Parbhani News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये १ हजार ५०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. सोमवारपर्यंत (ता.८) जिल्ह्यात २७३ लाभार्थी शेतकऱ्यांनी २५८.८४ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. जिल्ह्यात गत वर्षी मोसमी पाऊस कमी झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे फळबाग लागवडीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य दिसत आहे.
जिल्ह्यात २०२३ मध्ये मोसमी पावसाचे आगमन उशिरा झाले. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलै, ऑगस्ट महिन्यात दीर्घ खंड पडला. जून ते ऑक्टोबर या पर्यंतच्या (वार्षिक) पावसाची सरासरी ८३८.९० मिलिमीटर आहे. परंतु प्रत्यक्षात ५२३.५ मिलिमीटर (६२.४० टक्के) पाऊस झाला असून ३१५.४ मिलिमीटर पावसाची तूट झाली आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस मान्सून्नोत्तर पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागातील विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत किंचित वाढ झाली. लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा आहे. उपलब्ध पाण्यावर काही शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे. परंतु त्यांच्यापुढे येत्या पावसाळ्यापर्यंत फळबागा जिवंत ठेवण्याचे आव्हान आहे.
२०२३-२४ यावर्षी परभणी जिल्ह्यात १ हजार ५०० हेक्टर उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील २ हजार ६०२ शेतकऱ्यांनी २ हजार ३१८ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ५८० लाभार्थींना २ हजार २७१ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी २६० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदले आहेत.
सोमवार (ता.८) पर्यंत २७३ लाभार्थींनी २५८.८४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. त्यात सर्व नऊ तालुक्यांमध्ये मिळून एकूण आंबा १३४.१९ हेक्टर, परभणी व गंगाखेड तालुक्यात मिळून एकूण चिकू ३ हेक्टर, परभणी, गंगाखेड, पालम तालुक्यांत मिळून एकूण पेरू ९.५ हेक्टर, परभणी, जिंतूर, मानवत, पूर्णा तालुक्यात एकूण संत्रा ३१.२ हेक्टर लागवड झाली.
सेलू, पाथरी, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांत मिळून एकूण मोसंबी ६.६ हेक्टर, परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड तालुक्यांत एकूण लिंबू १०.४ हेक्टर, परभणी, जिंतूर, सेलू, पालम तालुक्यांत मिळून एकूण सीताफळ ११.३ हेक्टर लागवड झाली. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांत एकूण केळी ३१.२५ हेक्टर, परभणी, सेलू, मानवत, सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यांत एकूण नारळ १०.९ हेक्टर लागवड झाली.
फुलझाडांची ८ हेक्टरवर लागवड आहे.
जिल्ह्यात गतवर्षी (२०२२-२३) मध्ये मनरेगाअंतर्गंत १ हजार २२० हेक्टर उद्दिष्ट असताना १ हजार २६२ हेक्टरवर फळबाग लागवड झाली होती. परंतु उद्दिष्टपूर्ती होणे कठीण आहे.
मनरेगा तालुकानिहाय फळबाग लागवड क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका उद्दिष्ट
क्षेत्र फळबाग लागवड क्षेत्र
परभणी २७० ५४
जिंतूर २७० २१.९
सेलू १४० ३३.९०
मानवत १३५ २३.६०
पाथरी १४० २५.५
सोनपेठ १३० ८.०
गंगाखेड १४० १६.५०
पालम १३५ ४८.४०
पूर्णा १४० २७.०४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.