Kariba Management Agrowon
ॲग्रो विशेष

Weed Management : तलावांमधील करीबा तणाचे जैविक व्यवस्थापन

Kariba Weed : करीबा ही गोड्या पाण्यातील तलावांमध्ये वाढणारी वनस्पती आहे. ही वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर जाड आवरण तयार करते. त्यामुळे पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येते.

Team Agrowon

डॉ. व्ही. व्ही. गौड, डॉ. सुशील कुमार

Biological Management of Kariba Weed : साल्विनिया मोलेस्टा या वनस्पतीस सॅल्विनिया किंवा करीबा असे म्हटले जाते. ही पाण्यावर तरंगणारी वनस्पती असून, तिला ‘वॉटर फर्न’ म्हणूनही ओळखली जाते. हिचे मूळस्थान दक्षिणपूर्व ब्राझील आहे. सध्या गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांतील अनेक तलाव आणि गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये या वनस्पतीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

यापूर्वी या वनस्पतीचा प्रादुर्भाव दक्षिण भारत तसेच ओडिशा, उत्तराखंड राज्यात दिसून आला आहे. ही वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर जाड आवरण तयार करते. त्यामुळे जलाशयातील मासे, पाण्यात वाढणाऱ्या शेवाळ आणि इतर वनस्पतींना धोका निर्माण होतो.

तसेच वनस्पतीच्या सततच्या वाढीमुळे जलाशयांची खोली कमी होऊन पाणी पातळीत हळूहळू घट येण्यास सुरुवात होते. या वनस्पतीचा प्रादुर्भाव सध्या राज्यातील काही जिल्ह्यांत आढळून येत असला तरी तिचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, राज्यातील इतर भागांत तिचा प्रसार होऊन गोड्या पाण्याचे स्रोत धोक्यात येण्याची शक्यता आहे.

नुकसानीचा प्रकार

वनस्पतीची पाण्याच्या पृष्ठभागावर जाड चटईसारखी वाढ होते. त्यामुळे सूर्यापासून येणाऱ्या प्रकाश किरणांना पाण्यात जाण्यास प्रतिबंध होतो. त्याचा पाण्यातील जीवसृष्टीवर विपरीत परिणाम दिसून येतो. पाण्यातील माशांचे प्रमुख अन्न असलेले जलीय शेवाळ आणि पाण्यात वाढणाऱ्या इतर वनस्पती हळूहळू नष्ट होतात. आणि माशांना खाण्यास अन्नाची उपलब्धता हळूहळू कमी होते.

या तणवर्गीय वनस्पतीच्या वाढीमुळे पाण्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होत जाते.

वनस्पतीची होणारी सततची वाढ आणि विघटनामुळे जलस्रोतांची खोली कमी होत जाते. परिणामी जलाशयातील उपलब्ध पाणी पातळी कमी होते. आणि जलस्रोत नष्ट होण्याची शक्यता असते.

वनस्पतीच्या प्रादुर्भावामुळे तलावांमध्ये मासेमारी करण्यास अडथळे येतात. मासे पकडण्यासाठी टाकलेले जाळे वनस्पतींमध्ये अडकते. तसेच मासेमारीच्या नौका किंवा बोटी पाण्यात मुक्तपणे फिरविण्यास अडचण येते. याशिवाय वनस्पतीसोबत संपर्क झाल्यामुळे अंगाला खाज सुटत असल्याच्या तक्रारीदेखील काही मच्छीमारांनी केल्या आहेत.

जैविक तण व्यवस्थापन

हे तण यांत्रिक पद्धतीने काढणे अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे. यांत्रिक पद्धतीने फक्त लहान तलावांमधील तण काढणे शक्य होते. मात्र संपूर्ण तणनिर्मूलन करणे शक्य नाही. अशावेळी जैविक नियंत्रण पद्धती अत्यंत उपयोगी ठरते. जैविक नियंत्रणासाठी ‘सिरटोबॅगस साल्विनी’ या किडीचे प्रौढ उपयुक्त आहेत.

या कीटकांच्या मदतीने पूर्व विदर्भातील गडचिरोली हेटी (५० हेक्टर), लांजेडा (१० हेक्टर) आणि इंदिरानगर तलाव (२० हेक्टर) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना तलावांमध्ये यशस्वीरीत्या तणनियंत्रण करण्यात आले आहे. तण नियंत्रणासाठी डिसेंबर २०२२ मध्ये तण व्यवस्थापन निदेशालय, जबलपूर यांच्याद्वारे ‘सिरटोबॅगस साल्विनी’ या किडीचे प्रौढ आणि अळी अवस्था तलावांमध्ये सोडण्यात आल्या होत्या.

त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत अखिल भारतीय समन्वित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प आणि कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथील तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत तलावांमधून तणाचे यशस्वीरीत्या नियंत्रण झाल्याचे दिसून आले.

...असे होते जैविक नियंत्रण

‘सिरटोबॅगस साल्विनी’ हे कीटक फक्त करीबा या वनस्पतीवरच उपजीविका करतात. त्याशिवाय इतर कोणत्याही वनस्पतीला खात नाही. हे या कीटकांचे गुणवैशिष्ट्य मानले जाते.

किडीचे प्रौढ तणांचा टोकाकडील भाग तसेच कंद आणि फांद्यांमध्ये शिरकाव करून संपूर्ण वनस्पती फस्त करते. प्रादुर्भावग्रस्त भागात हळूहळू किडीची संख्या वाढत जाऊन मोठ्या संख्येने पसरतात.

नियंत्रणासाठी हेक्टरी साधारण २० हजार ते २२ हजार या संख्येत भुंगेरे सोडल्यास साधारण १० ते ११ महिन्यांत करीबा तणांचे प्रभावी व्यवस्थापन होण्यास मदत होते.

डॉ. व्ही. व्ही. गौड, ८६३७७०७६४५ (कृषी विद्यावेत्ता व मुख्य अन्वेषक, अखिल भारतीय समन्वित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Damage: अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत द्या

Crop Insurance: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६ लाख ७ हजारांवर अर्ज

Aerogel: खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारा एअरोजेल विकसित

Cotton Farming: जमिनीची ताकद वाढवून कापूस उत्पादनवाढ

Indian Language: भाषा मरता देशही मरतो...

SCROLL FOR NEXT