Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पाऊस, जोरदार वादळामुळे पिकांचे नुकसान

Heavy Rain Crop Damage : पश्चिम विदर्भात रविवारी (ता.२६) रात्री आलेला वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे खरिपातील पिके तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Akola News : पश्चिम विदर्भात रविवारी (ता.२६) रात्री आलेला वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे खरिपातील पिके तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी दिलासा देणारा मानला जात आहे. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. बाळापूर तालुक्यात ८ मेंढ्या दगावल्या.

रविवारी (ता.२६) रात्री या भागात विजांच्या कडकडासह वादळी पावसाने धुमाकूळ घातला. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी लागलेली आहे. सोमवारी (ता.२७) सुद्धा अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. हवामान खात्याने या भागात २६ ते २८ नोव्हेंबर या काळात पाऊस, गारपिटीचा इशारा आधीच दिला होता. रविवारी दुपारपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते.

सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस झाला. रात्री १० नंतर बहुतांश भागात पावसाने जोर धरला. यामुळे टोमॅटो, मिरची, वेलवर्गीय फळभाज्यांचे नुकसान झाले. काही भागात वादळामुळे ही पिके जमीनदोस्त झाली.

सध्या खरिपातील कपाशी, तसेच तुरीचे पीक उभे आहे. वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतांमध्ये कपाशीच्या झाडांवर कापूस होता. हा कापूस पावसाने ओला झाला. कापूस आता लोंबकळला आहे. ओला झाल्याने हा कापूस आता पिवळा पडून दर्जा खालावण्याची चिंता आहे. वाशीम जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. कपाशीच्या पिकात पाणी साचले.

तुरीला फायदा व मारकही

हा पाऊस कोरडवाहू क्षेत्रातील तुरीच्या पिकाला फायदेशीर ठरू शकतो. तर फुलोरावस्थेतील तुरीच्या पिकाला बाधकही ठरू शकतो. सध्या तुरीचे पीक फुलोऱ्यात असून विजांच्या कडकडाटामुळे याचा मोठा परिणाम तुरीच्या फुलोऱ्यावर होऊ शकतो. शिवाय आधीच तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढलेला होता. या वातावरणामुळे आणखी पोषक वातावरण किडीला मिळणार आहे.

रब्बीसाठी फायदेशीर

हा पाऊस प्रामुख्याने रब्बीसाठी फायदेशीर ठरणार आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी लागवड रखडत चालली होती. सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात पेरणी सुरू होती. तर ज्यांनी थोड्या ओलीच्या आधारे पेरणी केली अशा शेतातील उगवण झालेल्या हरभऱ्याला हा पाऊस नवसंजीवनी देणारा ठरेल. सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने रखडलेल्या रब्बी पेरण्यासुद्धा आता वेग घेतली. काही प्रमाणात कोरडवाहू कपाशी पिकालाही याचा फायदा सरू आहे.

आठ मेंढ्या दगावल्या

अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात उरळ बुद्रुकजवळील टाकळी गावात गारपीट व पावसामुळे मेंढ्या दगावल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील शालिग्राम तुकाराम बिचकुले हे या भागात शेळ्यामेंढ्या चराईसाठी आलेले आहेत. कालच्या पावसामुळे त्यांच्या ८ मेंढ्या दगावल्या असून ५ ते ६ मेंढ्या गंभीर जखमी आहेत.

अतिवृष्टी झालेली मंडले

जळगाव जामोद ७६.८, आसलगाव ७६.८, म्हसला ७७, देऊळगावराजा शहर ९०, देऊळगावराजा ग्रामीण ८६.३, तुळजापूर १०१, मेहुणाराजा ८७, मेहकर ७६.५, जानेफळ ६५.३, शेलगाव देशमुख ६५.३, डोणगाव ६७.५, देऊळगावमाळी ८३.५, लोणी ७१.३, कल्याणा १००, सिंदखेडराजा ९८.८, किनगावराजा ८६.३, सोनोशी ७९.५, शेंदुर्जन ८१, साखरखेर्डा ७७.३, बिबी ६८.३, सुलतानपूर ७२.४, टिटवी ७७, अंजनी खुर्द ६५, शेगाव ६५.५, जवळा ६५.५, वाशीम जिल्हयात रिसोड ९४.३, भरजहाँगीर ८८.८, पार्डी आसारे ७०, वाकद ७१.३, मोप ६२.५, शिरपूर ६६.३, करंजी ६३ मिलिमीटर नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा

PM Kisan Maandhan Scheme: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन; केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना!

Papaya Cultivation : पपईत पाणी निघत असल्याने चिंतेत भर

Sericulture : सोलापूर जिल्ह्यात रेशीम विभागाचे ‘रेशीम आपल्या दारी’ अभियान

SCROLL FOR NEXT