Pune News: काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वांत जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत. तर भाजप दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला व मंत्रिमंडळाकडे पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतात. एक कोटी सदस्य व मोदींसारखे नेतृत्व आहे म्हणतात पण ते नेतृत्व सक्षम नसून पोकळ आहे. म्हणूनच त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घ्यावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपच काँग्रेसयुक्त झाला, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे खडकवासला येथे सोमवारी (ता. ११) उद्घाटन झाले. या वेळी श्री. सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यू. बी. व्यंकटेश, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
श्री. सपकाळ म्हणाले, की नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली असून प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित असावा हा त्यामागचा उद्देश आहे. दोन दिवस वरिष्ठ नेते व विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत आगामी काळातील कार्यक्रमांची रूपरेषा ठरवली जाईल व कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे. निवडणुकीपुरते जागे व्हायचे आणि निवडणुकीनंतर सर्व संपले असा काँग्रेसचा विचार नसून काँग्रेस हा नितंरत चालणारा व स्वराज्याच्या दिशेने कुच करणार पक्ष आहे.
श्री. धोरात म्हणाले, की काँग्रेसला बलिदानाचा इतिहास आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. काँग्रेसने कठीण काळ पाहिलेला आहे व पराभवही पाहिलेला आहे पण यातूनही काँग्रेस पक्षाने उभारी घेतली व पुन्हा विजय संपादन केला. आपल्याला जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घ्यावे लागतील. बँकिंगचे विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत. नाफेडमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे मुद्दे घेऊन आपल्याला काम करावे लागणार आहे.
राज्यात भाजप युतीचे लुटेरे सरकार
श्री. वडेट्टीवार म्हणाले, की आपल्या समोर आव्हाने खूप आहेत, काँग्रेसने सत्ता सर्वोच्च कधीच मानली नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज घटकांना नजरेसमोर ठेवून काम केले. भाजप मात्र फक्त दोन उद्योगपतींसाठी सरकार चालवत आहे. सत्ता ही सामान्य माणसांसाठी असली पाहिजे. लोकांना जोडण्याचे काम करा, तुमची ओळख कामाने, कर्तृत्वाने निर्माण करा. घराघरात जा व लोकांच्या अडचणी, समस्या, प्रश्न जाणून घ्या. राज्यात भाजप युतीचे लुटेरे सरकार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.