Pune News : राज्य शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाइन ई-पीकपाहणी सक्तीची केली आहे. मात्र यातील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी चांगलेच बेजार झाले आहेत. ई-पीकपाहणी नोंदविताना शेतकऱ्यांना सर्व्हर डाउन, नेटवर्क, ॲप न उघडणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यंदा शासनाने ‘ई-पीकपाहणी अॅप्लिकेशनचे व्हर्जन ३.०.२ आणले आहे, यातही ‘पुन्हा प्रयत्न करा’ अशा सूचना वारंवार दाखवत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ई-पीकपाहणी डोकेदुखी झाली आहे.
खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांच्या नोंदणीसाठी ई-पीकपाहणीची मोहीम राबवली जात आहे. शासकीय अटींमुळे एकीकडे ई-पीकपाहणीशिवाय विम्याचा लाभ मिळत नाही. तर दुसरीकडे नोंदणी करताना सर्व्हर डाउन, नेटवर्क, ॲप न उघडणे अशा तांत्रिक अडचणींचा खोडा येत आहे. अशा चक्रव्यूहात शेतकरी अडकले आहेत. राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यात नेटवर्क नसल्यामुळे ई-पीकपाहणी होत नाही. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. अपुरी व्यवस्था असतानाही शासकीय स्तरावर ई-पीकपाहणीसारख्या ऑनलाइन प्रक्रियेचा अट्टहास का धरला जात असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
तांत्रिक अडचणी
- ई-पीकपाहणी नोंदविताना ॲप अचानक बंद पडत आहे.
- अर्ज भरण्यासाठी संकेतांक वेळेवर येत नाही. प्राप्त झाला तरीही माहिती पुढे भरण्याची प्रक्रिया संथ होते.
- नोंदणीची प्रक्रिया अर्धवट राहत आहे. पुन्हा ॲपवर नोंदणी करताना आपली नोंदणी झाल्याचा संदेश येत आहे. मात्र नोंद अपूर्णच राहत आहे.
- शेतातील पिकांची छायाचित्रे अपलोड करण्यास लागतोय वेळ.
- ॲपमध्ये नोंदणीसंबंधी माहिती भरल्यावर शेवटी दाखल करताना सर्व्हर कनेक्ट होत नाही.
- राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यात नेटवर्क नसलेल्या ठिकाणी ई-पीकपाहणीची नोंद होत नाही.
ई-पीकपाहणीचे टप्पे
- शेतकरीस्तरावरील ई-पीकपाहणी एक ऑगस्टपासून सुरू
- ई-पीकपाहणी ४५ दिवस चालू राहणार
- १५ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणीची मुदत
- १६ सप्टेंबरपासून तलाठी किंवा सहायक स्तरावरील ई-पीकपाहणी सुरू होईल.
- तलाठी आपापल्या पातळीवरील पाहणीची कामे पुढील ३० दिवस म्हणजेच १५ ऑक्टोबरपर्यंत चालू ठेवतील.
गेल्या तीन-चार दिवसांपासून अँड्रॉइड मोबाइलमध्ये सतत प्रयत्न करून मिळाले नाही. नोंदणी होईल या अपेक्षेने शेतात तीन-तीन तास खर्ची घातले आहे. प्रत्येक वेळी प्लीज ट्राय लेटर असाच मेसेज मोबाइलवर येत होता. त्यामुळे प्रशासनाने त्यांची यंत्रणा आधी सुधारावी. त्यानंतर शेतकऱ्यांना संबंधित ॲप वापरण्याची सक्ती करावी.अजय शेटे, शेतकरी, राजुरा बाजार, जि. अमरावती
आमची २० एकर जमीन आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद, केळी, ऊस पिके आहेत. ई-पीकपाहणी करताना पेरणीची तारीख, क्षेत्र, पेरणीची पद्धत, सिंचन सुविधा आदी माहिती भरल्यानंतर इंटरनेटची रेंज व्यवस्थित नसल्यामुळे तो डाटा नष्ट होत आहे. परत परत माहिती भरावी लागत आहे. त्यामुळेही ई-पीकपेरा नोंदणीला खूप वेळ लागत आहे. या अडचणी तत्काळ दूर कराव्यात.पंकज अडकिणे, डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.