Seed Germination Test
Seed Germination TestAgrowon

Seed Germination Test : पेरणीपूर्वी करा बियाणे उगवणक्षमता तपासणी

Kharif Season : शेतकऱ्यांना हंगाम सुरू होतेवेळी बियाण्यांची उपलब्धता, बियाण्यांची शुद्धता, भेसळ, उगवणक्षमता अशा बियाण्यांशी निगडित अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
Published on

डॉ. अंबालिका चौधरी, बालाजी चौधरी

Indian Agriculture : शेतकऱ्यांना हंगाम सुरू होतेवेळी बियाण्यांची उपलब्धता, बियाण्यांची शुद्धता, भेसळ, उगवणक्षमता अशा बियाण्यांशी निगडित अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

जर घरचे किंवा अन्य शेतकऱ्यांचे बियाणे वापरणार असेल, तर त्याची उगवणक्षमता तपासून घेणे गरजेचे असते, अन्यथा दुबार पेरणीसारख्या संकटालाही सामोरे जावे लागू शकते. पेरणीपूर्व जर बियाण्याची उगवणक्षमता तपासली तर अशा गोष्टी टाळता येऊ शकतात.

उगवणक्षमता कशी तपासावी?

उगवणक्षमता तपासणीसाठी बियाण्यांतून त्या संपूर्ण बियाण्यांचा प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना काढावा. त्याकरिता प्रत्येक पोत्यामधून खोलवर हात घालून मूठभर बियाणे काढावे. सर्व पोत्यांतील काढलेले बियाणे व्यवस्थित एकत्र करावे.

त्यातून प्रातिनिधिक नमुना घ्यावा. या नमुन्यातून तपासणीकरिता ४०० दाणे न निवडता सरसकट घ्यावेत. १०० -१०० दाण्यांचा एक याप्रमाणे ४ भाग करावेत. अचूक उगवणक्षमतेसाठी जास्त दाणे घेणे कधीही चांगले.

Seed Germination Test
Indian Agriculture : पीक बदल, गोपालनातून रोहणवाडीची अर्थकारणाला गती

बीजोत्पादन कंपन्या बियाण्याची उगवणक्षमता प्रयोगशाळेत तपासतात. या प्रयोगशाळेमध्ये बियाण्यास योग्य असे तापमान व आर्द्रता राखण्यासाठी उगवण कक्षाचा वापर केला जातो. त्याच प्रमाणे ओलावा धरून ठेवणाऱ्या शोषकागदाचा वापर केला जातो. यामध्ये एका काचेच्या प्लेटमध्ये शोषकागद ठेवून तो ओला केला जातो. अशा प्लेटमध्ये बी मोजून ठेवावे. १०० बिया घेतल्यास अशा ४ काचेच्या प्लेट तयार करून घेतात. त्या प्लेटवर झाकण ठेवून आतील ओलावा टिकून राहील याची काळजी घेतली जाते.

पेरणीची हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना प्रत्येकवेळी प्रयोगशाळेत जाऊन उगवणक्षमता तपासणी करणे शक्य नसते. अशा घरगुती साधनांतून उगवणक्षमता तपासणीच्या काही सोप्या पद्धती वापरता येतात. घरगुती पद्धती पुढील प्रमाणे...

कागदामध्ये बियाणे घेऊन उगवणक्षमता तपासणी : उगवणक्षमता तपासणीचे दोन कागद ओले करून घ्यावे. ओल्या केलेल्या दोन कागदांच्या मध्ये १०० बिया १० ओळींत समान अंतरावर ठेवून घ्याव्यात. कागदाची गोल गुंडाळी करून घ्यावी. दोन्ही बाजूंनी रबर लावावे. प्रत्येकी १०० बिया या प्रमाणे कागदाच्या ४ गुंडाळ्या करून घ्याव्यात. त्यातील ओलावा टिकून राहील, याची काळजी घ्यावी.

रेती/ मातीमध्ये उगवणक्षमता तपासणी : ४ कुंड्यांमध्ये किंवा प्लॅस्टिक ट्रेमध्ये बारीक रेती किंवा ज्या शेतात पेरणी करावयाची आहे तेथील माती भरावी. त्यास हलके पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी चारही कुंड्यांमध्ये किंवा ट्रेमध्ये प्रत्येकी १०० बिया १ ते २ सें. मी. खोलीवर लावाव्यात. मातीतील किंवा रेतीतील ओलावा टिकून ठेवावा. परंतु जास्त पाणी होणार नाही याची काळजीही घ्यावी.

Seed Germination Test
Indian Agriculture : एकत्र या, शेती टिकेल

गोणपाटाच्या तुकड्याचाही वापर उगवणक्षमता तपासणीसाठी करता येतो. त्याकरिता आयताकृती आकाराचा साधारणतः १ फूट × १.५ फूट आकाराचा गोणपाटाचा तुकडा घेऊन तो ओला करून घ्यावा.

त्यावर १०० बिया १० ओळींत समान अंतरावर ठेवाव्यात. बियाण्यासहित गोणपाटाची गुंडाळी करून घ्यावी. अशा ४ गोणपाटांच्या गुंडाळ्या करून घ्याव्यात. ओलावा टिकवून ठेवावा, परंतु जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी.

वरील पैकी कोणतीही पद्धत वापरली तरी साधारणतः ८ ते १० दिवसांत बियाण्यांची उगवण होते. आपण ठेवलेल्या बियाण्यांपैकी कितीला कोंब निघाले आहेत, हे मोजावेत. विकृत रोपे, सडलेले बी, कठीण व टणक बी मोजणीत घेऊ नये. चारही नमुन्यांची सरासरी काढून उगवणक्षमतेची टक्केवारी काढावी.

ही टक्केवारी आपल्याला सरासरी उगवणक्षमतेचा अंदाज देते.बियाण्याची उगवणक्षमता प्रमाणित केलेल्या उगवणक्षमतेपेक्षा अधिक असेल तर ते बियाणे पेरणीस योग्य असते. प्रमाणित उगवणक्षमतेपेक्षा ५-८ टक्के उगवणक्षमता कमी असल्यास एकरी बियाण्यात १० टक्क्यांनी वाढ करावी. परंतु उगवणक्षमता फारच कमी असल्यास तर असे बियाणे पेरणीसाठी वापरू नये.

डॉ. अंबालिका चौधरी, ९८३४६६५९६५ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com