Modi Guarantee 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Income : दुप्पट उत्पन्नाच्या ‘गॅरंटी’ला बगल

Modi Guarantee 2024 : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे आश्‍वासन भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते. त्यावरून शेतकरी आणि विरोधी पक्ष प्रश्‍न विचारत असताना भाजपने दुप्पट उत्पन्नाच्या ‘गॅरंटी’ला बगल दिली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे आश्‍वासन भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते. त्यावरून शेतकरी आणि विरोधी पक्ष प्रश्‍न विचारत असताना भाजपने दुप्पट उत्पन्नाच्या ‘गॅरंटी’ला बगल दिली आहे. सुरू असलेल्या योजनांच्या बळकटीकरणाचेच आश्‍वासन देण्यात आले आहे.

पीएम किसानचा लाभ सर्व शेतकऱ्यांना, आयात निर्यातीला प्रोत्साहन, आयात कमी करण्यासाठी केंद्रीय व्यवस्था आदी आश्‍वासने भाजपने दिली होती. मात्र कांदा, सोयाबीन आणि कापूस आयात निर्यातीचे धोरण गेल्या पाच वर्षांत धरसोडीचे राहिल्यानंतर या कळीच्या मुद्द्यांकडेही या वेळी दुर्लक्ष करण्यात आले आहे.

२०१९ ला दुसऱ्यांदा लोकसभेला सामोरे जाताना भाजपने शेतकऱ्यांना २९ आश्‍वासने दिली होती. यात मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध योजनांचे आश्‍वासन दिले होते. दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची व्याप्ती वाढवून देशातील सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू केली जाईल.

सीमांत शेतकऱ्यांसाठी वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन योजना सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. २०२४ च्या संकल्प पत्रात ‘पीएम किसान’ योजनेअंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक वित्तीय साह्य आम्ही देत आहोत, हे यापुढेही सुरू ठेवू, असे सांगितले आहे.

२०१९ च्या संकल्प पत्रात भाजपने जैविक शेतीला प्राधान्य देऊ, २० लाख हेक्टर शेती रसायनमुक्त करू, असे आश्‍वासन दिले होते. या निवडणुकीत मात्र प्राकृतिक शेतीसाठी राष्ट्रीय मिशन सुरू करू. या अंतर्गत फायद्याची शेती, पर्यावरण रक्षण आणि पोषण सुरक्षाही निश्‍चित केली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे.

पीकविम्यातील त्रुटींकडे पूर्ण दुर्लक्ष

कृषी उत्पादकता वाढीसाठी २५ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येईल, पाच वर्षांपर्यंत शून्य टक्का दराने एक लाखाचे कर्ज, पीकविम्यातील जोखीम कमी करून विमा मिळेल तसेच या योजनेची नोंदणी ऐच्छिक करू, असेही सांगण्यात आले होते.

यंदाच्या संकल्प पत्रात पीकविम्यातील त्रुटींकडे पूर्ण दुर्लक्ष करून नुकसानीचे तत्काळ आणि योग्य मूल्यांकन केले जाईल. तसेच त्याची भरपाई निश्‍चितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू, असे आश्‍वासन दिले आहे.

धरसोडीचे आयात-निर्यात धोरण

शेतीमालाची आयात कमी करण्यासाठी, निर्यातीसाठी ठोस धोरण तयार करण्यासाठी सरकार काम करेल, कृषी उत्पादन वाढवून आयात कमी करण्यावर भर देऊ, असे आश्वासन २०१९ च्या संकल्प पत्रात भाजपने दिले होते. वास्तविक, सरकारने कापूस, सोयाबीन, साखर आणि कांदा यांच्या निर्यातीत धरसोडीचे धोरण स्वीकारले.

कांदा निर्यात बंदी लागू केल्याने बाजारात कांद्याचे दर पडले आहेत. शहरी ग्राहकाला खूश करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला गेला. सरकारच्या या धोरणावर डाव्या पक्षांसह प्रमुख विरोधी पक्षांनीही प्रहार केले. काँग्रेसने ‘एमएसपी’चा कायदा करू असे आश्वासन दिले असताना भाजपने मात्र, यापुढेही कालबद्धरित्या ‘एमएसपी’त वाढ केली जाईल, असे आश्‍वासन यंदा दिले आहे.

देशात २५.५ लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढल्याचा दावा

गेल्या पाच वर्षांत पीएम कृषी सिंचन योजनेअंर्तगत देशभरात २५.५ लाख हेक्टरवरील सिंचन क्षमतेत वाढ झाल्याचा दावा भाजपच्या संकल्पपत्रात केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही सिंचन क्षमतेचा विस्तार करू, असे आश्‍वासन दिले आहे.

२०२९ च्या संकल्पपत्रात एक कोटी हेक्टरवरील शेतजमीन ओलिताखाली आणू, असे आश्‍वासन भाजपने दिले. २०१९ च्या जाहीरनाम्यात भाजपने ‘हर घर जल’ अशी टॅगलाइन घेत पिण्याच्या पाण्याचा वायदा केला होता. यासाठी जलजीवन मिशन योजना आणली आणि गावोगावी पुढील ३० वर्षांचा आराखडा तयार करून योजना राबविली.

मात्र या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. अनेक ठिकाणी जुन्या पाइपलाइनला नव्या योजनेचे पाइप जोडत योजना पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. काही जिल्ह्यांमध्ये या योजनेची चौकशी सुरू असून, अद्याप या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेल्या नाहीत.

या शिवाय २०२२ पर्यंत प्रत्येक कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला पक्के घर देऊ, असे आश्‍वासन दिले होते. मात्र आता भाजपने मजुरी करणाऱ्या कुटुंबाला घर मिळाल्याचा निरोप देत असलेली जाहिरात सुरू केली आहे.

भाजपची २०२४ ची आश्‍वासने...

वातावरणीय बदलाची जुळवून घेणाऱ्या पारंपरिक बियाण्यांच्या वापराला प्रोत्साहन

२५ हजार कस्टम हायरिंग केंद्रांची स्थापना

शेतकऱ्यांना डिजिटल सुविधा देण्यासाठी केव्हीके अपग्रेड करू

केव्हीकेंना कौशल्य विकासाच्या वन स्टॉप सेंटरमध्ये अपग्रेड करणार

शेतजमीन सुपीक बनविण्यासाठी नॅनो युरियाचा वापर आणि त्याचा विस्तार करणार

चारा बँक, दूध परीक्षण प्रयोगशाळा, बल्क मिल्क कुलर आणि दूध प्रक्रिया सुविधेबरोबरच सहकारी दूध संस्थांचा विस्तार

देशी प्राण्यांच्या प्रजातींचे संरक्षण, त्यांची उत्पादकता वाढविणार

सहकार अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय सहकार धोरण लागू करू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT