Pune News : भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना राणौतने शेतकरी आंदोलनावरून सोमवारी (ता. २६) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून काँग्रेस नेते तथा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच संयुक्त किसान मोर्चाने देखील कंगनावर निशाना साधताना कंगनाने शेतकऱ्यांची माफी मागावी. अन्यथा तिच्यावर सार्वजनिक बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. कंगनाने, शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार झाला, मृतदेह लटकले, तेथे मोठा हिंसाचार झाला, असे धक्कादायक विधान केलं होतं. त्यावरून देशभर संतप्त प्रतिक्रीया आता उमटत आहेत.
कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राहुल गांधी, यांनी सोशल मीडिया हँडलवर ट्विट करत, भाजप खासदाराच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी पक्ष असून भाजप शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करत आहे. भाजप शेतकऱ्यांचा अपमान करत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारची प्रचार यंत्रणा शेतकऱ्यांविरोधात खोटा प्रचार करण्यात गुंतल्या आहेत असा देखील आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशातील शेतकऱ्यांनी ३७८ दिवस सतत संघर्ष केला. आंदोलनात ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिले. पण भाजपच्या खासदार कंगना शेतकऱ्यांना बलात्कारी आणि परकीय शक्तींचे प्रतिनिधी म्हणत आहे. भाजप खासदाराचे असे वक्तव्य भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आणि हेतूचा पुरावा असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
तसेच एमएसपीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत दिलेली नाही. मात्र शेतकऱ्यांचा अवमान करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार निश्चितच करत आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांचा अपमान करून त्यांचा विश्वासघात करत आहे. कंगनाचे विधान लाजिरवाणे असून तिचे शेतकरी विरोधी वक्तव्य म्हणजे उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबसह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान कंगनाच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा संयुक्त किसान मोर्चाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. यावेळी एसकेएमने पंतप्रधान मोदींनी भारतातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्या नेत्यांना शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधाने करण्यापासून रोखवे, असे म्हटले आहे. तर देशातील जनतेला पंतप्रधान मोदी यांच्याकडून अपेक्षा असून त्यांनी त्यांच्या संवैधानिक कर्तव्याचे पालन करावे, अशी मागणीही एसकेएमने केली आहे. कंगनाने आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागावी. तसे तिने न केल्यास तिच्यावर जाहीर बहिष्कार टाकला जाईल, असाही इशारा एसकेएमने दिला आहे. तर भारतीय शेतकऱ्यांना खुनी, बलात्कारी, कटकारस्थानी आणि देशद्रोही संबोधून कंगनाने शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाचा अपमान केल्याचे एसकेएमने म्हटले आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आणि बदनामी करण्याचे भाजपचे दीर्घकाळचे धोरण असून संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांनुसार शेतकरी शांततेने आंदोलन करत असल्याचेही एसकेएमने म्हटले आहे.
काय केलं होतं कंगनाने वक्तव्य?
कंगनाने दैनिक भास्कर या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी आंदोलनावर वक्तव्य केलं. यावेळी कंगनाने, शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतली नसते तर आंदोलक शेतकऱ्यांनी काहीही केलं असतं. तेथे आंदोलनादरम्यान मोठं षडयंत्र रचलं जात होतं. पण सुदैवाने शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत होतं. नाहीतर पंजाबची स्थिती आज बांगलादेश सारखी पाहायला मिळाली असती असे म्हटले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.