Fish Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Conservation : गोड्या पाण्यातील स्थानिक माशांचे संवर्धन

Fish Preservation : सामान्यतः स्थानिक माशांची वाढ २५ ते ३० सेंमीपर्यंत होते. भारतातील ग्रामीण भागात दररोजच्या जेवणात लहान स्थानिक माशांचा समावेश केला जातो. हे मासे मानवी शरीरास लागणाऱ्या पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असतात. या माशांच्या सर्वाधिक प्रजातींची नोंद हिमालयातील पर्वतरांगा आणि पश्चिम घाटात झाली आहे.

Team Agrowon

महेश शेटकार, डॉ. स्वप्नजा मोहिते

Fisheries Management : भारताला लाभलेल्या विस्तृत किनारपट्टीमुळे समुद्रातील मासे आपल्या अन्नातील महत्त्वाचा घटक असला तरी भारतातील नद्या आणि गोड्या पाण्याचे जलाशय येथे आढळणाऱ्या माशांनाही तेवढेच महत्त्व आहे. गोड्या पाण्यातील स्थानिक माशांना बाजारपेठेत मागणी असते. त्यामुळे मत्स्योत्पादनात त्यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. भारतात सुमारे ७६५ गोड्या पाण्यातील मत्स्य प्रजाती असून त्यापैकी ४५० प्रजाती या लहान स्थानिक मासे म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी सुमारे १०४ प्रजाती व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. त्यातील ६२ प्रजातींचे खाद्य मासे म्हणून वर्गीकरण आणि ४२ प्रजाती शोभिवंत मासे म्हणून ओळखल्या जातात. हे मासे प्रामुख्याने नदी, नाले, झरे, तलाव, ओढे, खाडी, जलाशय, सखल प्रदेशातील भातशेती, दलदल, पाणथळ इत्यादी विविध नैसर्गिक परिसंस्थांमध्ये राहतात. वैज्ञानिकांच्या मते सद्यः स्थितीत हे स्थानिक स्वदेशी मासे हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. प्रदूषण, परकीय माशांच्या प्रजातींना नदी, तलावांमध्ये सोडले जाणे, माशांच्या स्थलांतर मार्गात येणारे अडथळे, त्यांच्या परिसंस्थेमध्ये येणारे व्यत्यय, मानवी हस्तक्षेप अशा अनेक कारणांमुळे या मूळ माशांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आहारातील महत्त्व

ग्रामीण भागातील लोक दैनंदिन आहारासाठी स्थानिक माशांच्या प्रजातींवर अवलंबून असतात. गोड्या पाण्यातील हे स्थानिक स्वदेशी मासे हे पोषक तत्त्वांनी (उदा. प्रथिने, फॅटी ॲसिडस्, जीवनसत्त्वे, कॅल्शिअम आणि खनिजे) समृद्ध असतात.

झिंक, कॅल्शिअम, लोह, सेलेनियम, पोटॅशिअम, आयोडीन इत्यादी सूक्ष्म पोषक घटकांनी परिपूर्ण असतात.

मोला (एम्बलीफॅरिंगोडॉन मोला), ढेला (ऑस्टिओब्रामा कोटीओ), डार्किना (रासबोरा डॅनीकोनियस) अशा प्रजातींमध्ये जीवनसत्त्व अ आणि खनिजाचे प्रमाण जास्त असते.

मत्स्य अभ्यासकांच्या मते, एक किलो लहान देशी माशांमधून मिळणारी पोषक तत्त्वे ही सुमारे पन्नास किलो वजनाच्या कार्प माशांबरोबर असतात.

प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांवर (उदा. कुपोषण) लहान देशी मासे हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी औषध म्हणून या माशांचा वापर होतो.

संवर्धनयोग्य प्रजाती

स्थानिक माशांच्या काही प्रजाती, शोभिवंत मासे म्हणून संवर्धित करता येऊ शकतात तर काही खाण्यासाठी म्हणून मत्स्यशेतीत संवर्धन करता येऊ शकतात.

शोभिवंत मत्स्यपालन हा निर्याताभिमुख व्यवसाय असून स्थानिक लोकांना आर्थिक सक्षम बनवतो. लहान देशी माशांच्या सुमारे ३० प्रजाती शोभिवंत मासे म्हणून संवर्धित करता येऊ शकतात.

मत्स्यालयात संवर्धन केल्या जाणाऱ्या गोल्ड फिश, एंजल्स, गप्पी अशा अनेक माशांप्रमाणेच चंदा (चंदा नामा), टेंगरा (मिस्टस टेंगरा), पाबदा (ओंपोक बायमॅक्युलॅटस), दरई (पुंटियस सराना) आणि गारा (गारा रुफा) असेही स्थानिक मासे मत्स्यालयात संवर्धन करण्यायोग्य आहेत. यातील काही माशांना परदेशात चांगली मागणी आहे. ग्रामीण भागातील लोकांनी कुटीर उद्योग म्हणून शोभिवंत मत्स्यपालनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

काही प्रजाती कृत्रिमरीत्या प्रजनन करून जलाशयात संवर्धित केल्या जातात. यामध्ये सिरीनस रेबा, नंदूस नंदूस, ॲम्बलीफॅरिंगडॉन मोला, लॅबेओ बाटा, पुंटियस टिक्टो, ग्लोसोगोबियस गियुरिस, चंदा नामा, सिरीनस सिरोसा इत्यादींचा समावेश होतो.

काही माशांचे मत्स्यबीज गोळा करून संवर्धित केले जाते. उदा. मरळ, पाबदा, मागूर, सिंघी, चिताला इत्यादी. यामुळे रोजगार उपलब्ध होत आहेत.

धोके आणि परिणाम

लहान आकाराच्या जाळीचा वापर, कीटकनाशकांचा अतिवापर, संवर्धन तलावातून विदेशी माशांच्या प्रजाती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सुटून जाणे, रोगांचे संक्रमण आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होणे इत्यादी बाबींमुळे गोड्या पाण्यातील जैवविविधता आणि तेथील परिसंस्था नष्ट होत आहे.

विदेशी माशांच्या प्रजाती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये असणाऱ्या मूळ माशांच्या प्रजातींशी खाद्य, निवारा आणि प्रजनन याबाबतींमध्ये स्पर्धा करत, त्यांना नष्ट करतात आणि या स्रोतांमध्ये आपले बस्तान बसवतात.

काही वेळा, मत्स्यसंवर्धन पद्धतींमध्ये लहान स्थानिक मासे उपद्रवी मासे म्हणून ओळखले जातात आणि ते काढून टाकले जातात. म्हणून लहान मूळ माशांच्या प्रजाती नामशेष होत आहेत.

धरण बांधणे, सिंचनासाठी पाणी वळवणे आणि पाणथळ जमिनीचे जलस्रोतांमध्ये रूपांतर यामुळे लहान देशी माशांच्या अधिवासावर परिणाम होतो. काहींच्या मते थर्मल प्रदूषणामुळे सभोवतालचे तापमान वाढते आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे काही संवेदनशील माशांच्या प्रजातींचा मृत्यू होतो. त्यामुळे या प्रजातींचा अभ्यास होणे आणि नोंद घेणे आवश्यक ठरते. संबंधित जलस्रोतांतील मूळ मासे आणि त्यांचे जीवनचक्र अभ्यासून, त्यानुसार त्यांचे संवर्धन व संरक्षण करता येऊ शकते.

संवर्धन आणि संरक्षण

लहान देशी माशांच्या संवर्धनामुळे मच्छीमारांचे उत्पन्न वाढू शकते. यामुळे त्यांच्या शिक्षण, आरोग्य, पोषण आणि राहणीमानात सुधारणा होऊ शकते.

भारतातील सुमारे १२० गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती नामशेष होताना दिसत आहेत, त्यातील २२ प्रजाती या लहान देशी माशांच्या आहेत (संदर्भ : अर्चना सिन्हा, २०२२). कारण बहुसंख्य प्रजाती त्यांच्या प्रजननापूर्वी पकडल्या जातात, ज्यामुळे नवीन पिढी जन्माला येत नाही. त्याकरिता अनधिकृत मासेमारी आणि प्रजननक्षम मासे पकडण्यासाठी योग्य तो कायदा अमलात आणायला हवा. प्रजननक्षम मासे पकडले जाऊ नयेत यासाठी जाळ्यांच्या आसावर योग्य ते नियंत्रण ठेवले गेले पाहिजे.

देशी माशांची जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक (उदा. नदी, झरे, जलाशय) किंवा मानवनिर्मित (उदा. कालवे, जलवाहिन्या, तलाव) परिसंस्थेमध्ये मत्स्यसंवर्धन केले जाऊ शकते. जेथे देशी माशांचा अधिवास आहे ती जागा अभयारण्य म्हणून घोषित केली पाहिजे.

माशांच्या पोषणाबद्दल स्थानिक लोकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. इत्यादी सर्व बाबी जर विचारात घेतल्या तर नक्कीच

गोड्या पाण्यातील जैवविविधता, परिसंस्था व मत्स्य प्रजाती यांचे संरक्षण होईल. तेथील पर्यावरणाचा सामाजिक - आर्थिक समतोल राखला जाईल.

डॉ. स्वप्नजा मोहिते, : ९५४५०३०६४२

( मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT