Washim News : दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी या आधी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. विशेषतः सोयाबीन पीक पिवळसर पडू लागल्याने अनेक भागांतील पिकांची अवस्था चिंताजनक होईल की काय अशी शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आणि सलग पावसामुळे सूर्यप्रकाशाचा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी, झाडे पिवळसर दिसू लागली आहेत. मालेगाव, मंगरूळपीर, रिसोड या तालुक्यांतील काही भागात ही स्थिती बनली आहे. जमिनीत ओलावा जास्त असल्याने मुळे कुजण्याची शक्यता निर्माण झाली असून काही शेतांमध्ये पाने गळू लागल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सलग पावसामुळे जमिनीत पाणी साचल्यास ऑक्सिजनचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे मुळे योग्यरीत्या अन्नद्रव्ये शोषू शकत नाहीत. यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि पाने पिवळसर होतात. हे लक्षण पिकासाठी धोक्याचे ठरू शकते, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी.
रासायनिक खते देण्याऐवजी जैविक द्रव्यांचा वापर करावा. झाडांच्या वाढीस चालना देणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. गरज असल्यास कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन फवारणीचे नियोजन करावे, असे आवाहनही केले जात आहे. सोयाबीनबरोबरच सततच्या पावसाचा इतरही पिकांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. मागील काही दिवस रिसोड, मालेगाव तालुक्यांत सतत पाऊस होत आलेला आहे.
सुरुवातीला ढगफुटीसदृश पावसाने काही मंडलांना झोडपून काढले होते. त्यानंतर सलग तीन-चार दिवस झडीसारखा पाऊस झाला आहे. अधूनमधून उघडीप दिली तरी स्वच्छ सूर्यप्रकाश पिकांना मिळालेला नाही.
सततच्या अशा वातावरणाने सोयाबीन पिकाचे नुकसान वाढण्याची शक्यता जास्त आहे. हवामान खात्याने सोमवारपर्यंत (ता. ४) विदर्भात येलो अलर्ट दिला आहे. यामुळे आणखी पाऊस झाल्यास शेती चिभडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.