Sugar Commissionarate  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Commissionerate : चौपन्न दिवसांनंतर पुन्हा नवे साखर आयुक्त येणार

Sugar Commissioner : राज्याच्या साखर आयुक्तपदाची सूत्रे अनिल कवडे बुधवारी (ता. ७) स्वीकारण्याची शक्यता आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्याच्या साखर आयुक्तपदाची सूत्रे अनिल कवडे बुधवारी (ता. ७) स्वीकारण्याची शक्यता आहे. ते याच वर्षी निवृत्त होत असल्यामुळे केवळ ५४ दिवसांनंतर शासनाला पुन्हा नवा साखर आयुक्त शोधावा लागणार आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००३ मधील तुकडीतील श्री. कवडे कृषी पदवीधर आहेत. ते नोंदणी महानिरीक्षक व मुंद्राक नियंत्रक म्हणून ते पुण्यात कार्यरत होते. मात्र तत्कालीन सहकार आयुक्त सतीश सोनी यांची २०२० मध्ये उचलबांगडी केली गेली व श्री. कवडे यांच्याकडे सहकार आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार सोपविला गेला होता. त्यानंतर याच पदावर त्यांची कायम नियुक्ती केली गेली.

‘‘श्री. कवडे यांनी सहकार आयुक्तालयाचा कारभार समन्वयाने चालविला. या पदावरील त्यांचा सेवाकाल संपुष्टात आल्यामुळे त्यांची बदली होणे क्रमप्राप्त होते. सहकारातील प्रशासनाचा दांडगा अनुभव लक्षात घेता साखर आयुक्तपदी श्री. कवडे यांची नियुक्ती झाली आहे. तथापि, ते येत्या ३१ मार्च रोजी निवृत्त होतील. त्यामुळे अवघ्या ५४ दिवसांचा कालावधी श्री. कवडे यांना मिळणार आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, आधीचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची केवळ आठ महिन्यांत बदली झाल्यामुळे साखर उद्योगात आश्‍चर्य व्यक्त केले. साखर आयुक्त होण्यापूर्वी ते नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते.

परंतु तेथे पदाधिकारी व प्रशासनात मतभेद झाल्यामुळे डॉ. पुलकुंडवार यांनी स्वतःहून बदलीची मागणी शासनाकडे केली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, डॉ. पुलकुंडवार यांची अचानक बदली होण्यामागे इतर कोणतेही कारण नसून त्यांना केवळ पदोन्नतीमुळे साखर आयुक्तपद सोडावे लागले आहे.

त्यांना सचिव श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे. त्यांची पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली असून, त्यांनी सौरभ राव यांच्याकडून मंगळवारी (ता. ६) पदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. पुलकुंडवार हे २००८ च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील आहेत. महसूल, भूमी अधिग्रहण आणि मंत्रालयातील प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. ते काही काळ तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या खासगी सचिवपदी कार्यरत होते.

राव आज पदभार स्वीकारणार

मावळते विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून सहकार आयुक्तपदाची सूत्रे बुधवारी (ता. ७) स्वीकारली जाण्याची शक्यता आहे. श्री. कवडे यांना मुंबईतील तातडीच्या बैठकीला जावे लागले. त्यामुळे कवडे यांच्याकडून राव यांना पद हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मंगळवारी (ता. ६) पूर्ण होऊ शकली नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. नवे सहकार आयुक्त श्री. राव यांना भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्तुळात हुशार व संयमी अधिकारी म्हणून ओळखले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT