Israel Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Israel Organic Farming : चेरी टोमॅटो, सौरऊर्जा, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान

Team Agrowon

डॉ. प्रशांत नायकवाडी
भाग २

Israel Farming : यंदाच्या ऑगस्टमध्ये इस्राईल देशाचा अभ्यास दौरा करण्याची संधी मला मिळाली. यावेळी तेथील शेती पद्धती, विविध तंत्रज्ञानाची माहिती अनुभवता आली. त्याचा पूर्वार्ध मागील बुधवारी (ता. १३) प्रसिद्ध झाला. चेरी टोमॅटो, सेंद्रिय शेती, क्षारता कमी करणे, सौरऊर्जा आदी तंत्रज्ञानाविषयीची माहिती प्रस्तुत दुसऱ्या भागात देत आहे.

यंदाच्या ऑगस्टमध्ये तज्ज्ञांसमवेत इस्राईल देशाचा अभ्यास दौरा करून तेथील शेती, त्यातील
तंत्रज्ञान व शेतकरी प्रयोग आदींचा जवळून अभ्यास करता आला. मागील भागात संस्था तसेच
तेथील प्रगतशील शेतकरी चेरी शेरॉन यांच्या काही तंत्रज्ञान- प्रयोगांविषयी माहिती आपण घेतली. या भागात उर्वरित माहिती घेऊया.

पाण्याची क्षारता कमी करणारे तंत्र

पाण्यातील क्षारता कमी करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने समुद्रातील पाण्याचा पिण्यासाठी आणि सिंचनासाठी सातत्यपूर्ण पुरवठा इस्राईलमध्ये आहे. शेरॉन सिंचन वा फवारणीसाठी ताजे पाणी आणि खारट असे पाणी वापरतात. स्वयंचलित सिंचन प्रणालीद्वारे पाण्याच्या सामुची पातळी योग्य राखली जाते. आवश्यक वेळापत्रकानुसार पिकांना वेळेवर पाणी दिले जाते. इस्राईल सरकारने शेतकऱ्यांना पुरेसे पाणी पुरवले जावे यासाठी समुद्र किनारी डिसॅलिनेशन प्लांट उभारले आहेत. वाळवंटात आणि देशाच्या अन्य प्रदेशांमध्ये पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन तसेच जोडण्या (‘कनेक्शन्स’) दिसून येतात. वाळवंटात दोनहजार ते तीनहजार मीटर खोलीवर क्षारयुक्त पाणी उपलब्ध आहे. सरकारला देण्यात येणारे गोड्या पाण्याचे दर सुमारे ५० रुपये प्रति लिटर असे आहेत.

चेरी टोमॅटो आयकॉन

चेरी शेरॉन संपूर्ण इस्राईल देशात विक्रमी उत्पादनामुळे चेरी टोमॅटो आयकॉन म्हणून ओळखले जातात.
त्यावर ते थट्टेने म्हणतात चेरी हे माझे नाव कदाचित माझ्या या पिकातील कामामुळे ईश्‍वराने आधीच प्रदान केले असावे. नेगेव वाळवंटी प्रदेश प्रामुख्याने चेरी टोमॅटो उत्पादनासाठी ओळखला जातो. संपूर्ण देशात सातत्याने त्याची मागणी असते. येथील चेरी टोमॅटो उत्पादक वर्षानुवर्षे चांगले दर मिळवत आहेत. आणि ते सातत्याने वाढत आहेत. सुरवातीला काही प्रयोगांमध्ये अयशस्वी होऊन प्रयोगशीलता आणि सातत्यपूर्ण सुधारणा शेरॉन यांनी केल्या. तीव्र उष्ण हवामानातील विविध पिकांचे जीवनचक्र समजून घेत ते बाजारपेठेतील ब्रँड बनले आहेत. त्यांच्या मालाला इस्राईलमध्ये चांगली मागणी आहे

संस्थेतील संशोधन

द योएल डीमॅलाच, रमत नेगेव डेझर्ट ऍग्रो रिसर्च अँड बिझनेस सेंटर ही संस्था चेरी टोमॅटोसाठी
वाळवंटातील शेतकऱ्यांना मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. संस्थेने ५० वर्षांपूर्वी काम सुरू केले. शेरॉन यांच्यासमवेत या संस्थेलाही भेट देण्याचा योग आला. तेथील शास्त्रज्ञांनी
अनेक वर्षाच्या संशोधनातूंन क्षार आणि उष्णता सहनशील पिकांच्या जातींची निर्मिती केली आहे. यात जोजोबा, खजूर, डाळिंब आदींचा समावेश आहे. पिकातील संतुलित अन्नद्रव्ये, क्षार आणि उष्णतेच्या प्रति सहनशीलता तपासण्यासाठी ‘फायटो मॉनिटरिंग सेन्सर’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे


विपणन व्यवस्था

नेगेव वाळवंटात स्थानिक मजूर सहज उपलब्ध होत नाहीत आणि मजुरीही खूप जास्त असते. शेरॉन यांनी प्रगत ग्रीन हाऊसेस तंत्रज्ञान वापरण्याबरोबर थायलंडहून मजूर आयात केले आहेत.
तेथील १५ ते २० कामगार वर्षभर काम करतात. प्रति दिवस प्रति कामगार खर्च २५० ते ३०० शेकेल म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे तो ५५५० ते सातहजार रुपये प्रति दिवस आहे.
पूर्वीच्या व्यवसायातील अनुभवामुळे शेरॉन यांचा घाऊक विक्रेते आणि सुपरमार्केट व्यवस्था यांचा चांगला अभ्यास आहे. चांगल्या दर्जाच्या भारतीय भाज्यांना इस्राईलच्या बाजारपेठेत जास्त
मागणी आहे. त्यासाठी वर्षभर चांगले पैसे मिळतात तेथील बाजारात मिरची २५ ते ३० शेकेल प्रति किलो (भारतीय चलनात ५०० ते ६०० रुपये प्रति किलो) विकली जाते. शेरॉन यांनी भाजीपाला साठवणुकीसाठी पॅकिंग, स्टोअर युनिट तसेच नेगेव वाळवंटातील शेतात २० बाय १० फूट आकाराचे वातानुकूलित शेड उभारले आहे. शेरॉन एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्यांचा वापर करतात. कीडनाशकांचा
वापर खूप कमी आहे. सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नका या उक्तीप्रमाणे पिकांची फेरपालट व बाजारपेठेतील मागणीनुसार त्यांची शेती पद्धती आहे.

इस्राईलमधील सेंद्रिय शेती

या देशात सेंद्रिय शेतीसाठीचा ५७६५ – २००५ हा स्वतंत्र राष्ट्रीय कार्यक्रम निर्माण करण्यात आला आहे. या प्रमाणीकरण कायद्याद्वारे सेंद्रिय उत्पादन आणि विक्रीच्या संपूर्ण बाबींचे नियमन केले
जाते. यात पीक उत्पादन पद्धत, वर्गीकरण, पॅकेजिंग, वाहतूक आणि ग्राहकांच्या माहितीसाठी सेंद्रिय उत्पादनावर योग्य चिन्हांकन यांचा समावेश करण्यात आला आहे. वनस्पती व पाळीव प्राणी आधारित सेंद्रिय उत्पादनांचा या कार्यक्रमात समावेश आहे. त्यानुसार प्रत्येक उत्पादनावर सेंद्रिय चिन्ह आणि उत्पादनावर प्रमाणीकरण संस्थेचे चिन्ह असणे आवश्यक केले आहे.
‘प्लांट प्रोटेक्शन अँड इंस्पेक्शन सर्व्हिसेस’ ही कार्यक्रम राबविणारी अधिकृत संस्था
आहे. ती युरोपिय महासंघानद्वारे मान्यताप्राप्त असून कृषी आणि ग्रामीण विकास
मंत्रालयांतर्गत कार्य करते. वनस्पती संरक्षण कायदे, नियमांची अंमलबजावणी,
वनस्पती, कीटकांचे निरीक्षण, उत्पादनांची आयात, निर्यात आदींमध्ये ती सेवा प्रदान करते.
उत्पादनांच्या व्यापारासाठी आवश्यक आरोग्यविषयक, निर्यातविषयक आणि ताज्या उत्पादनाच्या गुणवत्तेची विश्वासार्हता दर्शविणारी प्रमाणपत्रे ती जारी करते. प्रमाणीकरणासाठी
देशात चार अधिकृत संस्थांना मान्यता देण्यात आली आहे.

सेंद्रिय उत्पादन

देशातील एकूण उत्पादनापैकी सेंद्रिय उत्पादनाचा हिस्सा १.५ टक्के तर एकूण कृषी निर्यातीत
हा वाटा सुमारे १३ टक्के आहे. सेंद्रिय शेतीवर आधारित उद्योगात सुमारे ७२० घटक समाविष्ट
आहेत. यात शेतकरी, आयातदार, विक्रेते आदींचा समावेश आहे. तेथील कृषी विभागाच्या माहितीनुसार सुमारे १६४०७. ७९७ एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आहे यात अन्नधान्य ४४ टक्के, भाज्या ९टक्के,
फळे २८, मसाले २, अन्य पिके १७ टक्के (औषधी वनस्पती, फुले आदी) यांचा समावेश आहे.

सौरऊर्जा तंत्रज्ञान

पहिले इस्रायली पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन यांच्या १९५५ मधील भाषणाचा
संदर्भ लक्षात घेऊया. त्यानुसार या वाळवंटी देशाने वैज्ञानिक संकल्पनेतून दोन अत्यावशक स्वप्नवत बदल प्रत्यक्षात आणले. त्यातील एक म्हणजे समुद्रातील पाण्याचे क्षार कमी करण्याचे तंत्रज्ञान.
दुसरा बदल म्हणजे सौर ऊर्जेचा जगातील अनोखा प्रकल्प. आशालिम सौर ऊर्जा केंद्र हे बेअर शेवा या जिल्ह्याच्या असलेल्या शहराच्या दक्षिणेस आहे. आशालिमच्या किबुट्झ (सहकारी पद्धतीने शेती
करणारे गट) जवळील नेगेव वाळवंटात उभारण्यात आलेले केंद्रीय सौर ऊर्जा केंद्र आहे. यात तीन वेगवेगळ्या तंत्रज्ञानासह तीन विभाग आहेत. यात सौर औष्णिक ऊर्जा, फोटो व्होल्टेक ऊर्जा
( जे सूर्यप्रकाशाचे थेट विजेत रूपांतर करते) आणि नैसर्गिक वायू असे तीन प्रकार आहेत.
आशालिम विभाग ए हा साडेचार तास सौरऊर्जा साठवणूकीसह १२१ मेगावॉट वीज पुरविणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आशालिम विभाग बी मध्ये सौर ऊर्जेचा टॉवर आहे. त्याची स्थापित क्षमता १२१ मेगावॉट आहे. त्यावर आधारित संगणक-नियंत्रित सौर पॅनेल्सद्वारे एक लाख २० हजार घरांना पुरेल इतकी वीजउर्जा निर्माण केली जाते. सूर्याची उष्णता कोणत्याही कोनातून गोळा करण्याचे तंत्रज्ञान येथे आहे. सौरउर्जेतून निर्माण झालेला नैसर्गिक वायू सुमारे साठहजार घरांसाठी पुरेशी वीज निर्माण करण्यासाठी समर्थ ठरतो.

भाग दोन समाप्त

डॉ.प्रशांत नाईकवाडी- ८८८८८१०४८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Management : सिंचन व्यवस्थापन बदलत्या वातावरणाशी सुसंगत हवे

Cotton Disease : कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली

E-Peek Pahani : ई-पीकपाहणीची अट रद्द करा

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

SCROLL FOR NEXT