Dairy Business Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : कुशल व्यवस्थापनातून केला दुग्धव्यवसाय फायदेशीर

Milk Production : कोल्हापूर जिल्ह्यातील पुनाळ (ता. पन्हाळा) येथील प्रदीप गायकवाड यांनी कुशल व्यवस्थापनाच्या आधारे दुग्धव्यवसाय यशस्वी केला आहे.

Raj Chougule

राजकुमार चौगुले

Animal Care : कोल्हापूर जिल्ह्यातील पुनाळ (ता. पन्हाळा) येथील प्रदीप गायकवाड यांनी कुशल व्यवस्थापनाच्या आधारे दुग्धव्यवसाय यशस्वी केला आहे. गोठ्यातच जातिवंत जनावरांच्या पैदाशीला प्राधान्य देत त्यांची संख्या हळूहळू वाढविली. चारा, खाद्याचे योग्य नियोजन व कुटुंबातील सर्व सदस्यांची मदत यामुळेच व्यवसायातील आर्थिक गणित उत्तम प्रकारे सांभाळणे त्यांना शक्य झाले. .
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हा जास्त पाऊस असलेला तालुका आहे. तालुक्यातील अनेक गावे दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत. तालुक्यातील पुनाळ गावातील प्रदीप गायकवाड हे अभ्यासू शेतकरी आहेत. त्यांचे सुमारे पंधरा जणांचे एकत्रित कुटुंब आहे. सुमारे दहा एकर शेती असून आठ एकर उसाची तर दोन एकरांत चारा पिकांची लागवड असते. लहानपणापासूनच जनावरांची आवड असल्याने पदवी नंतर प्रदीप यांनी दुग्ध व्यवसायालाच प्राधान्य दिले.


गोठा व्यवस्थापन (ठळक बाबी)
-दहा वर्षापासून गोठ्यातील जनावरे वाढविण्यास सुरुवात. सुरुवातीला दोन म्हशी
होत्या. सध्या मुऱ्हा जातीच्या अकरा म्हशी, एचएफ जातीच्या नऊ गायी तर सात वासरे एवढी संपदा. प्रति दिन १२ ते १४ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या म्हशी तर २६ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी.
- ७५ बाय ५० फूट आकाराचा गोठा. मुक्त पद्धतीचीही सुविधा. एका भागात म्हशी, दुसऱ्या भागात गायी, तर तिसऱ्या भागात वासरे.
- गोठ्यास भेट देणाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी छोटी खोली.
- वेळच्या वेळी लसीकरण व आरोग्यावर बारकाईने लक्ष यामुळे जनावरे आजारी राहाण्याची संख्या कमी.
-वासरे, नुकतीच व्यालेली गाय, म्हैस, दुभती व भाकड जनावरे असे वर्गीकरण करून खाद्य व्यवस्थापन, यात गोळी पेंड, हरभरा कळणा, सरकी पेंड, मका चुनी, गहू भुस्सा आदींचा समावेश.
- संतुलित चारा मिळावा यासाठी वैविध्यपूर्ण पिकांची लागवड. यात मक्यासह ज्वारीचे प्रथिनयुक्त सुधारित वाण, नेपियर आदींना प्राधान्य.
- उन्हाळी हंगामात कडबा कुट्टीचे संकलन करून पावसाळ्यासाठी तजवीज. अति पावसाचा हा भाग असल्याने हे नियोजन महत्त्वाचे. हरभरा, गव्हाचे टरफल आदी कोरड्या चाऱ्याचेही संकलन.
-प्रति जनावर १० ते १५ किलो कोरडा तर २० किलो ओला चारा. हिरव्या चाऱ्यात पाच ते सात किलो मुरघास.
-जनावरांसाठी समाधानी व आनंदी वातावरण तयार करण्यासाठी ठराविक वेळेत संगीत ऐकविले जाते.

अर्थकारण
व्यवसायात दुधाचे दररोज ठराविक संकलन होण्याकडे लक्ष द्यावे लागते. हा विचार करून बाराही महिने दुधाची आवश्यक सरासरी ठेवण्यावर भर दिला. गायी, म्हशींचे मिळून दररोज शंभर लिटरच्या आसपास दूध संकलन होते. म्हशीच्या दुधाचे फॅट ८, एसएनएफ १० पर्यंत तर गायीच्या दुधाचे फॅट ४ व एसएनएफ ९ पर्यंत असते. सर्व दूध गोकूळ संघास दिले जाते. म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६२ रुपयांपर्यंत तर गायीच्या दुधाला ४१ रुपयांपर्यंत दर मिळतो. महिन्याला खर्च वजा जाता ४० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो.

कुटुंब राबते गोठ्यात

गोठ्याचे नियोजन करताना स्थानिक किंवा परप्रांतीय मजुरांवर अवलंबून राहण्याचे कटाक्षाने टाळले. कुटुंबातील सदस्यांच्या साथीने नियोजन उत्तम प्रकारे केले. यात प्रदीप यांच्यासह वडील जयसिंगराव, आई सुमन, पत्नी निलम, काका बजरंग, काकी मालती, भाऊ प्रशांत, भावजय अश्विनी आदींचा समावेश आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास
गोठ्यातील कामे सुरू होतात. यंत्राद्वारे दूध काढणी होते. सर्वांच्या कामांच्या समन्वयातून
दुधाचा वेळेत पुरवठा करणे शक्य होते. .

गोठ्यातच पैदाशीवर भर

अन्य राज्यांतून जनावरे आणून त्यांचे व्यवस्थापन आर्थिक दृष्ट्या आव्हानात्मक असते. अनेकदा गोठे चालवणे अशक्य होते. हा अनुभव लक्षात घेऊन गोठ्यातच जातिवंत जनावरांची पैदास करण्यावर भर दिला. वासरांच्या वाढीसाठी आवश्यक खाद्य दूध संघासह अन्य ठिकाणाहून आणले. पाणी, चारा, आहार, आरोग्य यांचे व्यवस्थापन ठेवले.. विविध कंपन्या, दूध संघांकडील वीर्यमात्रांचा अभ्यास करून कृत्रिम रेतनाचा वापर केला. दूध उत्पादनही वाढले. जनावराचे वय, वेतांची संख्या, औषधोपचार, गाभण तारीख आदी सर्व तपशिलांची नोंद ठेवली आहे.

कुशल व्यवस्थापन ठरले महत्त्वाचे
उत्‍कृष्ट दुग्‍धोत्पादनासाठी जिल्‍हा परिषद व गोकूळ दूध संघाकडून प्रदीप यांचा पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. उत्पादन खर्च नियंत्रित ठेवून नफा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुग्धोत्पादकांशी सातत्याचा संपर्क, दूध संघाच्या योजनांमध्ये सहभाग यातून सातत्याने व्यवसायात सुधारणा करता आली.

प्रदीप गायकवाड, ९७६७१३६७७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT