Parbhani News : विस्तार शिक्षण विभागाच्या संशोधनातून विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीची परिणामकारकता समजते. शेतकऱ्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी आवश्यक शिफारशीची गरज आहे. शेतकरी वापरत असलेली रासायनिक खते व त्यावर होत असलेल्या खर्चावर संशोधन झाले पाहिजे.
शासकीय अधिकाऱ्यांची विश्वासार्हता वाढली पाहिजे असा सूर शास्त्रज्ञ-शेतकरी-अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २३) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विस्तार शिक्षण विभाग अभ्यास मंडळाची ७३ वी बैठकीत उमटला.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. विस्तार शिक्षण विभागप्रमुख व अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश कदम अध्यक्षस्थानी होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, शेलगाव (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील प्रगतिशील शेतकरी हनुमंत ऊर्फ युवराज माणिकराव राजगोरे-पाटील, अभ्यास मंडळाचे सचिव डॉ. सुनीलदत्त जक्कावाड उपस्थित होते.
या वेळी पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवी अभ्यासक्रमातील ३० विद्यार्थ्यांनी (२६ पदवी व पदव्युत्तर आणि ४ आचार्य पदवी) त्यांच्या संशोधन प्रकल्पांची रूपरेषा सादर केली. सर्व सदस्यांच्या सूचनांनंतर त्यास मंजुरी देण्यात आली. डॉ. वैद्य म्हणाले, की विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीतील अडचणी संशोधन केंद्राला कळवाव्यात. त्यावर आधारित शिफारशी करून सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत.
डॉ. कदम म्हणाले, की दरवर्षी विभागातील ३२ विद्यार्थी मराठवाड्यातील चार हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून माहिती संकलित करतात. विद्यापीठाचे दूत म्हणून कार्य करत शेतकऱ्यांपर्यंत संशोधन पोहोचवावे. राजगोरे-पाटील म्हणाले, की शास्त्रज्ञांच्या शिफारशींच्या आधारेच शासन धोरण, योजना तयार करते. त्यासाठी अचूक संशोधन अत्यावश्यक आहे.
पाटील म्हणाले, की विद्यार्थ्यांनी भरपूर माहिती संकलित करून विचारपूर्वक निष्कर्ष काढावेत. रासायनिक खतांचा वापर आणि त्यावरील खर्च यासंदर्भातही संशोधनाची गरज आहे. बहुतांश शेतकरी सरकारी अधिकाऱ्यांकडून योजना माहितीसाठी घेतात. परंतु तांत्रिक मार्गदर्शनासाठी खाजगी संस्थांवर अवलंबून राहतात. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी आपली विश्वासार्हता वाढविण्याची गरज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.