Nagpur News : शेतीमालाचे दर दबावात असल्याने या वेळी राजकीय स्थिती महाविकास आघाडीला पोषक असल्याचे सांगितले जात होते. मात्र अचानक वारे पालटत विदर्भातही महाविकास आघाडीला नाकारत मतदारांनी महायुतीला कौल दिला. परिणामी हे निकाल धक्कादायक आणि तितकेच सशंयास्पद असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. बच्चू कडू, देवेंद्र भुयार, यशोमती ठाकूर यांसारख्या दिग्गज नेत्यांनाही पराभवाची चव चाखावी लागली.
विदर्भातील सर्वांत धक्कादायक निकालामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व अचलपूर मतदार संघाचे उमेदवार बच्चू कडू यांचा पराभव मानला जात आहे. महायुतीसमवेत असतानाही त्यांनी सातत्याने केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचाही खुलेआम विरोध करीत स्वतःला शेतकरी नेतृत्व म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न केला. यातूनच मतदार संघासह राज्यातही त्यांना मानणारा विशिष्ट वर्ग असताना त्यांना पराभवाची चव चाखावी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपचे प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केला. तिवसा मतदार संघात हॅटट्र्रिककडे वाटचाल करणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या विजयाचा रथही भाजपने रोखला आहे. भाजपचे राजेश वानखडे या मतदार संघात विजयी झाले. हिंगणघाटमधून (वर्धा) भाजपचे समीर कुणावार विजयी झाले.
अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सुलभा खोडके विजयी झाल्या, त्यांनी काँग्रेसचे सुनील देशमुख यांचा पराभव केला. मोर्शी-वरुड मतदार संघात गेल्या वेळी सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटना व अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या देवेंद्र भुयार यांचाही पराभव झाला. या वेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उमेदवारी जाहीर केली होती. मात्र भाजपने या मतदार संघात मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली उमेश यावलकर यांना मैदानात उतरविले.
अपेक्षेनुरूप भुयार यांना त्यांच्याविरोधातील लाटेचा सामना करावा लागत मोठ्या मतांच्या फरकाने त्यांचा पराभव होत यावलकर विजयी झाले. दर्यापूरमध्ये (अमरावती) राजकीय वैमन्यस्यातून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या पराभवासाठी राणा दांपत्याने कंबर कसली होती. राणा यांनी त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले यांना उमेदवारी दिली होती.
त्यामुळे मताचे विभाजन होत त्याचा फायदा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) गजानन लवटे विजयी झाले. यवतमाळच्या दारव्हा मतदार संघातील लढतीकडे देखील राज्याचे लक्ष लागले होते. या ठिकाणी माजी मंत्री शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) संजय राठोड तसेच काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात लढत होती. यात राठोड यांनी बाजी मारली. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे अपेक्षेनुसार विजयी ठरले.
ब्रह्मपुरीमध्ये (चंद्रपूर) त्यांनी भाजपचे कृष्णलाल सहारे यांचा पराभव केला. बल्लारपूरमध्ये (चंद्रपूर) माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही विजय निश्चित मानला जात होता. त्यांनी काँग्रेसचे संतोषसिंह रावत यांचा पराभव केला. आरमोरीतून (गडचिरोली) काँगेसचे रामदास मसराम विजयी झाले. साकोलीतून (भंडारा) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विजयी झाले. वणीमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संजय दरेकर यांनी भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पराभव केला.
आर्वीमध्ये दादाराव केचे या विद्यमान आमदाराचे तिकीट कापत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) मयुरा काळे यांचा २२ हजारांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. चिमूरमध्ये (चंद्रपूर) भाजपचे बंटी बागडिया विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे सतीश वाजुरकर यांचा पराभव केला.
गोंदियामध्ये दोन अग्रवालांपैकी भाजपचे विनोद अग्रवाल विजयी होत त्यांनी काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांचा पराभव केला. तिरोरामध्ये भाजपचे विजय रहांगडाले विजयी झाले. उमरखेडमधून (यवतमाळ) भाजपच्या किसन वानखेडे यांनी बाजी मारली. वणीमधून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दिनकर निळकंठराव यांना कौल मिळाला. यवतमाळमधून भाजपचे मदन येरावार पराभूत झाले.
काँग्रेसच्या अनिल मांगूळकर यांनी त्यांचा पराभव केला. आर्णीमध्ये भाजपचे राजू तोडसाम विजयी झाले. उमरेडमध्ये (नागपूर) काँग्रेसचे संजय मेश्राम विजयी झाले. वर्धामधून भाजपचे डॉ. पंकज भोयर विजयी झाले. वरोरामध्ये (चंद्रपूर) अपक्ष मुकेश जिवतोडे यांचा भाजपचे करण देवतळे यांनी पराभव केला.
चंद्रपूरमध्ये भाजपचे किशोर जोरगेवार विजयी झाले. चिमूरमध्येही भाजपच्या बंटी भागडीया यांनी गड राखला. धामणगाव रेल्वेमध्ये (अमरावती) भाजपचे प्रताप अडसड विजयी झाले. गडचिरोलीतून भाजपचे डॉ. मिलींद नरोटे विजयी ठरले. काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार गट) उमेदवारी मिळाल्यानंतरही भाजपचे चरणसिंग ठाकूर विजयी झाले.
नागपूरमध्ये संमिश्र कौल
नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडदे यांचा पराभव केला. नागपूर पूर्वमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) दुनेश्वर पेठे यांचा भाजपचे कृष्णा खोपडे यांनी पराभव केला. मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके यांनी गड राखला.
त्यांनी भाजपचे प्रवीण दटके यांचा पराभव केला. नागपूर उत्तरमध्ये भाजपचे मोहन मते विजयी झाले तर नागपूर दक्षिणमध्ये भाजपचे मोहन मते यांनी काँग्रेसच्या गिरीश पांडव यांचा पराभव केला. नागपूर पश्चिममध्ये काँग्रेसची जादू चालत विकास ठाकरे विजयी झाले. त्यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. सावनेरमधून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आशिष जयस्वाल विजयी झाले. कामठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील गड राखला आहे. हिंगणामधून समीर मेघे विजयी झाले. रामटेकमध्ये काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक यांचा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आशिष जयस्वाल यांनी पराभव केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.