Downy Mildew in Grapes Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Disease : द्राक्ष पिकातील ‘डाऊनी मिल्ड्यू’

Downy Mildew : द्राक्ष पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मुख्यत: डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, ॲन्थरॅकनोजझ, जिवाणूजन्य करपा इत्यादी महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Team Agrowon

राहुल वडघुले

Grape Disease Update : द्राक्ष पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मुख्यत: डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, ॲन्थरॅकनोजझ, जिवाणूजन्य करपा इत्यादी महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांमुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी प्रत्येक रोगाच्या लक्षणांची माहिती असणे गरजेचे आहे. आजच्या लेखामध्ये द्राक्ष पिकातील ‘डाऊनी मिल्ड्यू’ या रोगाविषयी माहिती घेऊया. या रोगाला केवडा असेही म्हणतात. या रोगाचा प्रादुर्भाव द्राक्ष पिकामध्ये एप्रिल छाटणीच्या शेवटी आणि ऑक्टोबर छाटणीच्या सुरुवातीला आढळून येतो.

रोगाची माहिती :

रोगाचे नाव : डाऊनी मिल्ड्यू (Downy Mildew)

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः प्लाझ्मोपॅरा व्हिटीकोला (Plasmopara viticola)

बुरशीचे डिव्हिजन : Oomycota

परजीवी प्रकार : Obligate parasite

नुकसान : या रोगामुळे द्राक्ष पिकाचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

लक्षणे : पाने, फळे, फांदी यावर दिसून येतात.

सुरुवातीला पानांच्या वरच्या बाजूने पिवळसर, तेलकट ५ ते ६ मिमी आकाराचे ठिपके दिसून येतात. नंतर हे ठिपके एकमेकांमध्ये मिसळतात आणि संपूर्ण पान वाळून जाते.

पानाच्या खालच्या बाजूने रोगाची पांढरी वाढ दिसून येते. ही वाढ कोनीय असून मांजरीच्या फुललेल्या केसांसारखी दिसते. अशा प्रकारची वाढ फळे आणि फांद्यांवर देखील दिसून येते. नंतर फळे तपकिरी होऊन वाळून जातात.

पोषक वातावरण :

हा रोग द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत पावसाळी वातावरणात आढळून येतो.

तापमान १८ ते २५ अंश सेल्सिअस, वाढलेली आर्द्रता असे वातावरण रोगासाठी अत्यंत पोषक असते. अशा वातावरणात रोगाच्या बीजाणूंचे अंकुरण चांगले होते.

रोगाच्या प्रादुर्भाव होण्यासाठी पाने किमान ३ ते ४ तास ओली असणे आवश्यक असते. पानांवर पाणी असल्यावर बीजाणूंचे अंकुरण होते.

पिकाच्या पोंगा अवस्थेत पाणी साचू राहण्याची शक्यता असते. ही अवस्था रोगासाठी पोषक असते.

तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावामुळे किंवा पाण्याचा ताण किंवा पालाश या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे गोळा झालेली पाने पाणी धरून ठेवण्यास अनुकूल बनतात. आणि हेच रोगासाठी पोषक असते.

रोग कसा निर्माण होतो :

रोगाचे तंतू किंवा लैंगिक बीजाणू (उस्पोर) हे जमिनीत, जुन्या पीक अवशेषांवर, वेलीवर जिवंत राहतात. पावसाळ्यात ते सिंगल मॅक्रो स्पोरांजिया (macrosporangia) तयार करतात. या मधून झुस्पोर तयार होतात. हे झुस्पोर पुढे वारा, कीटक, पाणी यांच्यामार्फत यजमान पिकांवर पोचतात. पोषक वातारण तयार झाल्यानंतर मुख्य पिकाच्या खालील पानांवर रोगाची लागण होते. याला ‘प्राथमिक लागण’ असे म्हणतात. रोगाची लागण झाल्यानंतर ३ ते ५ दिवसांत रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. या लक्षणांमधील ठिपक्यांमध्ये अनेक बीजाणूदंड (Sporangiophore) असतात, त्यावर बीजाणूधानी (Sporangia) तयार होते. प्रत्येक बीजाणूधानीमध्ये ४ बीजाणू (झुस्पोर) तयार होतात. हे बीजाणू हवेमार्फत इतर यजमान पिकांवर जातात व रोगाचा प्रसार करतात. यालाच ‘दुय्यम लागण’ असे म्हणतात.

नियंत्रणाचे उपाय :

जास्त पावसाळी स्थितीत छाटणी करू नये.

छाटणीनंतर संपूर्ण वेलीवर बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

छाटणी केलेल्या फांद्या, पाने जाळून नष्ट कराव्यात. किंवा जमिनीमध्ये पुरून त्यावर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

फांद्यांची जास्त गर्दी झालेली नसावी.

बागेत हवा खेळती असावी.

पाने ओली राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करता येईल.

रोगग्रस्त पाने, फांद्या इतर अवशेष बागेत न टाकता, बागेतून नेऊन योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

वेलीवर सुडोमोनास फ्लोरेसंस आणि बॅसिलस सबटीलिस या जैविक घटकांची नियमित १५ ते २० दिवसांनी फवारणी घ्यावी.

पोषक वातावरणात शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करावी.

दव पडत असेल तर स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी किंवा धुरळणी करावी.

रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करावी. हाय रिस्क (ग्रुप ११) मधील बुरशीनाशकांचा वापर शक्यतो टाळावा.

शिफारशीत बुरशीनाशके :

मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूपी)

कॅप्टन (७५ टक्के डब्ल्यूपी)

कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूजी)

डायमिथोमॉर्फ (५० टक्के डब्ल्यूपी)

मेटिराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रोबीन (५ टक्के डब्ल्यूजी)

सायमोक्झॅनील (५० टक्के डब्ल्यूपी)

फोसेटील- एएल (८० टक्के डब्ल्यूपी)

मॅन्डीप्रोपॅमिड (२३.४ टक्के एससी)

मेटॅलॅक्झिल (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी)

सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते?

या रोगाचे बीजाणूधानी (Sporangia) सूक्ष्मदर्शिकेखाली अत्यंत स्पष्टपणे पाहू शकतो. बीजाणूधानी या बीजाणूधानी दंडावर पारदर्शक असतात. त्यांचा एकत्रित आकार हा द्राक्षाच्या घडा सारखाच दिसतो. बीजाणूधानीचा आकार थोडा गोलाकार ते लंबगोलाकार (Spindale or lemon Shape) असतो. बीजाणूधानी जिथे फुटते, तिथे एक निप्पल सारखा भाग दिसतो. तो फुटून त्यामधून झुस्पोर बाहेर येतात.

या रोगाचे बीजाणूधानी (Sporangia) सूक्ष्मदर्शिकेखाली अत्यंत स्पष्टपणे पाहू शकतो. बीजाणूधानी या बीजाणूधानी दंडावर पारदर्शक असतात. त्यांचा एकत्रित आकार हा द्राक्षाच्या घडा सारखाच दिसतो. बीजाणूधानीचा आकार थोडा गोलाकार ते लंबगोलाकार (Spindale or lemon Shape) असतो. बीजाणूधानी जिथे फुटते, तिथे एक निप्पल सारखा भाग दिसतो. तो फुटून त्यामधून झुस्पोर बाहेर येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT