Soil Management
Soil Management Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. पपिता गौरखेडे

Indian Agriculture : जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण पीक पोषणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असते. जमिनीत एकूण अन्नद्रव्य जास्त प्रमाणात असेल तरी ही अन्नद्रव्ये पिकांची मुळे शोषून घेऊ शकतील अशा स्वरूपात असणे गरजेचे असते. याशिवाय हवामान, जमिनीचा प्रकार, पीक पद्धती अशा निरनिराळ्या घटकांमुळे या प्रमाणावर परिणाम होत असतो आणि ते प्रमाण सतत बदलत असते.

म्हणूनच माती परीक्षणाच्या आधारे हे प्रमाण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. माती परीक्षण अहवालानुसार पिकांची गरज लक्षात घेऊन खतांची शिफारशी केल्या जातात. रासायनिक खते, सेंद्रिय खते, हिरवळीची पिके आणि जिवाणू संवर्धकांचा एकात्मिक वापर करून जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादन वाढविता येते. माती परीक्षण अहवालामध्ये सामू,क्षारता,मुक्त चुन्याचे प्रमाण, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, लोह, जस्त, तांबे, बोरॉन व मॅंगेनीज इत्यादीचे प्रमाण नमूद केलेले असते.

सामू

सामू हा सर्वसाधारण प्रमाणे ६.५ ते ७.५ पर्यंत असावा कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जमिनीचा सामू किंचित विम्ल ते अतिशय विम्ल (सामू ७.५ ते ९) प्रकारचा आहे.

सामू ८.५ पेक्षा जास्त असलेल्या अतिविम्ल चोपण जमिनीमध्ये भूसुधारक म्हणून जिप्समचा शेणखतातून वापर करावा.

चुनखडीयुक्त चोपण जमिनीची सुधारणा करताना जिप्सम ऐवजी गंधकाचा शेणखतातून वापर करावा.

सामू ६.५ पेक्षा कमी असल्यास त्याला आम्ल जमिनी म्हणतात. विशेषतः कोकणातील जमिनीचा सामू जास्त आम्लयुक्त असतो.अशा जमिनी सुधारण्यासाठी चुन्याचा शेणखतातून वापर करावा.

क्षारता

प्रमाण निष्कर्ष

६.० पेक्षा कमी आम्लयुक्त जमीन

६ ते ८ सर्वसाधारण जमीन

८ ते ९ विम्ल होण्याच्या मार्गावर

९ पेशा जास्त विम्लयुक्त जमीन

क्षारांचे प्रमाण प्रयोगशाळेत इलेट्रिकल कंडक्टिव्हिटी या उपकरणाद्वारे मोजले जाते. मातीतील विद्युत वाहकता (क्षारता) १.०० डेसी. सी./ मीटर पेक्षा जास्त असेल तर क्षारयुक्त जमीन म्हणतात. अशा जमिनीच्या पृष्ठभागावर विरघळलेल्या क्षारांचा पांढरा थर दिसून येतो. मातीची क्षारता सर्वसाधारपणे ०.१० ते ०.९० डेसी सी/मीटर या दरम्यानच असावी.त्यापेक्षा जास्त असल्यास चर खोदून जमिनीस निचऱ्याची व्यवस्था करावी.

जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. हिरवळीची पिके जमिनीत गाडावीत. चांगल्या प्रतीचे पाणी सिंचनास वापरून अतिरिक्त क्षारांचा निचरा करावा. चांगल्या प्रतीच्या पाण्याची क्षारता ०.५ डेसी सी/ मीटर पेक्षा कमी असते. ही क्षारता २.५डेसी.सी./मीटर पेक्षा जास्त असल्यास असे पाणी सिंचनास अयोग्य समजले जाते.

पाण्याची क्षारता ३.१५ डेसी सी/ मीटर पेक्षा जास्त असल्यास ठिबकसाठी अयोग्य समजले जाते.

सेंद्रिय कर्ब

प्रमाण निष्कर्ष

१.०० पर्यंत सर्वसाधारण

१.०१ ते २.०० पीक व उगवणीस नुकसानकारक

२.०१ ते ३.०० क्षार संवेदनशील, पिकांच्या वाढीस नुकसानकारक

जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे ते पीक उत्पादन आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्माच्या संवर्धनाच्या दृष्टीने चांगले असते.

सेंद्रिय कर्बाची टक्केवारी शोधल्यास जमिनीतील एकूण नत्राच्या प्रमाणाचाही अंदाज लागतो. सर्व वनस्पती, प्राणी आणि जिवाणूंचे कुजलेले आणि कुजलेले जमिनीतील अवशेष म्हणजेच सेंद्रिय द्रव्य होय. जमिनीतील एकूण सेंद्रिय द्रव्यामध्ये वनस्पतीचे अवशेष जास्त आढळतात.

सेंद्रिय द्रव्यात जवळपास ५८ टक्के कार्बन असतो. सेंद्रिय द्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक मूलद्रव्याच्या साठवणीचे केंद्र असल्यामुळे जमिनीच्या उत्पादकतेचा निर्देशांक आहे.

सेंद्रिय द्रव्य धन आयन विनिमय क्षमता वाढविण्यासाठी, जमिनीची योग्य रचना राहण्यासाठी, जमिनीत ओलावा आणि हवेचे सुयोग्य प्रमाण राखण्यासाठी उपयुक्त असते. जमिनीत मिसळलेल्या सेंद्रिय द्रव्याचे सूक्ष्म जिवांमुळे सतत विघटन होत असते.

जमिनीमधील सेंद्रिय कर्बाची सर्वसाधारण मर्यादा ०.४० ते०.६० टक्के योग्य मानली जाते. अशा जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असतात. या जमिनीत पिकांची पोषण क्षमता योग्य असते. जमीन निरोगी

राहण्यास मदत होते. त्यामुळे शेतीमध्ये शेणखत, कंपोस्ट व इतर सेंद्रिय पदार्थाचा वापर फायदेशीर असतो.

डॉ. पपिता गौरखेडे

८००७७४५६६६

(मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT