Honey Bee Agrowon
ॲग्रो विशेष

Environment Conservation : पर्यावरण संवर्धनामध्ये मधमाशी मोलाची...

World Environment Day : शेतामध्ये मधमाशीच्या पेट्या ठेवल्यास परागीकरणास फायदा होतो. फुलणाऱ्या वनस्पतींना अधिक बहर येऊन फळधारणा होण्यास फायदेशीर ठरतेच; शिवाय आजूबाजूची जैवविविधता वाढीस लागून पर्यावरण संवर्धनास मदत होते.

Team Agrowon

प्रिया फुलंब्रीकर

जेव्हा सपुष्प वनस्पतींमध्ये उत्क्रांती झाली तेव्हा त्यांचे परागीकरण करण्यासाठी काही जीव महत्वाचे ठरले. त्यातीलच एक सजीव म्हणजे ‘मधमाशी’. परंतु मधमाशी म्हटले, की तिच्यापासून मध मिळतो हीच गोष्ट सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते. मधमाश्या उत्कृष्ट परागसिंचन करतात, हा त्यांचा मुख्य गुणधर्म अजूनही काहीसा दुर्लक्षितच राहिला आहे.

शेतामध्ये मधमाशीच्या पेट्या ठेवल्यास परागीकरणास फायदा होतो. फुलणाऱ्या वनस्पतींना अधिक बहर येऊन फळधारणा होण्यास फायदेशीर ठरतेच; शिवाय आजूबाजूची जैवविविधता वाढीस लागून पर्यावरण संवर्धनास मदत होते. पिकाच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. मधमाश्यांपासून मेण, पराग,प्रपोलिस आणि मध असे पदार्थ मिळतात.

वसाहत निर्मिती

मधमाशी हा निसर्गातील एक अतिशय संवेदनशील कीटक आहे. प्रदूषित वातावरण, दूषित जलयुक्त पाणवठे, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरट्या जंगलतोडीमुळे कमी कमी होत असलेले वन क्षेत्र, वाढते शहरीकरण यामुळे सपुष्प वनस्पती कमी होत आहेत. याचा मधमाश्यांवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो.

गोंगाट, माणसांचा गदारोळ आणि मानवी हस्तक्षेप मधमाश्यांना मानवत नसल्याने या बाबी कामकरी मधमाश्या पोळे बांधण्यासाठी जागा ठरवताना लक्षात घेतात. त्यांना एखादी जागा वसाहत करण्यास योग्य वाटली तरच ती जागा पोळे बांधण्यासाठी निश्चित केली जाते. मग त्वरित कामकरी माश्या पोळे बांधणीच्या कामाला लागतात आणि बघता बघता अगदी एक-दोन दिवसांतच सुबक पोळे बांधून तयार होते.

आग्या मधमाश्यांनी एखाद्या ठिकाणी पोळे बांधलेले आढळताच ती जागा तीव्र प्रदूषणाने बाधित न झालेली, शुद्ध हवामान आणि भवताली पुरेसे पाणी व जैवविविधता असलेली समजावी. मधमाशीचे पोळे हे स्वच्छ पर्यावरण आणि समृद्ध जैवविविधता यांचे निर्देशक समजले जाते.

नैसर्गिक अधिवासाची कमतरता

जंगल, नदीकाठाचे क्षेत्र,पाणवठ्याशेजारील वृक्षराजी, उंच पर्वत, पर्वतावरील कडेकपारी, डोंगरांमधील गुहा, भव्य वृक्ष, वृक्षांमधील ढोल्या इत्यादी ठिकाणी मधमाश्या वसाहती करताना आढळतात. परंतु अलीकडे मानवाने मधमाश्यांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मधमाश्या मानवी वस्तीमध्ये पोळे बांधताना दिसून येतात. त्यांची निसर्ग संवर्धनातील उपयुक्तता लक्षात घेऊन परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा पोळे वाचवण्याकडे कल असावा.

मानवी वस्तीत नागरिकांना अगदीच अडथळा ठरेल अशा ठिकाणी पोळे लागल्यास मधमाशी मित्र संघटनेस संपर्क साधून शास्त्रीय पद्धत अवलंबून पोळ्यातील माश्यांना वाचवत पोळे तिथून काढावे. मग त्या पोळ्यातील वसाहत दुसरीकडे स्थलांतर करून पोळे बांधते.

प्लॅस्टिकचा मधमाश्यांवर होणारा दुष्परिणाम

प्लॅस्टिक कचरा हा विघटनशील नाही. याच्या तुकड्यांचे रूपांतर मायक्रोप्लॅस्टिक आणि पुढे नॅनोप्लॅस्टिकमध्ये होते. प्लॅस्टिकचा सूक्ष्मातिसूक्ष्म कचरा निसर्गातील प्राण्यांच्या शरीरात जातो. प्लॅस्टिकचे कण संवेदनशील असणाऱ्या मधमाशीच्या शरीरात खाद्य, पाणी यामार्फत जातात. मधमाश्या फुलांमधील मधुरस व पराग गोळा करण्यासाठी हिंडत असतात. या भटकंतीत हवा व खाद्यामधून प्लॅस्टिकचे कण त्यांच्या शरीरात शिरतात. तसेच पाणवठ्यावर सोंडेतून पाणी घेताना त्यांच्या शरीरात पाण्यातून हे कण शिरतात. या प्लॅस्टिकच्या कणांमुळे मधमाश्यांवर होणारे दुष्परिणाम होतात.

मधमाश्यांची रोग प्रतिकारक्षमता घटते. विविध रोगांना लवकर बळी पडतात. त्यामुळे हळूहळू त्यांची संख्या घटत जाते.

मधमाशी हा समूहात एकीने राहणारा समूहप्रिय कीटक आहे. प्लॅस्टिकचे कण शरीरात गेल्याने कामकरी माश्यांचे सामाजिक वर्तन नेहमीसारखे न राहता त्यात बिघाड होतो.

राणीमाशीची प्रजोत्पादन क्षमता कमी होते. याचा परिणाम मधमाश्यांच्या संख्येवर होतो. मधमाश्यांची संख्या घटल्यामुळे वसाहतींची संख्या कमी कमी होत जाते. याचा परिणाम निसर्गातील अन्न साखळीवर होतो.

प्रभावी उपाययोजना

दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर कमी करावा. शक्य तितका पुनर्वापर करावा.

प्लॅस्टिकच्या कचऱ्याची योग्य ठिकाणी योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावावी. हा कचरा गावातील पाणवठे, नद्या, समुद्र वा निसर्गात इतरत्र जाणार नाही याची काळजी घ्यावी.

प्लॅस्टिकला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक उत्पादने विकत घ्यावीत.

मधमाश्यांच्या पोळ्याचा मानवास अडथळा निर्माण झाल्यास ते पोळे रासायनिक पद्धत वापरून काढणे किंवा पिळून काढून टाकणे यासारखे अशास्त्रीय उपाय करू नयेत. ते पोळे मधमाश्यांना न मारता शास्त्रीय पद्धतीने काढून स्थलांतरित करावे.

मधमाश्यांच्या नैसर्गिक अधिवासाची काळजी घ्यावी. या अधिवासात प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध असावेत.

मधमाश्यांच्या वसाहतीस धक्का पोहोचेल असे वर्तन करू नये. उग्र वासाची अत्तरे, परफ्युम, डीओ, रासायनिक साबण, शाम्पू वगैरे लावून पोळ्यातील वसाहतीजवळ जाऊ नये. त्या परिसरात सिगारेट ओढू नये.

priya.phulambrikar@gmail.com

(लेखिका बी बास्केट संस्थेच्या सदस्या आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT