Pune News : राज्याच्या कृषी आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे ज्येष्ठ सनदी अधिकारी रावसाहेब भागडे यांच्याकडे चौथ्यांदा सोपविण्यात आली आहेत. सर्वांत जास्त वेळा प्रभारी आयुक्तपद सांभाळण्याचा विक्रमदेखील त्यांच्या नावे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्य शासनाने कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांना कार्यालयीन प्रशिक्षणासाठी परराज्यात पाठवले आहे. प्रशिक्षण आटोपून ते एक आठवड्यानंतर आयुक्तालयात परतण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आयुक्तपदाची सूत्रे श्री. भागडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालकपद भूषविणाऱ्या श्री. भागडे यांनी आतापर्यंत चार वेळा प्रभारी कृषी आयुक्तपदाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच श्री. बिनवडे यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे श्री. भागडे गेल्या दोन आठवड्यांपासून नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत.
‘‘कृषी खात्याच्या कामाची पद्धत, महत्त्वाच्या योजना तसेच अडीअडचणींची सखोल माहिती श्री. भागडे यांना आहे. कामकाज करताना कर्मचाऱ्यांना दबावात न घेता आस्थेने समजावून सांगण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रभारी आयुक्तपदाच्या काळात कृषी आयुक्तालयाचे कामकाज विस्कळीत झाले नाही. राज्य शासनाने त्यांना पूर्णवेळ आयुक्तपदाची संधी द्यायला हवी,’’ असे मत एका कृषी संचालकाने व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून १९९४ मध्ये राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेले श्री. भागडे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादच्या टाकळी राजाराय गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. ते भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) २००९ मध्ये दाखल झाले. महसूल व कृषी संलग्न विभागांमध्येच त्यांची बहुतेक सेवा झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व त्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून त्यांनी उत्तम कामकाज केले आहे. ‘‘प्रभारी कृषी आयुक्तपदाच्या कालावधीत श्री. भागडे यांनी कोणतेही वादग्रस्त निर्णय घेतले नाहीत. मात्र किचकट विषय हाताळताना त्यांनी कृषी संचालकांना तसेच अधिकाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शन केले,’’ असे एका कृषी सहसंचालकाने सांगितले.
राज्याच्या कृषी आयुक्तपदाला सुनील केंद्रेकर यांच्या कारकिर्दीपासून लागलेली घरघर अजूनही थांबलेली नाही. केंद्रेकर यांच्यानंतर सच्चिंद्र प्रताप सिंह, धीरज कुमार, डॉ. प्रवीण गेडाम अशा सनदी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तपदी नेमले गेले. मात्र प्रत्येकाच्या बदल्या तडकाफडकी होत गेल्या. सध्याचे आयुक्त श्री. बिनवडेदेखील पदभार घेतल्यापासून स्थिरावलेले नाहीत. रजा, निवडणूक आचारंसहिता, विदेश दौरा, प्रशिक्षण दौरा यामुळे त्यांना आयुक्त म्हणून स्थिरता लाभलेली नाही. त्यामुळे, राज्यभर दौरा करून सूत्रबद्ध पद्धतीने कामाची संधी त्यांना मिळाली नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी वर्गाच्या सेवेचा आनंद मिळतो
प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे म्हणाले, की राज्य शासनाने वेळोवेळी विश्वासपूर्वक माझ्याकडे आयुक्तपदाची सूत्रे दिली. मीदेखील दरवेळी जबाबदारीने कामे पार पाडली. मलाही शेतकरी वर्गाच्या सेवेचा आनंद घेता आला. कृषिविषयक योजना, लाभ शेतकऱ्यांपर्यंत नेण्यात आयुक्तालयाची भूमिका महत्त्वाची असते. कृषी विकासाच्या प्रक्रियेचा भाग होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.