Food Packaging  Agrowon
ॲग्रो विशेष

Food Packaging : अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी जैवविघटनशील प्लॅस्टिक फिल्म विकसित

Packaging Material : पर्यावरणपूरक पर्याय म्हणून लिंबूवर्गीय फळांच्या सालीतील मुख्य घटक लिमोनेन आणि कवचधारी जलचरांपासून उपलब्ध होणारे चिटीन यापासून जैवविघटनशील प्लॅस्टिक फिल्म तयार करण्यात ब्राझीलमधील संशोधकांना यश आले आहे.

Team Agrowon

Biodegradable Packaging : पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या टाकाऊ घटकाची समस्या वाढत आहे. अशा स्थितीमध्ये त्याला पर्यावरणपूरक पर्याय म्हणून लिंबूवर्गीय फळांच्या सालीतील मुख्य घटक लिमोनेन आणि कवचधारी जलचरांपासून उपलब्ध होणारे चिटीन यापासून जैवविघटनशील प्लॅस्टिक फिल्म तयार करण्यात ब्राझीलमधील संशोधकांना यश आले आहे.

पेट्रोलियम घटकांपासून तयार करण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर पॅकेजिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांचे विघटन होत नाही आणि त्यांचा क्वचितच पुनर्वापर होतो, अशा कारणांमुळे त्याचा कचरा ही मोठी समस्या होत आहे. त्याचे एकूणच पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा शोध घेण्यात येत आहे.

विशेषतः अन्न पदार्थांच्या प्लॅस्टिक पॅकेजिंगसाठीचे पर्याय हे जैवविघटनशील असले पाहिजे. त्याच वेळी त्यांनी अन्न पदार्थाचा रंग, चव, गंध आणि एकूणच पौष्टिक घटकांचे रक्षण करणे अपेक्षित आहे. हे लक्षात घेऊन ब्राझीलच्या सो पाउलो राज्यातील एका संशोधन गटाने लिंबूवर्गीय फळांच्या सालीतील मुख्य घटक लिमोनेन आणि कवचधारी जलचरांपासून उपलब्ध होणारे चिटीन यापासून पॅकेजिंग घटकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.

या संशोधनाचे निष्कर्ष ‘फूड पॅकेजिंग ॲण्ड शेल्फ लाइफ’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. त्याविषयी माहिती देताना प्रा. रोनिरिक पियोली व्हिएरा यांनी सांगितले, की आम्ही लिंबूवर्गीय फळांपासून मिळणाऱ्या लिमोनेनवर लक्ष केंद्रित केले. कारण ब्राझील व त्यातही पाउलो या राज्यामध्ये संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

या लिमोनेन घटकाने त्याच्या अँटिऑक्सिडंट आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मामुळे संशोधकांचे लक्ष आधीपासूनच वेधलेले आहे. त्याचा यापूर्वीही अन्न पॅकेजिंगच्या फिल्ममध्ये वापर करण्याचेही काही प्रयत्न झाले आहे. मात्र अस्थिरता आणि कमी कार्यक्षमतेमुळे अगदी प्रयोगशाळेच्या पातळीवरच त्याच्या मर्यादा लवकर लक्षात आल्या.

अर्थात, जैवकार्यक्षम संयुगांच्या वापरामधील हाच प्रमुख अडथळा ठरतो. तसेच त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये उच्च तापमान आवश्यक असते. हे घटक एकदा कापल्यानंतर त्यांना एकत्र ठेवणाऱ्या घटकांच्या (बायोएक्टिव्ह ॲडिटिव्ह) विघटनाचा वेगही अधिक होतो. जैवप्लॅस्टिक उत्पादनामधील या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही या लिमोनिनपासूनच अधिक स्थिर असा पॉली लिमोनिन हा घटक वेगळा केला आहे.

संशोधकांनी फिल्म मॅट्रिक्ससाठी कवचधारी जलचरांपासून मिळवलेला चिटोसॅन हा घटक निवडला. हा नैसर्गिक पॉलिमर अँटिऑक्सिडेंट आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मांचा आहे. लिमोनेनसोबत त्याचा वापर केल्यामुळे दोघांच्या वाढीव जैवगुणधर्माचा फायदा घेता येईल. मात्र हे दोन्ही घटक सैद्धांतिकदृष्ट्या एकमेकांत न मिसळणारे असल्याने संशोधकांसमोर मोठे आव्हान होते.

त्यासाठी पॉलिमरायझेशनचा पर्याय निवडण्यात आला. पॉलिमरायझेशन प्रक्रियेमध्ये लहान सेंद्रिय रेणूंपासून पॉलिमर बनवले जातात. यात दोन घटकांच्या एकत्रीकरणासाठी वा परस्पर समन्वयासाठी विशिष्ट संयुगाचा वापर केला.

या प्रक्रियेतून तयार केलेल्या फिल्मचे अँटिऑक्सिडंट क्षमता, प्रकाश आणि बाष्पाचे संरक्षण आणि उच्च तापमानास प्रतिकार अशा गुणधर्मांच्या कसोटीवर विश्‍लेषण व परीक्षण करण्यात आले. त्याचे निष्कर्ष अत्यंत समाधानकारक मिळाले. सामान्य लिमोनिन असलेल्या पॅकेजिंगच्या तुलनेमध्ये पॉली(लिमोनिन) असलेल्या पॅकेजिंग उत्तम ठरले.

विशेषत: अँटिऑक्सिडंट घटक टिकवून ठेवण्यात दुप्पट उपयोगी असल्याचे व्हिएरा यांनी सांगितले. तसेच ते अतिनील किरणांना रोखण्यात समाधानकारक ठरले. सध्या प्रयोगशाळेतील परिणाम उत्तम मिळाले असले तरी पुढील टप्प्यात प्रत्यक्ष व्यावसायिक पातळीवर त्याची चाचणी व परीक्षण करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT