Varai Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Healthy Varai : आरोग्यदायी वरईची लागवड

Varai Farming : संयुक्त राष्ट्रसंघाने गत वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून साजरे केले. त्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, कोद्रा, कुटकी, सावा, राळा, वरई (भगर) या पिकांचा समावेश होतो.

Team Agrowon

डॉ. विशाल गमे, डॉ. धीरज निकम, स्मिता प्रचंड

Varai Production : संयुक्त राष्ट्रसंघाने गत वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून साजरे केले. त्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, कोद्रा, कुटकी, सावा, राळा, वरई (भगर) या पिकांचा समावेश होतो. जागतिक उत्पादनाच्या सुमारे ४१ टक्के भरडधान्य उत्पादन भारतात होते. त्यातील वरई पिकाकडे आपल्याकडे केवळ उपवासाचे पीक म्हणून पाहिले जात असले तरी रोजच्या आहारामध्ये घेण्याइतपत ती आरोग्यदायी आहे.

लागवड : महाराष्ट्रातील प्रामुख्याने घाट व उपपर्वतीय विभागातील नाशिक, अकोले (जि. नगर), नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, धुळे या जिल्ह्यांमध्ये, तर कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते.

पौष्टिक तत्त्वे

वरई मध्ये स्निग्ध पदार्थ, तंतूमय पदार्थ, खनिज व लोह या मुलद्रव्यांचे प्रमाण गहू आणि भात पिकापेक्षा चांगले आहे. उपवासाला वरईचा भात अथवा भाकरी खाल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचे पित्त होत नाही. वरईपासून बिस्कीट, भात, भाकरी, लाडू, शेवया, चकली, शेव इ करता येतात. वरईमध्ये प्रती १०० ग्रॅम मध्ये कर्बोदके-७०.४ ग्रॅम, प्रथिने-१२.५ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ-१.१०ग्रॅम, ऊर्जा-३४१ कि. कॅलरी, कॅल्शिअम-१४ मिलिग्रॅम, मॅग्नेशिअम-१५३ मिलिग्रॅम, लोह-०.८ मिलि ग्रॅम, थायमिन-०. ४१ मिलिग्रॅम, रायबोफ्लेवीन-०.२८ मिलिग्रॅम व नियासिन-४.५ मिलिग्रॅम ही पोषक तत्त्वे आढळून येतात.

पौष्टिक तत्त्वे

वरई मध्ये स्निग्ध पदार्थ, तंतूमय पदार्थ, खनिज व लोह या मुलद्रव्यांचे प्रमाण गहू आणि भात पिकापेक्षा चांगले आहे. उपवासाला वरईचा भात अथवा भाकरी खाल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचे पित्त होत नाही. वरईपासून बिस्कीट, भात, भाकरी, लाडू, शेवया, चकली, शेव इ करता येतात. वरईमध्ये प्रती १०० ग्रॅम मध्ये कर्बोदके-७०.४ ग्रॅम, प्रथिने-१२.५ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ-१.१०ग्रॅम, ऊर्जा-३४१ कि. कॅलरी, कॅल्शिअम-१४ मिलिग्रॅम, मॅग्नेशिअम-१५३ मिलिग्रॅम, लोह-०.८ मिलि ग्रॅम, थायमिन-०. ४१ मिलिग्रॅम, रायबोफ्लेवीन-०.२८ मिलिग्रॅम व नियासिन-४.५ मिलिग्रॅम ही पोषक तत्त्वे आढळून येतात.

हवामान व जमीन

वरई पिकाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील अतिपावसाच्या उप-पर्वतीय विभाग, पश्चिम घाट विभाग आणि कोकण विभागातील डोंगर उताराच्या जमिनीवर केली जाते. वरई पीक उष्ण व समशितोष्ण प्रदेशात २५०० मिमि. पर्यंत वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्या भागात समुद्र सपाटीपासून १००० ते १८०० मीटर उंचीपर्यंत घेतले जाते. या पिकाच्या वाढीसाठी कमाल २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान पोषक असते. वरई पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते मध्यम मगदुराची पूर्ण निचऱ्याची व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य असलेली जमीन योग्य आहे.

पूर्व मशागत

जमिनीची उताराला आडव्या दिशेने चांगली नांगरणी करावी. उतारानुसार ठराविक अंतरावर समतल चर किंवा समतल बांध काढावेत. नांगरणीनंतर हेक्टरी १५ ते २० गाड्या शेणखत टाकून कुळवाने जमिनीत मिसळून घ्यावे.

सुधारित जाती

महाराष्ट्र राज्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून विकसित वरई पिकाच्या सुधारित ‘फुले एकादशी’ या वाणाची शिफारस आहे. हा उशिरा पक्व होणारा (गरवा) वाण १२० ते १३० दिवसात काढणीस तयार होतो. मध्यम वाढीसह न लोळणाऱ्या या वाणाची कणसे खाली वाकणारी, लांब आहेत. दाण्याचा रंग चकाकदार तांबूस आहे. झाडाचे खोड जाड, गडद हिरव्या रंगाचे असून काढणीपर्यंत हिरवे राहते.

पेरणी

खरीप हंगामात पाऊस पडल्यावर साधारण जून ते जुलै च्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पेरणी करावी. त्याची लागवड पेरणी, टोकण अथवा रोपे लागवडीनेही करता येते. ओळीत पेरणी केल्यास हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे लागते. रोपे लागवड करणार असला रोपवाटिकेमध्ये गादीवाफ्यावर हेक्टरी ४ ते ५ किलो बियाणे ओळीमध्ये पेरून घ्यावे. उत्तम उगवणीसाठी पेरताना ते १ ते १.५ सें.मी पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. साधारण २०-२५ दिवसांची रोपे झाल्यावर या रोपांची दोन ओळींमध्ये ३० सें.मी आणि दोन रोपात १० सें.मी अंतर ठेवत पुनर्लागवड करावी.

बीजप्रक्रिया

बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक किलो बियाण्यास ३ ते ४ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. बियाणे पेरणीपूर्वी ‘अझोस्पिरिलम ब्रासिलेंस’ आणि ‘अस्पर्जीलस अवामोरी’ या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रक्रिया करावी. यामुळे हवेतील नत्र स्थिर होऊन उत्पादनात १० ते १५% वाढ होते.

आंतरमशागत

सुरुवातीच्या संथ वाढीमुळे वरईमध्ये तणनियंत्रण महत्त्वाचे आहे. तण नियंत्रणासाठी एक कोळपणी करून गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.

खत व्यवस्थापन

हेक्टरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाशची मात्रा द्यावी. यापैकी अर्ध्या नत्राचा हप्ता आणि संपूर्ण स्फुरद व पालाश खते ही पेरणीवेळी द्यावीत. राहिलेले अर्धे नत्र पीक एक महिन्याचे झाल्यानंतर द्यावे.

डॉ. विशाल गमे, ९४०३९२९६१७

(सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दु. सि. पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT