Beed News : बीड : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मागेल त्याला सोलार या योजनेसाठी महावितरणकडे पैसे भरूनही सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाकडून शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठ्यासाठी मागेल त्याला सोलार पंप योजना सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाणी असूनही सौरपंप नसल्यामुळे अडचण येत आहे, तर याबाबत कुठलाही अधिकारी माहिती देण्यास तयार नाही. महावितरणने तत्काळ सोलार योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी नवीन विहिरी, कूपनलिका खोदल्या आहेत. यासाठी मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत अनेकांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सोलार पंपासाठी अर्ज भरले होते. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस या योजनेची साइट बंद झाली.
यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहिले, तर काहींचे गट साइटवर ओपन होत नसल्याने मोठ्या अडचणी आल्या. दरम्यान, निवडणुकीनंतर ही साइट आता पुन्हा सुरू झाली आणि शेकडो शेतकऱ्यांनी यासाठी पैसे भरले. मात्र, अगोदर आचारसंहितेनंतर रेंगाळलेले मुख्यमंत्रिपद, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार व मंत्रिमंडळ होऊनही वाटप न झालेली खाती या गोंधळात शेतकऱ्यांनी महावितरणकडे भरलेले पैसे पडून आहेत.
पैसे भरल्यानंतर सोलारची कंपनी निवडता येत नाही, तसा पर्यायही नाही, तर दुसरीकडे नव्या शासनाचा कंपनीशी करारही झालेला नाही. यामुळे पैसे भरूनही शेतकऱ्यांना अनेकवेळा मागूनही सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पैसे भरल्यानंतर सोलार पंप कधी मिळेल, याबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही. महावितरणचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.