Saint Tukaram Maharaj Agrowon
ॲग्रो विशेष

Saint Tukaram Maharaj Abhang : अमृत ते काय, गोड आम्हापुढे...

Article by Arun Chavhal : ‘संत’ ही तुकाराम महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची वृत्ती आहे. कारण संतपणा सिद्ध करण्यासाठी त्यांनी जीवन पणाला लावले. आज संत तुकाराम बीज. त्यानिमित्य संतकवी तुकाराम महाराजांचे विविधांगी आकलन करण्याचा हा प्रयत्न...

अरुण चव्हाळ 

अरुण चव्हाळ

७७७५८४१४२४

आपली मौखिक परंपरा आणि श्रवण भक्तीच्या जोरावर संतकवी तुकाराम महाराजांचे अभंग जनमानसाच्या मनामनांत कोरलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या भाषेचा जिव्हाळा सर्वांना आपलेसे करतो. ‘अक्षरांचा श्रम केला। फळा आला तेणे तो।।’ या अनुभवाने आपण सावध होतो. ‘जाणे त्याचे वर्म। नेणे त्याचे कर्म।।’ या आविष्काराने आत्मोन्नतीचा अभिजात जीवनमार्ग उजळतो.

आपल्यासारखेच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकून मोहरून जायचे आणि त्यांच्या डोळ्यांत गंगा - यमुनाही अवतरायच्या. तुकारामांनी अभंगातून जेवढ्या भावना संवेदनशील केल्या, तेवढ्याच ताकदीने शब्दांच्या रोखठोक मांडणीने आपले शब्दवैभव अजरामर करून ठेवलेले आहे.

‘पराविया नारी, रखुमाई समान।

हे गेले नेमून, ठायीचे चि।।

जाई वो तू माते, न करी सायास।

आम्ही विष्णुदास, नव्हो तैसे।।’

या अभंगावरून ध्यानात येते, की परकी (बाई) रखुमाई मानण्याचे धाडस आणि धाक चक्रधरांनंतर तुकारामांचाच आहे. स्त्री स्वातंत्र्य चक्रधरांनी मानले आणि स्त्री स्वातंत्र्य व समानता तुकारामांनी अधोरेखित केली.

संत तुकाराम महाराज जगले बेचाळीस वर्षे (१६०८ - १६५०). अन् काळोन् काळ शब्दांचे सामर्थ्य घेऊन जगातला कोणताही विचारी मानव त्यांच्या विचार शक्तीवर समृद्ध होत आहे. शुद्ध विचारांनी महाकवी प्रकटले आणि मराठी भाषेची खरीखुरी प्रगती झाली. ‘संत’ ही तुकाराम महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची वृत्ती आहे. कारण संतपणा सिद्ध करण्यासाठी त्यांनी जीवन पणाला लावले.

कनकाई आणि बोल्होबा या मातापित्यांच्या पोटी तुकारामांचा जन्म झाला. वयाच्या १३ व्या वर्षांपासून तुकाराम महाराज घर-शेती-दुकान-सावकारी करू लागले. त्यांच्या वयाच्या १७ व्या वर्षी त्यांच्या आईवडिलांनी जगाचा ‘कायमचा रामराम’ घेतला. जबाबदारी आणि दुःख पेलताना त्यांचे रुखमाबाई यांच्याशी लग्न लागले. त्यांना संताजी नावाचा एक मुलगाही होता. रुखमाबाईस दम्याचा आजार झाला म्हणून त्यांचे जिजा ऊर्फ आऊली यांच्याबरोबर दुसरे लग्न झाले.

या नोंदी आजच्या झटपट कीर्तनकारांनी नीट अभ्यासल्या पाहिजेत. अनुबंध आणि अन्वयार्थ याची सांगड प्रमाणभूत असावी. कीर्तनाचे बोल प्रभावी आणि परिणामकारक असतात. सर्वसामान्य ते काळजाने ऐकतात. म्हणून नेमके व अचूक शब्दवर्णन असावे. हे सांगताना हेही ध्यानात घ्यावे, की अशातच १६२९-१६३० या दोन वर्षांत त्यांच्या भागात दुष्काळ पडला. आईवडिलांचे जाणे, पत्नीचे दुःख आणि दुष्काळ यापेक्षा साहित्य निर्मिती म्हणजेच संतकवी होणे हे शाश्‍वत होण्यासाठी त्यांनी घर-शेती-दुकान-सावकारीवर पाणी सोडले. यामुळे त्यांचा चिरंतन कवितेचा भवसागर डबडबणारा आहे.

तुकारामांचे अभंग कष्टकरी माणसांसाठी भरभक्कम आधार आहेत. रानात मोलमजुरी करून सन्मानाने आणि समाधानाने जीवन जगणाऱ्या त्रिवेणीबाई मी रोज पाहतो. एकदा त्यांना विचारले, ‘‘उतार वयात काम करण्याची एवढी ऊर्जा कोठून आली?’’ त्या म्हणाल्या, ‘‘इमानदारीने राबायचे अन् तुकारामांचे अभंग गायचे. कष्ट हलके होतात.’’ त्यांनी तुकारामांचा एक अभंग जसा येतो तसा गाऊन दाखवला.

‘‘आवडेल तैसे, तुज आळवीन।

वाटे समाधान, जीवा तैसे।।

नाही येथे काही, लौकिकाची चाड।

तुजविण गोड, देवराया।।

पुरवी मनोरथ, अंतरीचे आर्त।

धायेवरि गीत, गाई तुझे।।

तुका म्हणे लेकी, आळवी माहेरा।

गाऊ या संसारा, तुज तैसे।।’’

हे असे त्रिवेणीबाई यांच्यासारख्या असंख्य जनसामान्यांच्या ओठांवर तुकारामांचे अभंग असणे, हेच कवीचे अलौकिक रूप आहे. जी माणसं सदैव आजही व्यवहारात शुद्धपणा जपतात, त्याचे कारणही तुकारामांचे अभंग आहेत. सूर्यकांतराव आजही म्हातारपणात रानात राबतात. तीन मुले आणि एका लेकीचा नेकीने समृद्ध संसार उभा करून दिल्यावर त्यांचा दृढ विश्‍वास पांडुरंगावर आणि तुकाराम महाराजांच्या विचारांवर आहे. ते म्हणाले,

‘शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी।

मुखी अमृताची वाणी, देह वेचावा कारणी।।

सर्वांगी निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ।

तुका म्हणे जाती, पाप दर्शने विश्रांती।।’

सूर्यकांतरावांचे हे म्हणणे पटण्यासारखेच आहे. तुकारामांचे हे सांगणे आपल्यासाठी युगांतरांचे आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने असे काही वेचक आणि वेधक विचार जपतो. तुकारामांनी कडक शब्दांमध्ये सांगितलेलेही महत्त्वाचे आहे.

‘मायबापाहूनि, बहु मायावंत।

करू घातपात, शत्रूहूनि।।

अमृत ते काय, गोड आम्हापुढे।

विष ते बापुडे, कडू किती।।

तुका म्हणे आम्ही, अवघेचि गोड।

ज्याचे पुरे कोड, त्याचे परी।।’

या अभंगाचा आपण अर्थ पाहू लागलो, तर दोन्ही गोष्टी आपल्याला कळतात. तुमच्या माय-बापापेक्षा खूप माया करू. पण तुम्ही नीट राहिला तर, नाहीतर शत्रूसारखा वार करू. अमृताची गोडी आमच्या पुढे काय? विष कडू असले तरी ते आमच्यापुढे बापुडे (चिल्लर) आहे. पण सरतेशेवटी ते सांगतात, आम्ही सर्वांगाने गोडच आहोत, जी माणसं चांगली आहेत त्यांचे लाडकौतुक करू. हे त्यांचे सांगणे म्हणजे, ठाकून ठोकून मढविलेल्या दागिन्यासारखेच आहे. अनेक गुणिजन त्यांच्यासारखे आहेत. त्यांचे विचार त्यामुळे अनेक जण अंगीकारतात. समाज अबाधित राहतो.

तुकाराम महाराजांनी त्या काळातील राजेशाही (मोगल आणि बहामनी) आणि सनातनी धार्मिक आक्रमणे भेदून अभंग प्रसवले. कुणब्याची बोलीभाषा त्यांनी श्रेष्ठ मानली.

‘बरा कुणबी केलो। नाही तरि दंभेचि असतो मेलो।।’

हे भाषेचे श्रेष्ठत्व जगात भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.

‘दुसरी माझी ओवी, दुजे नाही कोठे।

जनी वनी भेटे, पांडुरंग।।’

किंवा

‘मढे झाकुनिया, करिती पेरणी।

कुणबियाचे वाणी, लवलाहे।।’

हे तुकारामांचे अभंग जागतिक स्तरावर नैसर्गिक पडणाऱ्या पावसासारखे भावतात.

‘पर्जन्ये पडावे, आपुल्या स्वभावे। आपुल्याला दैवे, पिके भूमि।।’

हे त्यांचे अनुभवाचे बोल रुचतात. आपल्या जीवनात निसर्गाशी एकरूप झाल्याशिवाय जीवन पूर्णत्व नाही, हे आपण स्वतः रानावनात काबाडाचे धनी होऊन कळते. निसर्गाचा सहजपणा व शुद्धता आपल्याला उदात्त करते. मी माझ्या रानमेवा मळ्यात जमीन-वारा-पाणी-ऊन-पिके-पाखरे-कुत्रा-मांजर-बैल यांच्यासोबत शिवारवेड्या आईसोबत जगतो. जगाच्या वाळवंटात जीवनाची हिरवाई, कष्टाचे डोंगर, समाधानाचा साज बंडखोर तुकारामांच्या शब्दांनी गवसतो. जगाच्या साहित्य विश्‍वात संसारी, कवी, कष्टवंत, भक्ती आणि बंडखोरी करणारा इमानदार माणूस म्हणून संतकवी तुकाराम महाराज आहेत. पंचमहाभूते आणि पंचतत्त्व जगणारे व जगवणारे तुकाराम हे जगद्‍गुरू आहेत.

तुकारामांनी जीवनाचे भाष्य एका उत्कट अभंगातून केलेले आहे. तो सर्वांना ज्ञातही आहे.

‘‘याजसाटी केला, होता अट्टाहास।

शेवटाचा दिस, गोड व्हावा।।

आता निश्चितीने, पावलो विसावा।

खुंटलिया धावा, तृष्णेचिया।।

कवतुक वाटे, जालिया वेचाचे।

नाव मंगळाचे, तेणे गुणे।।

तुका म्हणे मुक्ती, परिणिली नोवरी।

आता दिवस चारी-खेळीमेळी।।’’

बंधनाचे पाश सोडून मुक्तीचे जीवन जगण्याकरिता हा अभंग शाश्‍वत आहे. हे जीवनाचे पूर्णत्व आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT