Lasuan Sheti Agrowon
ॲग्रो विशेष

Lasun Sheti : लसूण घासची शेती, देई खेळता पैसा हाती

Santosh Munde

Success Story : शहरानजीक असल्यामुळे चिकलठाणासह बाळापूर, देवळा, मूर्तिजापूर, ब्रिजवाडी या गाव शिवारात नागरी वसाहती वाढल्या आहेत. शेतीचे क्षेत्र घटत असून, अल्पभूधारकांची संख्या वाढली आहे. काही एकत्र कुटुंबांमध्ये थोडे अधिक क्षेत्र दिसते.

या परिसरामध्ये शेतकरी अगदी दोन, तीन पिढ्यांपासून साधारणतः १० गुंठ्यांपासून तीन ते चार एकरांपर्यंत लसूण घासची शेती करत आहेत. अनेक जण आपल्या शेतीसोबत अन्य शेतकऱ्यांची शेतीही बटईने करत आहेत.

त्यातील सुमारे पाच टक्के शेतकरी स्वतःच्या जनावरांसाठी चारा म्हणून त्याची लागवड करत असले तरी उर्वरित शेतकरी लसूण घासची व दर अडीच ते तीन वर्षांनी त्याच्या बियाण्यांची विक्री करतात.

...असा आहे क्षेत्र विस्तार

चिकलठाणा शिवारात १७२१ हेक्टर क्षेत्र असून, त्यातील १२२७ हेक्टर वहितीखाली आहे. त्यापैकी ५८ हेक्टर क्षेत्रावर बारमाही लसूणघास केला जातो. ब्रिजवाडी शिवारातील एकूण ३०६ हेक्टर क्षेत्रापैकी १४१ हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे.

त्यापैकी १९ हेक्टर क्षेत्रावर लसूणघास घेतला जातो. मूर्तिजापूर शिवारातील ३०० हेक्टर क्षेत्रापैकी १३४ हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. त्यापैकी १७ हेक्टर क्षेत्रावर लसूण घास घेतला जातो.

लागवडीची वेळ व पद्धत

प्रत्येक शेतकरी साधारणतः दिवाळीनंतर लसूणघासची लागवड करतात. साधारणतः एक एकरात पाच फूट रुंद व शेताच्या आकारमानानुसार लांब अशा पद्धतीने सऱ्या पाडल्या जातात. त्यामध्ये साधारणतः प्रत्येक सरीला पाऊण बॅग प्रमाणे साधारणपणे एकरी १२ बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खत दिले जाते. त्यानंतर एकरी साधारणतः २० ते २२ किलो लसूण घास बियाणे फोकून पाणी सोडले जाते.

...अशी आहे काढणी व विक्रीची पद्धत

लागवडीनंतर साधारणतः दीड महिन्याने लसूण घास कापणीला सुरुवात होते. दररोज एका सरीतील गवताची कापणी करून विक्री केली जाते. त्यानंतर प्रत्येक २१ दिवसाला प्रत्येक सरीमधील लसूण घास कापणीला येतो. एका सरीमधून साधारणतः ३०० ते ३५० लसूण घास पेंढ्या एकावेळी मिळतात.

ही कापणी दररोज दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत केली जाते. या गवताची विक्री सकाळी सहा ते आठपर्यंत केली जाते. व्यापारी थेट बांधावरून प्रति पेंडी तीन रुपये प्रमाणे खरेदी करतात, तर किरकोळ विक्रीत पाच रुपये प्रति पेंडी असा दर मिळतो. एक एकर लसूण घास लागवडीतून आठवड्याला पाच ते सहा हजार रुपये निश्‍चित उत्पन्न मिळते.

याचा उत्पादन खर्च कमी असून, घरातील व्यक्तीच कापणी करत असल्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो. वर्षाकाठी एक एकर लसूण घासतून किमान ३ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

विक्रीच्या व्यवसायातही उतरले शेतकरी

चिकलठाणा शिवारातील जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांनी स्वतःच्या उत्पादनासोबतच अन्य शेतकऱ्यांच्या लसूण घासची खरेदी करून विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी मालवाहू वाहनाची तजवीजही केली आहे.

हे शेतकरी थेट बांधावर जाऊन ३ रुपये प्रति पेंडी या प्रमाणे लसूणघासची खरेदी करतात. हा लसूण घास काही ग्राहकांना थेट घरपोच दिला जातो, तर काही व्यापारी, शेतकरी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी उभे राहून विक्री करतात. यातून खर्च वजा जाता त्यांना प्रति पेंडी एक ते दोन रुपये इतका नफा मिळतो.

बियाणे उत्पादन व विक्री

एकदा लागवड केल्यानंतर लसूण घास साधारणतः अडीच वर्षे चालतो. अडीच वर्षांनंतर मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये तो प्लॉट बियाण्यासाठी सोडला जातो. या घासला आलेले बी पक्व झाल्यानंतर कापणी केली जाते. सुकवल्यानंतर मळणी यंत्रातून बियाणे वेगळे केले जाते. सामान्यतः एकरी एक क्विंटलपर्यंत बियाणे मिळते.

साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात बियाणे काढून शेत मोकळे होते. या बियाण्याला दर्जाप्रमाणे ६०० ते १५०० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो. दर तीन वर्षांतून एकदा बियाणे विक्रीतून ६० हजारांपासून दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.

दुग्ध व्यवसाय वाढला

जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे चाऱ्याची उपलब्धता असल्यामुळे दुभत्या जनावरांचे पालनही केले जाते. कुटुंबाकडे किमान एक ते आठ जनावरे आहे. त्यातही संकरित गाईंचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे लसूण घासच्या उत्पादनाला दुधाच्या उत्पादनाची जोडही मिळाली आहे. हेही उत्पन्न दर आठवड्याला हाती येते.

माझ्याकडे चार एकर शेती असून, त्यातील तीन एकरांमध्ये लसूण घास करतो. उरलेल्या एक एकरात गहू, मका पीक घेतो. शेतीसोबतच १९८५ पासून अन्य शेतकऱ्यांकडून लसूण घासची खरेदी करून विक्रीचा जोडधंदा करत आहे. दररोज ९०० ते १००० पेंडी विकल्या जातात. लसूण घासमुळे कुटुंबाचे अर्थकारण मजबूत झाले आहे.
कारभारी कोरडे (लसूण घास उत्पादक व विक्रेते चिकलठाणा)
एकत्र कुटुंबाची दहा एकर शेती असून, त्यापैकी दीड एकरावर लसूण घास घेतो. ५० वर्षांपासून आमचे कुटुंब लसूण घास घेत आहे. एक एकरातून आठवड्याला पाच ते सहा हजार रुपये या प्रमाणे वर्षाकाठी किमान सव्वातीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
बंडू रावसाहेब दहीहंडे, ९४२२८१०११३ (लसूण घास उत्पादक, चिकलठाणा)
कुटुंबात पाच एकर शेतीपैकी एक एकर लसूण घास कायम असतो. त्याचा चारा दोन बैल व दोन संकरित दुभत्या गाईंसाठी वापरला जातो. दररोज आठ ते दहा लिटर दूध मिळते. घरगुती गरज भागून पाच ते सात लिटर विकले जाते. त्यातून कुटुंबामध्ये खेळता पैसा राहतो.
जगन्नाथ माधवराव नवपुते, (चिकलठाणा)
शेती उत्पन्नामध्ये प्रचंड अस्थिरता असताना चिकलठाणा येथील शेतकरी लसूण घास उत्पादनातून प्रति माह २० ते २५ हजार रुपये निश्‍चित उत्पन्न मिळवीत आहेत. त्यातून त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य येण्यास मदत झाली आहे.
विश्‍वास जाधव, ९४२२९०५१९२, (मंडळ कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर)
नियमित काढणी आणि काढणीनंतर थेट बांधावरून होत असलेली खरेदी यामुळे शेतकऱ्यांना लसूणघासतून दर आठवड्याला किमान पाच ते सहा हजार रुपये मिळवून देतो. चाऱ्यामुळे बहुतेकांच्या घरी दुग्ध व्यवसायही टिकून राहिला आहे. या दोन्हींतून हाती येणारा खेळता पैसा शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करत आहे.
आशा राठोड, ७५८८६४४३२७, (कृषी सहायक, चिकलठाणा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT