Nutrient Management : ठिबक सिंचनाद्वारे खोडवा उसाचे पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन

Sugarcane Management : सुधारित तंत्रज्ञान वापराच्या अभावामुळे खोडव्याची उत्पादकता लागण पिकाच्या तुलनेत सरासरीने २५ ते ३० टक्के कमी मिळते. म्हणूनच खोडवा पिकाची दर हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापण महत्त्वाचे आहे.
Sugarcane management
Sugarcane managementAgrowon

Drip Irrigation of Sugarcane Management : राज्याची सरासरी ऊस उत्पादकता ७५ ते ८० टन प्रति हेक्टरी आहे. मात्र खोडवा पिकाकडे होत असलेले दुर्लक्ष आणि सुधारित तंत्रज्ञान वापराच्या अभावामुळे खोडव्याची उत्पादकता लागण पिकाच्या तुलनेत सरासरीने २५ ते ३० टक्के कमी मिळते. म्हणूनच खोडवा पिकाची दर हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापण महत्त्वाचे आहे.

या वर्षी साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्यापासून गळितासाठी फेब्रुवारी, मार्चपर्यंत ऊस तुटणार आहे. मात्र खोडव्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी फेब्रुवारी अखेर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा.

को ८६०३२, कोएम ०२६५, व्हीएसआय ८००५, कोएम १०००१ या जातींचा खोडवा चांगला येतो. खोडव्यामध्ये पाचटाचा वापर योग्य पद्धतीने करावा. ऊस तुटत असताना पाचट जिथल्या तिथे पडू द्यावे. ऊस तुटल्यानंतर बुडख्यावरील सर्व पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावेत, जेणे करून त्यास सूर्यप्रकाश मिळून कोंब जोरदार येतील.

शेतात पसरलेल्या पाचटावर एकरी ५० किलो युरिया, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर टाकावे आणि १ किलो पाचट कुजविणारे जिवाणू २०० लिटर पाण्यातून पाचटावर फवारावेत. उसाच्या पाचटात ३९ ते ४६ टक्का सेंद्रिय कर्ब, ०.३३ ते ०.४४ टक्का नत्र, ०.२ टक्का स्फुरद आणि ०.६ टक्का पालाश असते.

खोडवा पिकास चांगला फुटवा येण्यासाठी लागण उसाची तोड जमिनीलगत करावी. पाचट आच्छादन केल्यानंतर सर्व बुडखे जमिनीलगत तासून घ्यावेत. बुडख्यावर १०० मिलि कार्बेन्डाझिम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खोडवा पिकात १.५ फुटांपेक्षा जास्त अंतरावरील तुटाळ भरून घेण्यासाठी प्लॅस्टिक पिशवीमधील किंवा ट्रेमधील ३० ते ३५ दिवस वयाच्या रोपांचा वापर करावा.

खोडवा पिकात कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची म्हणजेच जारव्हा तोडणे, बगला फोडणे याची गरज नाही. पाचट आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी होतो.

Sugarcane management
Sugarcane Maharashtra : ऊस गाळपात महाराष्ट्र आघाडीवर, देशातील साखर उत्पादन घटलं

ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन

आवश्यकतेप्रमाणे हवे तेवढेच पाणी मुळाशी दिल्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.

५० ते ५५ टक्के पाण्याची बचत होते. उपलब्ध पाण्यात ठिबकद्वारे दुप्पट क्षेत्र सिंचित करणे शक्य होते.

मुळाच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे संतुलित प्रमाण पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीत राखले गेल्याने उत्पादन ३० ते ३५ टक्यांनी वाढते.

नत्र व पालाशसाठी अनुक्रमे युरिया व पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश या पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा आणि स्फुरदासाठी फॉस्फोरिक आम्ल किंवा मोनो अमोनिअम फॉस्फेटचा वापर ठिबकद्वारे मुळाच्या कार्यक्षेत्रात केल्याने खतांच्या मात्रेत ३० टक्के बचत होते.

तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन तणनाशक, खुरपणीचा खर्च वाचतो.

पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन

नोव्हेंबरपासून फेब्रुवारी अखेर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवला जातो. हे पीक कमीत कमी १२ महिने शेतात उभे असते. खोडव्याच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत मुळांशी अपेक्षित पाणी, अन्न आणि हवा याचे संतुलित प्रमाण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. खोडवा उसासाठी पाणी व्यवस्थापन करताना शरीरक्रियाशास्त्रातील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे जरुरीचे आहे.

खोडव्याला अति पाणी हे ऊस तसेच साखरेचे उत्पादन घटवते. सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण उसाचे उत्पादन वाढविते.

फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते, फुटवे कमी निघतात.

उसाची उंची तसेच कांड्याची लांबी वाढणे फार जरुरीचे आहे कारण याच्यात साखर साठवली जाते. उसाचे वजन वाढते.

ऊस तोडण्याच्या अगोदर १५ ते २० दिवस पाणी देणे थांबविल्यास साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

ठिबक सिंचनाखाली पिकाची पाण्याची गरज

खोडवा उसाची पाण्याची गरज काढण्यासाठी सूत्र ः

ईटीसी = ईटीओ × केसी

ईटीओ = पीई × के पॅन

जिथे,

ईटीसी = पिकाची पाण्याची गरज (मिमी /दिन)

ईटीओ = संदर्भीय बाष्पोत्सर्जन (मिमी /दिन)

केसी = पीक गुणांक (क्रॉप कोईफिसेंट)

पीई = उघड्या यूएस क्लास ए पॅनमधील बाष्पीभवन (मिमी /दिन)

के पॅन = पॅन कोईफिशंट (याची किंमत सरासरी ०.८ पकडली जाते)

पीक गुणांकाची (क्रॉप कोईफिशंट) किंमत ही पिकाच्या वयोमानानुसार म्हणजे वाढीच्या

अवस्थेवर अवलंबून असते. खोडवा ठेवल्यानंतर पीक गुणांकाच्या किमती खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे बदलतात.

वाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांक

खोडवा पिकाचे वय (दिवस) वाढीची अवस्था पीक गुणांक

०-६० फुटवे फुटण्याचा कालावधी ०.५-०.६

६-१२० फुटवे ते कांड्या सुरू होईपर्यंत ०.८-१.०

१२१-३०० जोमदार वाढीची अवस्था १.०-१.१

३०१-३७० पक्वतेचा कालावधी ०.७५-०.८

उसाचे जमिनीच्या खोलीनुसार पाण्याचे शोषण

जमिनीची खोली (सेंमी) पाण्याचे शोषण (टक्के)

०-२० ६२.०

२०-४० २३.४

४०-६० ८.८

६०-८० ४.४

८०-१०० १.४

Sugarcane management
Sugarcane Nutrient Management : पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

खोडवा उसाची ठिबक सिंचनाखाली महिनावर पाण्याची गरज

महिना खोडवा ठेवल्या-नंतरचे दिवस पीई (मिमि/ दिन) के पॅन पीक गुणांक ईटीसी (दर दिवशी पाण्याची गरज (लि./ दिन/ एकर) महिन्यासाठी एकूण पाण्याची गरज (लि.) दर दिवशी ठिबक चालविण्याचा कालावधी (मिनिटे)

जानेवारी ३० ४.५ ०.८ ०.४ ६,४०० १,९२,००० ३५

फेब्रुवारी ६० ५.५ ०.८ ०.४ ७,८२० २,३४,६०० ४५

मार्च ९० ६.५ ०.८ ०.७ १६,१८० ४,८५,४०० ९०

एप्रिल १२० ७.५ ०.८ १.० २६,६७० ८,००,१०० १५०

मे १५० ८.५ ०.८ १.१ ३३,२४५ ९,९७,३५० १८५

जून १८० ७ ०.८ १.१ २७,३८० ८,२१,४०० १५५

जुलै २१० ६ ०.८ १.१ २३,४७० ७,०४,१०० १३०

ऑगस्ट २४० ६.५ ०.८ १.१ २५,४२० ७,६२,६०० १४०

सप्टेंबर २७० ६ ०.८ १.१ २३,४७० ७,०४,१०० १३०

ऑक्टोबर ३०० ७.५ ०.८ ०.९ २४,००० ७,२०,००० १३५

नोव्हेंबर ३३० ६ ०.८ ०.८५ १८,१३० ५,४३,९०० १००

डिसेंबर ३६० ५ ०.८ ०.८ १४,२२० ४,२६,६०० ८०

एकूण पाण्याची गरज ७३,९२, १५० लिटर = ७३९२.१५ क्युबीक मीटर परिणामकारक पाऊस वजा जाता पाण्याची प्रति एकरी गरज

= ५८.९२,१५० लिटर.

= ५८९२ क्यूबिक मीटर

(टीप : आपापल्या भागातील बाष्पीभवनानुसार पाण्याची गरज बदलते.)

ठिबक सिंचनातून पाण्याबरोबर खते दिली असता होणारे फायदे

जमिनीतील ओलित क्षेत्र आणि कार्यक्षम मुळांजवळ अन्नद्रव्ये दिल्याने उपलब्धता वाढते. दिलेल्या खतांचा पिकाच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर होतो.

फक्त ओलितामध्ये कार्यक्षम मुळांभोवती खते दिल्याने झिरपण्याद्वारे, निचऱ्यावाटे किंवा बाष्पीभवनाद्वारे खतांचे होणारे नुकसान कमी होऊन खत मात्रेत बचत होते.

मृदा द्रावणात अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित राखणे शक्य होते.

खते देण्याच्या मजुरी खर्च आणि ऊर्जेत बचत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com