Woman Farmer  Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : मुंबई सोडून भागाबाई पुन्हा परतल्या शेतीत

मनोज कापडे

Pune News : शेतीमधील कष्ट कायमचे थांबून शहरातील सुखवस्तू जीवन जगण्याचा मोह कोणालाही होतो. मात्र, महाबळेश्वर पर्वतरांगांमधील ६० वर्षांच्या भागाबाई त्याला अपवाद ठरल्या आहेत. मुंबईतील परिवार सोडून मावळात एकट्याने शेती करण्याचा मार्ग त्यांनी पत्करला आहे.

कमळगड पर्वतरांगेत किरोंडे भागातील कष्टकरी शेतकरी आनंदा शिळामकर यांच्यासोबत ४० वर्षांपूर्वी भागाबाईंचा विवाह झाला. शेतीत पोट भरत नाही म्हणून मावळातील अनेक शेतकरी मुंबई महानगरीत गेले आणि हमाल बनले.

आनंदादेखील त्यापैकी एक होते. त्यांनी २५ वर्षे माथाडी कामगार म्हणून कामे केली. विशेष म्हणजे मुंबईत हमाली आणि मावळात शेती असे दुहेरी कष्ट आनंदा करीत होते. त्यांना भागाबाईंची सच्ची साथ होती.

“आमचे धनी अतिकष्ट करायचे. एक दिवस औत हाकत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि ते सर्वांना सोडून गेले. पण, मी डगमगले नाही. मुलगा दत्ता व मी शेती सांभाळू लागले. उदरनिर्वाहासाठी आमचा मुलगादेखील माथाडी कामगार बनला. त्याच्या लग्नानंतर मावळातील पारूबाई माझी सून बनली.

आता मुलगा, सून आणि नातू अक्षय सारेच मुंबईला राहतात. ते खूप चांगले आहेत. माझी काळजी घेतात. त्यांनी मला मुंबईच्या फ्लॅटमध्ये कायमचे राहायला नेले होते. पण, माझा जीव या दऱ्याडोंगरातील शेतीत गुंतला होता. त्यामुळे मी मुंबई सोडायचा निर्धार केला,” भागाबाई आपली जीवनकहाणी सांगत होत्या.

मुंबईतल्या फ्लॅटमधील सुखवस्तू जीवनक्रम भागाबाईंना पटत नव्हता. त्यांना मावळातील शेतीत घाम गाळून जगण्याची सवय झाली होती. एक दिवस त्यांनी मुलगा, सुनेची समजूत काढली. “मला इथं शहरात करमत नाही.

जेवण जात नाही. मला गावच्या शेतीतच राहू द्या. तुम्ही आनंदानं इथं राहा. मी तिकडे आनंदाने जगते,” असे सांगत भागाबाईंनी मुंबईला रामराम ठोकला. आता त्या स्वतः गावच्या जुन्या घरात एकट्या राहतात. शेती करतात. जनावरे सांभाळतात.

‘गाय, दोन बकरं, मांजर हाच संसार’

“मुलगा मला खूप जीव लावतो. मुंबईतून इथे येतो. शेतीकामाला मदत करतो. इथं नवं घर बांधण्याचं त्याचं स्वप्न आहे. मला गेल्या हंगामात १५ पोते भात झाला. ही गाय, हे दोन बकरं, ही मांजर हाच आता माझा खरा संसार आहे,” असे भागाबाई आनंदाने सांगतात. त्यांची ही जिद्द आता मावळातील शेतकऱ्यांना प्रेरणा देत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT