग करत नाही. ती परोपजीवी व भक्षकांसाठी सुरक्षित आहे.

किडी ः भात, कडधान्य, बटाटा, टोमॅटो, वांगी या सारख्या पिकातील पाने गुंडाळणाऱ्या, पाने खाणाऱ्या, फळ पोखरणाऱ्या किडींच्या अळी आणि हुमणी, बोंडअळी, तपकिरी भुंगेरे यांच्या व्यवस्थापनासाठी या बुरशीचा वापर होतो.

वापर ः फवारणीसाठी ४ ते ५ ग्रॅम किंवा मिलि प्रति लिटर पाणी. (लेबल क्लेम.)

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.

खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.

लेबल क्लेम वाचावेत.

पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.

रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत.

पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT