Panchaganga Pollution agrowon
ॲग्रो विशेष

Panchaganga Pollution : मैला, रक्त, काळे फेसाळलेले थेट पाणी पंचगंगा नदीत, प्रदुषण मंडळाकडून पाण्याची चाचणी

Panchaganga Pollution : पंचगंगा प्रदूषणाबाबत दाखल झालेल्या विविध दाव्यानंतर उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी निर्देश दिले होते.

sandeep Shirguppe

River Pollution Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाण्याचे प्रदुषण मंडळाने पाण्याचे नमुणे घेतले. यामध्ये ४२.५ दशलक्ष विनाप्रक्रिया पाणी नदीत मिसळले जात असल्याची पाहणीत समोर आले आहे.

पंचगंगा नदीत थेट कोल्हापूर शहराच्या हद्दीतील ९ विविध नाल्यांमधून काळे, फेसाळलेले, मैला तसेच रक्तमिश्रित दुर्गंधीयुक्त सांडपाणी मिसळत असल्याने पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढत चालले आहे.

यामध्ये जयंती, दुधाळीबरोबरच इतर सात नाल्यांचा समावेश असल्याची माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून समोर आली आहे. पंचगंगा प्रदूषणाबाबत दाखल झालेल्या विविध दाव्यानंतर उच्च न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी निर्देश दिले होते. तसेच त्या निर्देशांच्या पालन करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी देखरेख समिती नेमली होती.

तिला साडेनऊ वर्षे पूर्ण झाली असून, प्रदूषणाची स्थिती जाणून घेण्याची गरज आहे. त्यासाठी याचिकाकर्ते प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी संयुक्त पाहणीची मागणी केली होती.

मागच्या दोन दिवसापूर्वी(ता.१३) कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याने, ती रद्द करून काल (ता.१४) पाहणी करण्यात आली.

शहर परिसरातील पाहणीसाठी देसाई यांच्याबरोबरच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, महापालिकेचे उपायुक्त पंडित पाटील, करवीरचे नायब तहसीलदार भालचंद्र यादव उपस्थित होते.

दुपारी दोन वाजेपर्यंत केलेल्या पाहणीत जयंती नाल्यातून कचऱ्यासह सांडपाणी ओसंडून वाहत होते. तेथील तीन उपसा पंप सुरू असून, नाला वाहत होता. त्याच्या पलीकडे असलेल्या खानविलकर पेट्रोल पंपाजवळील, विश्‍वकर्मा सोसायटीच्या मागील, सिद्धार्थनगर व सीपीआरजवळ सांडपाणी जयंती नाल्यात मिसळून थेट पंचगंगा नदीमध्ये जात असल्याचे दिसून आले.

हे मिसळणारे सांडपाणी काळेकुट्ट, फेसाळलेले, मैलामिश्रित, रक्तमिश्रित असल्याचे देसाई यांनी दाखवून दिले. त्यानंतर राजहंस प्रेसजवळील व कसबा बावडा येथील छत्रपती कॉलनीतील नाला नदीत मिसळत होता. बापट कॅम्प नाल्यावर उपसा केंद्र असून, तिथूनही सांडपाणी वाहून नदीत जात होते. दुधाळी नाल्याच्या पाहणीतही नाला ओसंडून नदीत मिसळत होता.

४२ दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीत

या सर्वांमधून प्लास्टिक कचरा वाहून जात होता. काही ठिकाणी काढला जात असला तरी तो काठावरच असल्याचे पाहणीत दिसून आले. या नाल्यांबरोबरच पुलाची शिरोलीच्या पुलापर्यंत पाहणी केल्यानंतर दोन ते तीन किलोमीटर अंतरात संपूर्ण पात्रात केंदाळ आढळून आले.

शहराच्या हद्दीतून १४९ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. त्यापैकी १०६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था महापालिकेकडे आहे. उर्वरित ४२.५ दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळत असल्याची नोंद पाहणी अहवालात केली आहे.

काळ्या ओढ्यातून घेतले नमुने

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी इचलकरंजीतील काळ्या ओढ्याचीही आज सायंकाळी प्रजासत्ताक सामाजिक संस्था व प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त पाहणी केली. काळ्या ओढ्यासह दोन ठिकाणचे पाण्याने नमुने घेतले. या ओढ्यातून प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या, पण सांडपाणी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत.

तिथे पाणी निर्जंतुकीकरणासाठी बंधारा बांधला आहे. त्याची पाहणी करून बंधाऱ्यातील सांडपाण्याचे नमुने घेतले. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. यावेळी देसाई यांच्याबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते संतोष हत्तीकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT