Sustainable Agriculture Conferene 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Agriculture: पर्यावरणपूरक शेतीच शाश्‍वत शेतीचा आश्‍वासक स्रोत

Agrowon 20th Anniversary: ‘जमिनीची सुपीकता टिकवायची असल्यास जीव, जंतू, जिवाणूंचे संवर्धन महत्त्वाचे आहे. त्याकरिता माती, पाणी आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे.

Team Agrowon

Pune News: जमिनीची सुपीकता टिकवायची असल्यास जीव, जंतू, जिवाणूंचे संवर्धन महत्त्वाचे आहे. त्याकरिता माती, पाणी आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. हाच शाश्‍वत शेतीचा आश्‍वासक स्रोत असल्याचा सूर ‘अॅग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित गटचर्चासत्रात विविध तज्ज्ञांनी व्यक्‍त केला.

‘शेती मातीचं शाश्‍वत संवर्धन’ या विषयावर झालेल्या या चर्चासत्रात कॅन बायोसिसच्या व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर, नैसर्गिक शेतीचे अभ्यासक, पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुभाष शर्मा, ‘शून्य मशागत शेती’ तंत्राचे प्रणेते प्रताप चिपळूणकर, देगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील दीपक जोशी हे सहभागी झाले होते. लाल कंधारीच्या संवर्धनात योगदान देणारे मावल (लातूर) येथील शरद पाटील यांचा या वेळी अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुभाष शर्मा म्हणाले, ‘‘१९९४ पासून मी नैसर्गिक शेतीत काम करतो आहे. मी त्या आधी त्याचा अभ्यास केला, अनुभव घेतला, तेव्हा पर्यावरणपूरक शेतीतूनच शाश्‍वत शेतीचे मॉडेल विकसित होईल, हे माझ्या लक्षात आले आणि आतापर्यंतची वाटचाल केली. सध्या वातावरणातील बदलाचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे सध्याच्या शेती पद्धतीत बदलाची गरज असून, हा बदल साधाण्यासाठी आपल्याकडे केवळ सात वर्षांचा कालावधी आहे. तोवर आपण भानावर येत बदल स्वीकारला नाही तर त्याचे दुष्परिणाम शेती व्यवस्थेला भोगावे लागतील.

देशाचे ८० टक्‍के क्षेत्र डार्कझोनमध्ये आहे. पर्यावरणीय असंतुलन हा देखील शेती आणि समाजासमोरचा मोठा धोका आहे. त्याकरिता शेतातच पाण्याचा थेंब अन् थेंब जिरविण्यावर भर दिला पाहिजे. नैसर्गिक शेती पद्धतीत गुणवत्ता, संख्या आणि बाजारपेठ (क्‍वालिटी, क्‍वान्टिटी, मार्केट) या बाबी महत्त्वाच्या ठरतात. या बाबींवर लक्ष देत विक्री व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला. गुणवत्ता असल्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली. यामुळे चांगला दर मिळविता आल्याचे त्यांनी सांगितले.

कॅन बायोसिसच्या व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर म्हणाल्या, की द्रवरूप जैविक खताच्या संशोधनाकरिता १९९७ मध्ये पहिले पेटंट आम्हाला मिळाले. आता लवकरच आमची उत्पादने २७ देशात पोहोचणार आहेत. शेतीतल्या ३० टक्के निविष्ठा या जैविक, नैसर्गिक आहेत. हे मोठे परिवर्तन आहे. कार्बन व्यवस्थापन हे गुंतागुंतीचे वाटत असले, ते फार सोपे आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी हे तंत्र आधी समजून घेतले पाहिजे. काटेकोर शेतीकडे वाटचाल करताना माती व्यवस्थापन हाच पहिल्या टप्पा महत्त्वाचा आहे, असेही कानिटकर यांनी सांगितले.

प्रताप चिपळूणकर म्हणाले, ‘‘१९७० मध्ये कृषी पदवीधर झाल्यानंतर शेतीला सुरुवात केली. सुरुवातीची पंधरा-वीस वर्षे उत्पादन चांगले मिळाले, तरी पुढे उत्पादकता घटली. यामागील कारणांचा शोध घेताना भू सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाकडे वळलो. सूक्ष्मजीव आवश्यक आहेत, त्यांना आहार म्हणून सेंद्रिय कर्बाची पातळी संतुलित ठेवली पाहिजे हे समजले. शेणखत टाकणे, पाचट कुजविण्यासारख्या उपक्रमातून फारसे काही हाती येत नसल्याचे समजले. म्हणजेच या प्रयोगातून जितकी सुपीकता आणि उत्पादकता वाढायला हवी, तितकी वाढली नव्हती. याला पर्याय शोधू लागलो.

मग सेंद्रिय कर्ब अधिक कोणत्या घटकांतून वाढेल, यावर विचार सुरू झाला. मग जमिनीखालील व सावकाश कुजणाऱ्या उसाची खोडकी, मुळाचे जाळे यातून सेंद्रिय कर्ब अधिक वाढतो हे समजले. हे घटक तर आपण जमिनीच्या बाहेर काढत होते. त्याला जागेवरच कुजविण्याला प्राधान्य दिले. त्यानुसार भातशेती विना नांगरणी करण्याचा निर्णय घेतला. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले. येथूनच शून्य मशागत तंत्रज्ञानाचा जन्म झाला. या तंत्रात उत्पादकता वाढच नाही, तर उत्पादित शेतीमालाचा दर्जाही वाढत असल्याचे माझे निरीक्षण आहे. या तंत्रात उत्पादकता खर्च खूपच कमी राहतो. शेती शाश्‍वत होईल, असे त्यांनी सांगितले.

दीपक जोशी म्हणाले, ‘‘तणे म्हणजे शत्रू या भूमिकेतून बाहेर पडायलाच वेळ लागला. मग नियंत्रणाकडून तण व्यवस्थापनाकडे वळलो. शून्य मशागत तंत्रातूनच कोरडवाहू शेतीला स्थिरता मिळू शकेल, हे लक्षात आले. तणे असली की किडी फारशा मुख्य पिकांकडे वळत नाहीत, हे गावातील दोन, तीन प्रसंगातून लक्षात आले. यातूनच पिकाला सहजीवाची गरज अधोरेखित झाली.

आपण शेतकरी आता बांधावरही गवताची काडीही ठेवत नाही. किडींना मुख्य पिकावर हल्ला करण्याशिवाय पर्याय ठेवत नाही. घाबरत घाबरत एक एकरापासून सुरू केलेले प्रयोग आता संपूर्ण शेतीत करत आहे. त्याचे फायदे जाणवू लागल्याने अन्य शेतकरीही विचारणा करू लागल्याचे दीपक जोशी यांनी सांगितले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT