Success Story : भंडारा जिल्ह्यातील बेला गावाने ग्रामस्थांचे आरोग्य ही विकासाची संकल्पना मानत पर्यावरणपूरक उपक्रमांच्या अंमलबजावणीवर भर दिला. याची दखल घेत गावाला केंद्र सरकारने कार्बन न्यूट्रल गावाचा दर्जा देत अडीच कोटी रुपयांच्या पुरस्काराने गौरविले आहे.
चकचकीत रस्ते, सांडपाण्यासाठी गटार योजना म्हणजे ग्रामविकास अशी मर्यादित संकल्पना आज अनुभवली जाते. मात्र त्याचवेळी मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन बेला (ता.जि.भंडारा) ग्रामपंचायतीने मानवी आरोग्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात वड, पिंपळ, कडूनिंब, आवळा, विविध देशी फळझाडांची लागवड आणि संवर्धनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
या माध्यमातून सुमारे ९० हजार वृक्षांची लागवड झाली आहे. वृक्ष लागवडीबाबत प्रोत्साहनासाठी हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून रोप भेट दिले जाते. घरी बाळाचा जन्म किंवा कोणाचे निधन झाले तर त्यांची आठवण म्हणून वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. पहिल्या टप्यात गावात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांची खरेदी करण्यात आली. त्यानंतर मात्र गावस्तरावरच विविध फळांच्या बिया संकलित केल्या जातात. गावातील नागरिक चिंच, आवळा, शेवगा याबरोबरीने विविध झाडांच्या बियांचे संकलन बियाणे बॅंकेमध्ये करतात.
गाव झाले ‘कार्बन न्यूट्रल’
गावशिवारातील पर्यावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणाऱ्या गावांना कार्बन न्यूट्रल’ असे संबोधले जाते. केंद्राच्या या योजनेत बेला गावाने प्रस्ताव दाखल केला. ग्राम स्वच्छता, प्लॅस्टिक निर्मूलन, वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कचरा गाड्यांचा वापर, लोकसहभागातून वनीकरण, जल, मृदा संधारण, मुलांना दर्जेदार शिक्षण, लोकसहभागाला चालना अशा उपक्रमातून गावातील कार्बन डायऑक्साइडचे प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात आला.
याची पातळी खासगी यंत्रणेच्या माध्यमातून मोजण्यात आली. त्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाल्याचे समोर आले. तसा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात आला. ११ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘कार्बन न्यूट्रल’ गावासाठीचा एक कोटी रुपयांचा पुरस्कार बेला गावाला प्रदान करण्यात आला. सरपंच शारदा गायधने यांनी तो स्वीकारला. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा गाव अभियान योजनेत दुसऱ्या क्रमांकाचे एक कोटी २५ लाख रुपयांचे बक्षीस गावाला मिळाले आहे.
गावातील विविध उपक्रम
वायू प्रदूषण कमी होण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे १४ तसेच १५ व्या वित्त आयोग आणि स्वच्छ भारत मिशनमधून पाच इलेक्ट्रॉनिक कचरा गाड्यांची खरेदी. ओला, सुका कचरा संकलित करण्यासाठी वाणाच्या स्वरूपात कचरा कुंड्यांचे वितरण. यामुळे गावात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याचे थांबले. घनकचरा व्यवस्थापन केंद्राची उभारणी. नाडेप पद्धतीने सेंद्रिय खत निर्मितीला चालना. विविध भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी.
कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या पन्नासवर. मात्र शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारल्याने पटसंख्या ३५० वर पोहोचली. मोबाइल दुष्परिणामाची दखल घेत वाचनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी.
गाळमुक्त तलाव - गाळयुक्त शिवार योजनेतून तलावाचे खोलीकरण. यामुळे विहीर, कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ. गावात प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा.
शारदा गायधने, सरपंच,
७७७६०९२४३६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.