Pune News : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी (ता.२०) नांदेड आणि परभणीत प्रचार सभा पार पडल्या. यावेळी मोदींनी पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्यांचे आभार मानताना काँग्रेस, इंडिया आघाडीसह राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी मोदींनी, 'काँग्रेस नेत्यांनी आधीच पराभव स्वीकारला आहे. काँग्रेस ही अशी वेल असून जीला मुळे नाहीत किंवा स्वतःची जमीन नाही. तर जो काँग्रेसला पाठिंबा देतो ते त्यालाच संपवतात', अशी टीका केली आहे.
या निवडणुकीचे ध्येय
परभणी येथील जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, '२०२४ च्या निवडणुका केवळ सरकार स्थापन करण्यासाठी नाहीत. तर भारताचा विकास करणे, भारताला स्वावलंबी बनवणे हा या निवडणुकीचे ध्येय आहे. यामुळे २०२४ च्या निवडणुकीत कोणतेही समान मुद्दे नाहीत. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक संकल्प महत्वाच्या आहेत.
३७० चा बहाणा
'काँग्रेस ही अशी वेल आहे, जीला मुळे नाहीत, स्वतःची जमीन नाही आणि यांना जो पाठिंबा देतो त्यालाच ते खराब करतात. काँग्रेसने देशाची फाळणी केली. यांच्याच काळात काश्मीरची समस्या निर्माण झाली. काँग्रेसने ३७० चा बहाणा करत बाबासाहेबांची राज्यघटना काश्मीरमध्ये लागू होऊ दिली नाही,' असा आरोप मोदींनी यावेळी केला.
सर्जिकल स्ट्राईकची चर्चा
तर मोदींनी नांदेडच्या सभेतून हल्लाबोल करताना, म्हणाले, 'मी २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत असताना दहशतवादी हल्ल्यांची भीती होती. तशा बातम्या रोज येत होत्या. पण आता ५ वर्षानंतर अशा हल्ल्यांची चर्चा थांबली असून आता सर्जिकल स्ट्राईकची चर्चा रंगू लागल्या आहेत. हा मोदी आहे, घरात घुसून मारतो,' अशी चर्चा होत आहे.
विकासाचा मोठा पल्ला गाठला
'आता देशाला विकसित आणि स्वावलंबी बनवताना गेल्या टर्ममध्ये आपण चांद्रयानचे यश पाहिले. तर पुढच्या टर्ममध्ये देशवासीयांना गगनयानचे यश दिसेल. अवघ्या १० वर्षांत देशाने विकासाचा मोठा पल्ला गाठला असून तुमची स्वप्ने पूर्ण करणे हाच आपला संकल्प', असल्याचे मोदी म्हणाले.
५ वर्षातही मोफत रेशन देण्यात येणार
आमचे सरकार प्रत्येक जाती-धर्मासाठी काम करत असून एनडीए सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्रावर काम करत असल्याचे मोदी म्हणाले. तर आज परभणीतील १२ लाखांहून अधिक गरिबांना कोणताही भेदभाव न करता मोफत रेशन देण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे अनेक घरात अन्न शिजत असून येत्या ५ वर्षातही मोफत रेशन देण्यात येणार आहे. परभणीतील जनऔषधी केंद्रात प्रत्येकाला ८०% सवलतीत औषधे मिळत आहेत. येथे १.१५ लाखांहून अधिक महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यात आल्याचे मोदी म्हणाले.
काँग्रेस नेत्यांनी पराभव स्वीकारला
काँग्रेस नेते सध्या काहीही दावे करतात, पण सत्य हे आहे की काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आपली हार स्वीकारली आहे. या आघाडीचे भ्रष्ट नेते आपल्या कुटुंबाच्या हितासाठी एकत्र आल्याचे जनतेला दिसत आहे, मात्र जनतेने त्यांना नाकारले आहे. राहुलला वायनाडमधला आपला पराभव दिसत आहे. यामुळे ज्याप्रमाणे त्यांनी अमेठीतून पळ काढला तसेच त्यांना वायनाडमधूनही पळावे लागेल असा घणाघात मोदी यांनी केला आहे.
किसान सन्मान निधी
काँग्रेसने शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवले नाहीत. महाराष्ट्र आणि विदर्भ-मराठवाड्यात गेली अनेक दशके काँग्रेसने शेतकऱ्यांना दमवण्याचे काम केले आहे. या भागात दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचे संकट हे काँग्रेसच्या वृत्तीमुळे निर्माण झाले असून शेतकरी दुबळे झाले आहेत. यामुळे लाखो तरुणांना स्थलांतर करावे लागले आहे. पण आम्ही पीक विम्याच्या हप्त्यापेक्षा ५ पट अधिक क्लेम शेतकऱ्यांना दिला. नांदेडच्या शेतकऱ्यांना प्रधान मंत्री किसान सन्मान निधीतून १३०० कोटींहून अधिक रक्कम दिली असून हा फक्त ट्रेलर आहे. येत्या ५ वर्षात मराठवाड आणि महाराष्ट्राला खूप पुढे न्यायचे आहे. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार करण्याची हमी असल्याचेही मोदी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.