Pune News : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला प्रति लिटर ४० रूपये भाव द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोडांला ३० रूपये भाव आणि ५ रूपये अनुदान देऊन पाने पुसली आहेत. यावरून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. रविवारी संघर्ष समितीची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्यभरातील ४७ प्रमुख नेते, कार्यकर्ते व विचारवंतांनी सहभाग नोंदवला. यानंतर नवले यांनी ही माहिती दिली.
दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे अशी प्रमुख मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सरकारकडे चर्चेतून विषय ही मांडण्यात आला आहे. मात्र दूध आंदोलनाच्या पहिलाय टप्प्यातील चर्चेच्या तीन बैठका व्यर्थ गेल्या. त्यामुळेच आता दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. तर हा टप्पा १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान आयोजित आहे. या आठवडाभराच्या कालावधीमध्ये राज्यभर स्थानिक पातळीवर तीव्र आंदोलने करण्याची हाक संघर्ष समितीने दिल्याचे नवले म्हणाले.
राज्यभर सुरू असलेल्या दूध आंदोलनामध्ये मागण्यांच्या पातळीवर व कृतीच्या पातळीवर समन्वय साधण्याचे काम दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू आहे. संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये आजवर झालेल्या आंदोलनांचा आढावा घेऊन आगामी काळात करावयाच्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा नववा दिवस असूनही या आंदोलनाकडे सरकारने हेतूतः दुर्लक्ष केल्याची टीका नवले यांनी केली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रालय स्तरीय बैठकीत सुद्धा दूध उत्पादकांच्या मागण्या फेटाळून लावण्यात आल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर दिनांक १५ जुलै ते २१ जुलै या कालावधीमध्ये संघर्ष समिती सहभागी असणाऱ्या संघटना, नेते आणि कार्यकर्ते स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या आंदोलनांना चालना देणार आहेत. धरणे आंदोलने, दुग्धाभिषेक, दूध हंडी, दूध परिषदा, मोटार सायकल रॅली, पायी दिंडी, निदर्शने, लोकप्रतिनिधींच्या भेटी, लाक्षणिक उपोषणे व रास्ता रोकोच्या माध्यमातून सबंध आठवडाभर ठिकठिकाणी आपल्या मागण्यांकडे दूध उत्पादक सरकारचे लक्ष वेधतील.
तर संपूर्ण आठवडाभर तीव्र आंदोलने करूनही सरकारने जर मागण्यांची दखल घेतली नाही. तर सर्व राज्यभरातील ताकद एकत्र करून जबरदस्त आंदोलन उभारण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
बैठकीसाठी उमेश देशमुख, इंजिनीयर सतीश देशमुख, ऍड. अजित काळे, दादासाहेब कुंजीर, ज्योतीराम जाधव, अशोक ढगे, रामनाथ वदक, राजकुमार झोरी, दीपक अण्णा काटे, केशव जंजाळे, ऍड. श्रीकांत करे, दत्ता ढगे, आप्पा अनारसे, दीपक वाळे, ऍड.अतुल पवार, जयराम खडके, संतोष रोहम, दत्तात्रय कड, कृष्णा घुगरे, सदाशिव साबळे, नंदू रोकडे, निलेश तळेकर, रवींद्र हासे, रवींद्र पवार, पंकज पडवळ, दीपक पानसरे, ज्ञानेश काळे, माणिकराव अवघडे, दादा गाढवे, महेश जेधे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.