Indian Marriage
Indian Marriage Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Marriage : लग्नातील बदलते मध्यस्थ

शेखर गायकवाड

लग्न जमवण्याची पद्धतसुद्धा शंभर-सव्वाशे वर्षात झपाट्याने बदललेली आहे. साधारणतः १९५० पर्यंत अनेक कुटुंबांत प्रत्यक्ष मुलगा-मुलगी न पाहताच आई-वडील, आजोबा किंवा चुलते लग्नासाठी शब्द देत होते. घर, शेती, घराणे इत्यादी गोष्टी बघून मोठे लोक परस्पर लग्न ठरवत असत. यांपैकी अनेक कुटुंबातील व्यक्तींना मुलगा मुंबई, पुण्याला किंवा अन्य ठिकाणी नोकरीला असल्याचे माहिती असायचे. १९३० ते ५० च्या दरम्यान बहुसंख्य लोक ग्रामीण भागातून गोदीमध्ये किंवा कापड गिरण्यांमध्ये नोकरीला लागायचे.

सुरुवातीला वर्ष दीड वर्ष पोटाला कात्री लावून आणि पैसे वाचवून भाड्याच्या घरात राहायचे. दोन, तीन वर्षांनी पैसे साठवून कोणत्या तरी चाळीत एक खोली घेतली की मुलगा स्वतःच्या पायावर उभा आहे, असे भावकीला समजायचे. अशा मुलाला कर्तृत्ववान समजले जाई. बरीच लग्न ही गावच्या जत्रेच्या वेळी सगळे पाहुणे गावी असतानाच ठरायचे. लग्नामध्ये मुलाच्या किंवा मुलीच्या बाजूने बोलणारे मध्यस्थ असायचे. मध्यस्थांना सुद्धा लग्न जमवल्याच्या फार अभिमान असायचा व लग्न समारंभात सगळ्यात जास्त मान त्यांना दिला जात असे.

१९५० पर्यंत जुनी अकरावीपर्यंत पोहोचलेला नवरा ग्रामीण भागात हा शिकलेला मानला जायचा. १९७०-८० च्या दशकापर्यंत पदवीधर मुलाला अकरावी-बारावी झालेली मुलगी ही समपक्ष मानली जायची. एखाद्याने मुलीने जास्त शिकावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर साखरपुडा करून त्यानंतर बारावी किंवा पदवीधर करायचा प्रयत्न व्हायचा. शंभर वर्षानंतर जो बदल आणि फरक जाणवतो तो नेमका हाच. लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर सुद्धा सर्रासपणे दोन-तीन वर्षांनी लग्न व्हायची तरी कोणतीही अडचण त्या वेळी कुटुंबांना भासली नाही.

विवाह कायद्यामध्ये कसलाही बदल न करता सकाळी साखरपुडा आणि दुपारी लग्न ही पद्धती १९८० च्या दशकात निर्माण झाली. याबद्दल कोणत्याच कायद्यात सुधारणा झाली नाही. समाजाने हा बदल कसा स्वीकारला, हे एक गूढ आहे. एकदा लग्न जमून ठेवले आणि साखरपुडा झाल्यावर लग्नामध्ये फार अंतर असेल तर ‘लोक काड्या घालतात’ असे उत्तर मिळते. फसवणुकीच्या घटना झाल्यानंतर लोक मध्यस्थांना दोष देऊ लागले. लग्नापासून जमिनीच्या सौद्यांपर्यंत एरवी सर्व ठिकाणी असणारे मध्यस्थ हळूहळू कमी होऊ लागले. याच काळात लग्नासाठी जवळचे नातेवाईक चार-पाच दिवसांसाठी पूर्वी मुक्कामाला यायचे तेही कमी होऊ लागले.

१९९१ च्या भारतातील आर्थिक सुधारणानंतर शैक्षणिक कर्ज मिळायचे दरवाजे सर्व सामान्यांसाठी उघडे झाले. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या ठिकाणी भारतीय विद्यार्थी शिकायला जाऊ लागले. युक्रेन युद्धानंतर सुद्धा शेकडो विद्यार्थी विशेषतः डॉक्टर होण्यासाठी तिकडे गेलेले भारतात परत आले. जानेवारी २०२१ मध्ये एकूण ८५ देशांमध्ये १० लाख भारतीय विद्यार्थी शिकायला गेले. परदेशी शिकायला गेल्यावर तिकडेच चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत असल्यामुळे दोन-तीन वर्षे झाली की लग्न जमवण्याची चर्चा सुरू होते. त्यामधून लग्न जमवणाऱ्या विवाह संस्थांचे जाळे विस्तारले. व्यक्तिगत मध्यस्थांची जागा विवाह संस्थांनी घेतली आहे.

दोन्ही बाजूंची उजळपणे व मार्केटिंग तंत्राने, दुसऱ्यावर प्रभाव पडेल अशा पद्धतीने फोटो, व्हिडिओ, बायोडाटा यांचे वारे लागले. खास लग्नासाठी हेवी मेकअप करून, फोटोशूट करून ठरावीक अँगेलने फोटोजेनिक चेहरे दिसू लागले. ग्रामीण भागातून मुलगा मास्टर्स करायला इंग्लंड, अमेरिकेला गेला असेल तर चार-पाच फोटोपैकी एक मॉडर्न, दुसरा नऊवारी साडी घालून नथ घालून, तिसरा कॅज्युएल वेअर वर असे मार्केटिंगचे उच्च तंत्र वापरले जाऊ लागले. फोटो जसा दिसतो तसा मुलगा किंवा मुलगी दिसत नाही, असा साक्षात्कारसुद्धा पाठोपाठ चालत आला. प्रत्यक्ष मुलगा किंवा मुलीशी बोलल्याशिवाय किंवा काही दिवस चॅटिंग केल्याशिवाय लग्न जमवणे दोन्ही बाजूंना अडचणीचे वाटू लागले आहे. डिजिटल सॅम्पल आणि प्रत्यक्ष यामध्ये फरक पडू लागला आहे. शेकडो वेळा व्हिडिओ कॉल करून व इन्फॉर्मली एकमेकांना पाहण्याची, अजमावण्याची पद्धत रुळू लागली आहे. कोरोनाच्या काळात तर व्हिसा न मिळाल्यामुळे प्रवासाची बंधने पाहता व जाणे-येणे दुरापास्त झाल्यामुळे आई-वडिलांच्या गैरहजेरीत कित्येक लग्न झाली. लग्न जमवण्यामध्ये आता मुलाचा व्हिसा, मुलीचे शिक्षण, मुलीचा व्हिसा, असे नवेच निकष लागू झाले आहेत. लग्न जमवणे आता नातेवाइकांच्या तसेच आई-वडिलांच्या हातातून सुटून गेले आहे. भारतात असणाऱ्या जातीच्या भिंती परदेशी विद्यार्थ्यांच्या व शहरी विद्यार्थ्यांच्या बाबतीत गळून पडू लागल्या आहेत.

शहरीकरणाची गर्दी वाढल्यानंतर लग्न जमवण्यापूर्वी आता सोशल मीडियाचा सर्वांत जास्त आधार घेतला जात आहे. एका हुशार मुलीने लग्न जमवण्याच्या पूर्वीच मुलगा जी मोटर सायकल फिरवतो ती आरटीओमध्ये दुसऱ्याच्या नावावर नोंद केलेली आहे आणि घर सुद्धा त्याच्या नावावर नाही असा शोध लावला. सोशल मीडियावर केलेल्या कॉमेंट्स व लाइक्सवरून स्वभावाचा अंदाज बांधण्याचा हा काळ आलेला आहे. जिवंत मध्यस्थांऐवजी मोबाईल व संगणक हे नव्या काळातील मध्यस्थ ठरू पाहत आहेत. अशा वेळी जे डोळ्यांना दिसते ते खरे आहे का? हा शतकानुशतके पडलेला प्रश्‍न मात्र कायम राहिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT