Snail Agrowon
ॲग्रो विशेष

Snail Control : सामूहिकरीत्या करा शंखी गोगलगायींचे नियंत्रण

Snail Outbreak : शंखी गोगलगायी ही बहुभक्षी कीड आहे. पावसाळ्यातील ढगाळ वातावरण, दलदल, अंधार, सावली, कमी सूर्यप्रकाश, जास्त पाऊस, जास्त आर्द्रता, कमी तापमान असे वातावरण या किडीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असते.

Team Agrowon

डाॅ. चांगदेव वायळ, डाॅ. सखाराम आघाव

शंखी गोगलगायी ही बहुभक्षी कीड आहे. पावसाळ्यातील ढगाळ वातावरण, दलदल, अंधार, सावली, कमी सूर्यप्रकाश, जास्त पाऊस, जास्त आर्द्रता, कमी तापमान असे वातावरण या किडीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असते. शंखी गोगलगायी अन्न पाण्याशिवाय चार ते सहा महिने जीवंत राहू शकतात.

सध्याचे वातावरण शंखी गोगलगायीचे प्रजनन, प्रादुर्भाव आणि प्रसारास होण्यास अत्यंत पोषक आहे. शंखी गोगलगायींच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकाचवेळी गावपातळीवर सामूहिकपणे नियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा. जेणेकरून प्रभावी नियंत्रण होईल.

ओळख ः

- शास्त्रीय नाव ः अचेटिना फिलिका

- शंखी गोगलगायींच्या पाठीवर ४ ते ५ इंच लांबीचे ७ ते ९ चक्र असलेले गोलाकार कवच (शंख) असते. त्यामुळे या किडीस शंखी गोगलगायी असे म्हणतात.

- बहुतांश शंखी गोगलगायी या गर्द, करड्या फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात.

- नर आणि मादी ही दोन्ही लिंगे एकाच गोगलगायीमध्ये असते. सततचे ढगाळ, दमट, पावसाळी वातावरणात प्रजनन जलद होऊन शंखी गोगलगायींची संख्या अनेक पटीने वाढते.

जीवनक्रम ः

- शंखी गोगलगाय ऑक्टोबर ते मे महिन्याच्या कालावधीत जमिनीमध्ये खोलवर सुप्त अवस्थेत जाऊन पाऊस पडल्यानंतर जमिनीतून बाहेर येतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत सक्रिय होऊन पिकांचे मोठे नुकसान करतात.

- शंखी गोगलगायींचा जीवनक्रम हा अंडी, पिले व प्रौढ अशा तीन अवस्थेचा असतो.

- मिलनानंतर ८ ते २० दिवसांनी वाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभुशीत करून त्यात अंडी घालतात. ओलसर जमिनीमध्ये साधारणपणे २०० अंडी घालतात. वयाच्या पहिल्या वर्षी एक गोगलगायी साधारणतः १००, तर दुसऱ्या वर्षापासून ५०० पर्यंत अंडी घालते.

- अंडी ४.५ ते ५.५ मिमी व्यासाची साबुदाण्यासारखी असतात.

- शंखी गोगलगायींचा जीवनकाळ ५ ते ६ वर्षांचा असतो. प्रतिकूल वातावरणात त्या ३ वर्षापर्यंत जमिनीमध्ये सुप्तावस्थेत राहू शकतात.

पोषक वातावरण ः

गोगलगायी या निशाचर आहेत. मात्र ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये त्या दिवसादेखील सक्रिय होतात. साधारणतः ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि ९ ते २९ अंश सेल्सिअस तापमानात त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

प्रसार ः

शेतामध्ये वापरली जाणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच प्लॅस्टिक, शेणखत, विटा, वाळू, माती, कलम रोपे, बेणे, ऊस इत्यादींमार्फत या किडीचा प्रसार होतो.

नुकसान ः

- ही बहुभक्षी कीड असून ५०० पेक्षा जास्त वनस्पतींवर उपजीविका करते. पपई, केळी, झेंडू, भेंडी व जमिनीवर पडलेली पिवळी पाने (कॅल्शिअम जास्त असलेली) हे शंखी गोगलगायींचे आवडीचे खाद्य असते. कोवळ्या वनस्पती, स्ट्राॅबेरी, उंबर, टोमॅटो, सोयाबीन, कापूस, फळझाडे, भाजीपाला, तुती आणि विविध प्रकारच्या वनस्पती तसेच कुजलेल्या वनस्पतिजन्य पदार्थांवर त्या उपजीविका करतात.

- पाने तसेच फुलांना अनियमित आकाराची छिद्रे पाडून त्याच्या कडा खातात. रात्रीच्या वेळी सोयाबीन, कांदा, द्राक्ष, फुलकोबी, भेंडी, लसूण, घास, टोमॅटो, भोपळा, काकडी इत्यादी पिकांचे रोपावस्थेतील पिकांचा जमिनीलगतचा भाग कुरतडून खातात. मोठ्या पिकांचे शेंडे, पाने, कळ्या, फुले, फळे, साल व नवीन फुटलेले कोंब यांचे मोठे नुकसान करतात.

एकात्मिक पद्धतीने नियंत्रण ः

- पिकांच्या मुळांशेजारी, मातीमध्ये गोगलगायींनी घातलेली पिवळसर पांढऱ्या रंगाची साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत.

- त्यांच्या लपण्याच्या जागा शोधून त्या ठिकाणी लपून बसलेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.

- शेतालगतचे बांध स्वच्छ करावेत.

- संध्याकाळी आणि सूर्योदयापूर्वी बाहेर पडलेल्या, दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने किंवा चिमट्याने गोळा कराव्यात. आणि उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रावणात किंवा राॅकेलमिश्रीत पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. किंवा तीन फूट खोल खड्डा घेऊन त्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी.

- फळबागेमधील झाडांच्या खोडास १० टक्के बोर्डो पेस्ट (१ किलो मोरचूद अधिक १ किलो चुना प्रति १० लिटर पाण्यात) लावावी.

- शेतातील गोगलगायी गोळा करून प्लॅस्टिक किंवा सिमेंटच्या रिकाम्या पोत्यामध्ये भराव्यात. त्यावर चुन्याची पावडर किंवा कोरडे मीठ टाकून पोते शिवून घ्यावे. त्यामुळे गोगलगायी आतमध्ये मरून जातात.

- छोट्या आकाराच्या गोगलगायींच्या नियंत्रणासाठी, प्रति लिटर पाण्यात १०० ग्रॅम मिठाचे द्रावण करून त्याची फवारणी करावी.

- संध्याकाळी शेतामध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर वाळलेले गवत किंवा भाजीपाल्याच्या अवशेषांचे ढीग ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.

- दहा लिटर पाण्यामध्ये १ किलो गूळ मिसळून द्रावण तयार करावे. तयार द्रावणामध्ये गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावीत. दुसऱ्या दिवशी सकाळी पोत्याखाली लपून बसलेल्या गोगलगायी वेचून नष्ट कराव्यात.

- प्रादुर्भाव झालेल्या द्राक्ष बागेमध्ये खोडाशेजारी आच्छादन (मल्चिंग) करणे टाळावे.

- गोगलगायींना द्राक्ष वेलींवर चढण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी, १ इंच रुंदीची तांब्याची पट्टी खोडाभोवती गुंडाळावी. किंवा प्लॅस्टिकची पिशवी खोडाभोवती आणि बांबू/सिमेंटच्या उभारलेल्या खांबावर गुंडाळून त्यावर घट्ट ग्रीसचा थर द्यावा.

- गोगलगायींचा उपद्रव जास्त वाढल्यास शेतातील मुख्य पिकावर प्रादुर्भाव करण्यापासून रोखण्यासाठी, पिकाच्या सर्व बाजूंनी दोन मीटर पट्ट्यात राख पसरावी. त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना २ः३ या प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा. जमीन ओली असल्यास किंवा पाऊस असल्यास या पद्धतींचा फारसा उपयोग होत नाही.

- कुतूहलापोटी शंखासाठी जिवंत गोगलगायी किंवा शंख एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे टाळावे.

रासायनिक उपाय ः

- नियंत्रणासाठी दाणेदार मेटाल्डिहाइड २ किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरावे. तर फळबागेत झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाइड प्रति झाड १०० ग्रॅम प्रमाणे पसरून द्यावे. मात्र पाऊस पडल्यानंतर मेटाल्डिहाइड तितकेसे प्रभावी ठरत नाही. (लेबलक्लेम शिफारस)

विषारी आमिष तयार करण्याची पद्धत ः

- दहा लिटर पाण्यामध्ये २ किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या किंवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. हे मिश्रण १० ते १२ तास आंबविण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यात मिथोमिल (४० एससी) ५० ग्रॅम चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावे. तयार आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने संध्याकाळी प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात ठिकठिकाणी पसरून टाकावे. हे विषारी अमिष खाऊन गोगलगायी त्याच ठिकाणी मरून पडतात.

आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी व त्यांची पिल्ले सकाळी लवकर गोळा करावीत. एक मीटर खोल खड्डा घेऊन त्यात पुरून टाकाव्यात. (ॲग्रेस्को शिफारस)

- हे विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायींना पाळीव प्राणी, पक्षी किंवा कोंबड्या खाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

- विषारी आमिषाचा वापर करतेवेळी प्लॅस्टिकचे हातमोजे, गॉगल, मास्कचा वापर करावा.

- डाॅ. चांगदेव वायळ, ९४०५१८६३६६

- डाॅ. सखाराम आघाव, ९३०९२५१४२१

(कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT