Pune News : राज्याच्या विविध जिल्ह्यात यंदा दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. विविध जिल्ह्यातील प्रमुख धरणांनी तळ गाठला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्यांना वणवण करावी लागत आहे. मराठवाड्यात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली असून येथे १८२८ टँकर पाणी पुरवठ्यासाठी लागत आहेत. दरम्यान मे महिना संपण्यास अजून आठ दिवस शिल्लक असून मान्सून सुरू होण्यास देखील वेळ आहे. यामुळे येथे परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरच्या दौऱ्यावर गुरूवारी (ता. २३) असून ते दुपारी दुष्काळसदृश स्थितीवर आढावा घेणार आहेत. यावरून लोकसभा निवडणुकीत गुंग असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तहानलेल्या मराठवाड्याची आता आठवण कशी आली असा संतप्त सवाल आता शेतकरी करत आहेत.
सध्या राज्याच्या विविध भागात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत असून मराठवाड्यात मात्र सुर्य आग ओकत आहे. येथे उन्हाच्या झळा वाढल्या असून लोक हैराण झाले आहेत. तर मराठवाड्यातील अनेक धरणांनी मे महिन्यातच तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासह जणावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिरवा चारा नसल्याने प्राण्यांचेही मोठे हाल होत आहेत. सध्या मराठवाड्याची स्थिती ही ना धरणांत पाणी ना चारा अशी झाली आहे. यामुळे अशीच स्थिती राहिली तर मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थीत आणखी भीषण होण्याची स्थिती आहे.
यावरून मुख्यमंत्री शिंदे हे गुरूवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. ते येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी तीन वाजता मराठवाड्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी सर्व जिल्हाधिकारी, सर्व पालकमंत्री, कृषी अधिकाऱ्यांसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आजच्या बैठकीत प्रामुख्याने मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरच्या भीषण पाणी टंचाईसह दुष्काळसदृश स्थितीवर चर्चा होणार आहे. तसेच या आढावा बैठकीत तत्काळ मदतीसाठी मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे. तसेच बैठकीमध्ये चारा टंचाईवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मागील काही दिवसापासून राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर तत्काळ मदत आणि उपायोजना या आचारसंहिता लागू असल्याने करता न आल्याचेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान दुष्काळसदृश स्थितीत उपायोजना आखत मदत करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी अशी खास विनंती निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारने केली आहे.
तर आता राज्यातील शेवटच्या टप्प्यातील देखील मतदान पार पडले असून आता यात अडचण न नसल्याने आचारसंहितेत आयोगाकडून शिथिलता मिळू शकते असा दावा सरकारचा आहे. तर गुरूवारी याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.