Gujrat News: ‘‘सहकार थेट शेतकऱ्यांशी जोडलेला महत्त्वाचा दुवा आहे. यातून गावागावात संधी निर्माण झाल्या. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात समृद्धी आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र धोरण आणि व्यवस्थापन सकारात्मक असण्याची गरज असून, यात काम करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी पुढे यावे. त्यातूनच रोजगाराच्या संधीसह आर्थिक आव्हाने कमी होतील. सहकार म्हणजे संघटनात्मक विश्वास, विकास, सबलीकरण आहे,’’ असे प्रतिपादन गुजरातचे सहकारमंत्री जगदीश विश्वकर्मा यांनी केले.
‘सहकारभारती’च्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय डेअरी अधिवेशनाचे आयोजन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणंद (गुजरात) येथे २४ व २५ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी विश्वकर्मा बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष मनीष शाह, अमूल डेअरीचे अध्यक्ष विपुल पटेल, अमूल मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्यामल पटेल, सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. निरंजन पटेल, ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रीय सरचिटणीस दीपक चौरासिया, गुजरात सहकार भारतीचे अध्यक्ष महेश पटेल, सहकार भारतीच्या डेअरी विभागाचे अध्यक्ष देवेन शर्मा आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना जगदीश विश्वकर्मा म्हणाले, की अमूल डेअरीने संघटितपणे काम करून सहकारात क्रांती घडवली आहे. विकसित २४२ उत्पादने आहेत. त्यातील काही उत्पादने ५० देशांत निर्यात होतात, हे मॉडेल अभ्यासून गावागावांत काम उभे करण्याचे त्यांनी आवाहन केले. ७५ वर्षांनंतर देशात सहकार मंत्रालय स्थापन झाले आहे. सरकारचे धोरण यात सकारात्मक असल्याने तरुण आणि महिलांनी प्रवेश करून परिवर्तन घडवावे.
मनीष शाह म्हणाले, की दुग्ध व्यवसाय क्षेत्रात मोठी चळवळ उभी राहून ग्रामीण भागात अर्थव्यवस्था बदलण्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र कांद्याला कधी १० तर कधी ८० रुपये भाव मिळतो. शेतकऱ्याला प्रत्यक्ष फायदा न होता, यात मध्यस्थी फायदा लुटतात. दूध व्यवसायात असे नाही. एक रुपयांतील ८० पैसे दूध उत्पादकाला मिळते, त्यामुळे दुधाप्रमाणे असे मॉडेल इतर पिकांमध्ये आणण्याची गरज असल्याचे यांनी या वेळी नमूद केले.
चौरसिया म्हणाले, की सहकार ही प्राचीन जीवनपद्धती असून त्यात सामाजिक समरसता आहे. त्यामुळे शेवटच्या घटकांपर्यंत काम पोहचण्याची गरज आहे. मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय अशा पूरक व्यवसायामुळे जीडीपी वाढ शक्य आहे. सहकारात पुढे जाण्यासाठी दुसरी श्वेतक्रांती पुढे नेण्याची गरज आहे. विपुल पटेल यांनी सहकारातील संघटनात्मक ताकद विशद केली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन जयंतीभाई केवट यांनी केले.
‘ग्रामीण समृद्धी सहकारातून येणे शक्य’
सहकार क्षेत्राला विशेष महत्त्व आले आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर जाऊ पाहत आहे. २०४७ मध्ये विकसित भारत पाहायचा असून, सोबतच अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामीण विकास व अर्थकारण मजबूत होणे आवश्यक आहे. देशातील ६० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. या घटकांना मुख्य प्रवाहात अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आणावी लागणार आहे सहकार क्षेत्राशिवाय त्यासाठी दुसरे साधन नाही, असे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे मनीष शाह यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.