शेतकरी ः ओम श्रीपतराव पाटील
गाव : माजंरम ता. नायगाव, जि. नांदेड
एकूण गाई : ७
----------------------
Dairy Business : नांदेड जिल्ह्यातील माजंरम (ता. नायगाव) येथील ओम श्रीपतराव पाटील यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांची १० एकर शेती आहे. त्यात शेतीला पूरक म्हणून मागील पाच वर्षांपासून दुग्ध व्यवसायास (Dairy Business) सुरुवात केली. दोन गाईंपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय ७ गायींपर्यंत पोहोचला आहे. त्यापासून दररोज १०० लिटर दूध मिळते. गावातील एका डेअरीमध्ये ३७ रुपये प्रतिलिटर दराने दुधाची विक्री केली जाते.
दूध विक्रीतून दर महिन्याला एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सोबतच दरवर्षी शेणखत विक्रीतून ५० हजार रुपये मिळतात. शिवाय दहा एकरांपैकी ८ एकरांत खरिपामध्ये सोयाबीन, तर दोन एकरांमध्ये चारा पिकांची लागवड केली जाते.
शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे ओम पाटील सांगतात. - जनावरांसाठी शेतामध्येच ४० बाय २२ फूट आकारचा गोठा उभारला आहे. त्याशेजारील जमिनीत गजराज गवत व कडवळ लागवड केली आहे.
व्यवस्थापनातील बाबी ः
- दररोज सकाळी चार वाजता गोठ्यातील कामांस सुरुवात होते.
- गोठ्यातील शेण काढून स्वच्छता केली जाते. त्यानंतर दूध काढणीस सुरुवात होते.
- जनावरांना दररोज सकाळी आणि सायंकाळी ओला चारा १२ किलो, सुका चारा ३ किलो याप्रमाणे दिला जातो. त्यात नेपियर गवत, कडवळ व कडबा याचे नियोजन केले जाते. शिवाय प्रति जनावर एक किलो खाद्य, पेंड, ५० ग्रॅम खनिज मिश्रण दिले जाते.
- पुन्हा सायंकाळी चार पाच वाजता दूध काढून चारा दिला जातो.
- सध्या दोन्ही वेळचे मिळून प्रतिदिन १०० लिटर दुधाचे संकलन होते.
- जनावरांना वेळापत्रकानुसार वेळोवेळी लसीकरण केले जाते.
सकस मुरघास ः
चाराटंचाईच्या काळात जनावरांना सकस आहार उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी दोन एकरांत मका लागवड केली जाते. त्यापासून दरवर्षी मुरघास निर्मिती केली जाते. साधारण डिसेंबर-जानेवारीमध्ये मक्याची पेरणी केली जाते. मका पक्व झाल्यानंतर त्याची कापणी करून एक दिवस शेतात तसाच ठेवला जातो.
त्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर त्याची कडबा कुट्टी यंत्राद्वारे कापणी कुट्टी केली जाते. ही कुट्टी एक टन क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून हवाबंद करून ठेवला जातो. दरवर्षी साधारण दहा बॅग कुट्टी भरून ठेवली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात चाराटंचाईच्या काळात जनावरांना सकस खाद्य उपलब्ध होण्यास मदत होते. मुरघासमुळे दुधात सातत्य राखण्यात ओम पाटील यशस्वी झाले आहेत.
लसीकरण नियोजन ः
जनावरांना विविध आजारांपासून संरक्षण होण्यासाठी लसीकरणावर भर दिला जातो. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी फऱ्या आणि घटसर्प या आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. जनावरांना वेतानंतर कॅल्शिअमचा पुरवठा केला जातो. खुराकासोबत ५० खनिज मिश्रण दिले जाते.
- ओम पाटील, ९०९६५६५१५८
(शब्दांकन ः कृष्णा जोमेगावकर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.