
राजीव घावडे, मंगेश दांडगे, डॉ. सतीश निचळ
Soybean Farming: अतिवृष्टीमध्ये सोयाबीन पिवळे पडण्याची समस्या
या वर्षी राज्यातील बहुतांश सोयाबीन लागवड क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे. त्यामुळे दोन परिस्थिती उद्भवतात.
सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये अतिरीक्त ओलावा राहत आहे. अतिरिक्त ओलाव्यामुळे जमिनीतील हवेची जागा पाण्याने घेतलेली असेल. मुळांभोवतीची योग्य प्रमाणात हवा खेळती राहत नसल्याने मुळांच्या कार्यामध्ये बाधा येते. अन्नद्रव्यांचे शोषण होत नाही. हेही पानेपिवळे पडण्याचे महत्त्वाचे कारण ठरू शकते.
सततच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी राहते. त्याचा विपरीत परिणाम सोयाबीन पिकाच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर होतो. मंदावलेल्या प्रकाशसंश्लेषण क्रियेमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील दोन्ही परिस्थितीमध्ये पिकाला नत्राची कमतरता भासू शकते. नत्राच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्य कमी तयार होते. पाने पिवळी पडतात. मात्र अशा पानांच्या शिरा हिरव्या राहतात. अशी स्थिती आपल्या शेतात आढळत असल्यास खालील उपाययोजना कराव्यात.
शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढावे.
सूर्यप्रकाश अपुरा पडत असल्यामुळे पाने पिवळी पडतात. मात्र पुढे उघडीप मिळून पुरेसा सूर्यप्रकाश प्राप्त झाल्यावर प्रकाश संश्लेषण क्रियेला चालना मिळते. आणि अशा सोयाबीनची पाने हिरवी होण्यास सुरुवात होईल.
अतिओलीमुळे पिकाला जमिनीतून अन्नद्रव्ये घेण्यात अडचण येत असते. अशा स्थितीमध्ये अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी विशेषतः नत्र व पालाश यांचा पुरवठा फवारणीद्वारे करता येईल.
पावसाची उघडीप पाहून १३:०:४५ (पोटॅशिअम नायट्रेट) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. किंवा कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे सोयाबीन पिकात पावसाची उघडीप पाहून पेरणीनंतर ५० व ७० दिवसांनी युरिया (दोन टक्के) म्हणजे युरिया दोन किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.
तणनाशकांच्या फवारणीमुळे पीक पिवळे पडणे (स्कॉर्चिंग)
सोयाबीन १५-२० दिवसांचे असताना जर पीक पिवळे होत असेल तर त्यामागे तणनाशकाचा चुकीचा वापर हे कारण असू शकते. २५ ते ३० दिवसांपर्यंत तण नियंत्रणाच्या उपाययोजना करून घ्याव्यात.
तणनाशकाचा चुकीच्या वापर म्हणजे काय?
अयोग्य तणनाशक निवडणे.
अयोग्य प्रमाणात वापर.
फवारणीसाठी द्रावण तयार करताना कमी अधिक प्रमाणात पाण्याचा वापर करणे.
तणनाशकासोबत खत किंवा अन्य घटकांची एकत्रित फवारणी.
तणनाशक आणि कीटकनाशक यांची एकत्र फवारणी.
महत्त्वाचे...
शेत तण विरहित ठेवावे. मात्र पीक २५ ते ३० दिवसांनंतरच्या अवस्थेत तणनाशक फवारणी टाळावी. त्याच प्रमाणे तणनाशकांसोबत अन्य कोणताही घटक (तणनाशक, कीटकनाशक किंवा बुरशीनाशक इ.) मिसळून फवारणी करू नये.
उपाययोजना
तणनाशकाच्या फवारणीमुळे सोयाबीनची पाने वेडीवाकडी (जास्त स्कॉर्चिंग) आले असल्यास किंवा पाने पिवळी पडली असल्यास,
पिकाला कोळप्याची पाळी देणे व त्यानंतर डीएपी + युरिया किंवा २०:२०:००:१३ सोबत झिंक सल्फेट हे खत देणे.
फवारणी करणे शक्य असेल तर १९:१९:१९ हे विद्राव्य खत १०० ग्रॅम अधिक अमिनो ॲसिड किंवा सायटोकायनीन २५ ते ३० मिलि प्रती १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
राजीव घावडे, ९४२०८४१४२१
सहायक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित सोयाबीन प्रकल्प, अमरावती अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.