Indian Agriculture : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची ५५ टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा १५ ते १६ टक्के वाटा आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबर अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात होणे ही काळाची गरज आहे. अनेक उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल हा शेती मधूनच पिकवला जातो. देशाची अर्थव्यवस्था आणि विकासदर हा शेतीच्या उत्पादकतेवर अवलंबून आहे.
या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी शहरी व ग्रामीण भागातील युवकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी युवकांना कृषिविषयक शिक्षण आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.
कृषी पदविका
इयत्ता दहावीनंतर कृषी शिक्षणाकरिता पदविका हा २ वर्षांचा अभ्यासक्रम आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतन मध्ये हा अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेतले जातात.
पदवी अभ्यासक्रम
हा अभ्यासक्रम ४ वर्षांचा असून, त्याची ८ सत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
पात्रता : बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण (PCMB, PCB) सह MHT-CET किंवा JEE किंवा NEET यापैकी एक सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण.
बीएसस्सी ॲग्रीमध्ये प्रवेश देण्याकरिता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे व सीईटी सेल मुंबई यांच्या मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.
पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ आणि विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठात कृषी शाखेशी निगडित बीएसस्सी ॲग्री, बीएसस्सी हॉर्टिकल्चर, बीएसस्सी फॉरेस्ट्री, बी. टेक. फूडटेक, कृषी अभियांत्रिकी, होम सायन्स इ. अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
पदव्युत्तर पदवी (एमएस्सी)
कृषी शाखे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. यासाठी विद्यार्थ्यांना आयसीएआर/एमसीएईआर (ICAR/MCAER) मार्फत घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर गुणानुक्रमे निवड होऊन पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विविध शाखेत अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळतो.
आचार्य पदवी
आचार्य पदवी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांची ICAR/MCAER मार्फत होणारी सीईटी परीक्षा देऊन गुणानुक्रमे उपलब्ध असलेल्या आचार्य पदवीचे जागेवर त्याची निवड होते.
रोजगाराच्या संधी
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खासगी क्षेत्रासह सरकारी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. कृषी आस्थापना, सरकारी व निमसरकारी आणि सहकारी आस्थापना, केंद्रीय कृषी आस्थापना, बँक व विमा क्षेत्र इ. क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
सरकारी नोकरी
केंद्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध सरकारी कार्यालयातील जागांसाठी विशेषतः कृषी विभागातील पदांसाठी कृषी पदवीधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी केंद्रिय स्तरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे तर महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा आयोजित केल्या जातात.
भारतीय कृषी संशोधन संस्थे (ICAR) अंतर्गत विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रावर कृषी पदवीधारकांना काम करण्याची संधी प्राप्त होते.
राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये कृषी अधिकारी, प्रोफेशनल ऑफिसर, क्लर्क या पदांवर IBPS मार्फत परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठी देखील कृषी क्षेत्रात शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यी पात्र ठरतात.
राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, नॅशनल सीड्स लिमिटेड, इफ्को, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड इत्यादी संस्थांमध्ये विविध पदांवर कार्य करण्याची संधी उपलब्ध आहेत.
जिल्हा परिषदेचे अंतर्गत असलेल्या विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी इत्यादी पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होते.
खासगी क्षेत्रातील संधी
कृषी पदवीधारकांना कृषी क्षेत्रातील विविध खासगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी आहेत. जसे की बियाणे, कीटकनाशके, खते, ठिबक तुषार सिंचन कंपन्या, खासगी क्षेत्रातील बँक, प्रक्रिया उद्योग, कृषी अवजारे कंपन्या, कृषी सल्ला केंद्र, विमा कंपन्यांमध्ये काम करता येते.
स्वतःचा उद्योग व व्यवसाय सुरू करणे
दर्जेदार पीक उत्पादन मिळविण्यासाठी काटेकोर पीक व्यवस्थापन करणे गरजेचे असते. यासाठी कृषी निविष्ठा, सिंचन, मशागत, कृषी अवजारे, अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा प्रकारच्या संलग्न व्यवसायांमध्ये अनेक सेवा संधी दडलेल्या आहेत. शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करून स्वतःच्या प्रक्रिया उद्योगाची उभारणी करता येते.रोपवाटिका व्यवसाय, कृषी सेवा केंद्र या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात.
संजय बडे, ७८८८२ ९७८५९
(दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.