Pune News : राज्याच्या विविध भागात दुष्काळासह पावसाचा फटका बसत आहे. विविध जिल्ह्यात अवकाळी आणि वळवाच्या पावसाने शेतकीसह घरे आणि जनावरांचे नुकसान केले असून जीवितहानीसह मोठी वित्तहानी झाली आहे. दुष्काळाचे टचके देखील अनेक जिल्ह्यांना सोसावे लागत आहेत. यावरून सत्ताधारी गेले कुठे असा सवाल शेतकऱ्यांसह सर्वसामान्य आणि विरोधक करत आहेत. या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यासह सरकारचे यावर बारीक लक्ष असून सध्या आचार संहिता असल्याने तोडगा काढता आलेला नाही असे म्हटले आहे. अजित पवार यांनी हे वक्तव्य सोमवारी (ता.२७) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित बैठकीत केले आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, राज्याच्या विविध भागात सध्या वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले असून विशेत: पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यात कुठे ५ टक्के तर कुठे १० टक्के पाण्याची कपात केली जात आहे. देशात देखील मान्सून पूर्व पाऊस होत असून प.बंगालमध्ये चक्रीवादळ धडकले आहे. याचा परिणाम राज्यात दिसून आला. राज्यात वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले आहेत. कोठे जनावरे दगावली आहेत. तर कोठे जीवितहानी झाली आहे. यासगळ्यावर राज्य सरकारचे बारीक लक्ष असून आमचे लक्ष आहे.
राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि आता वळवाच्या पावसामुळे १० हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून समोर आले आहे. तर रविवारी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केली जात आहेत. तेही पूर्ण होतील असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, राज्याच्या विविध ठिकाणी उद्भवलेल्या पाणीटंचाईच्या झळा उन्हाळी पिकांना बसल्या असून अतोनात नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. अनेक भागात सध्या दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक जिल्ह्यामध्ये टँकरची मागणी वाढली आहे. यावर सातत्याने प्रशासन उपाययोजना करत आहे.
पण आम्ही यावर बैठका घेऊन योग्य ती काळजी घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगत आहोत. मात्र आचार संहिता असल्याने यात काही अडचणी आहेत. याआधी देखील राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडताच आम्ही २१ तारखेला मंत्रालयात दुष्काळाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील देखील उपस्थित होते. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आढावा घेत आहेत. आज सोमवारीच दुष्काळाबासह मान्सून पूर्व तयारीच्या बाबतीत बैठक मंत्रालयात आयोजित होती. मात्र आमच्या या कार्यक्रमामुळे ती मंगळावारी घेण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना करण्यात आली आहे. याप्रमाणे ही बैठक उद्या १२ वाजता होईल असे अजित पवार म्हणाले.
आढावा बैठकांची माहिती देत असतानाच अजित पवार यांनी विरोधकांला टोला लगावताना, आम्ही बैठकांचे फोटो सोशल मिडीयावर टाकत नाही. की टिव्हीवर जाऊन बैठकीत काय झालं हे बोलत नाही असे म्हटले आहे. तर राज्याच्या महत्वपूर्ण विषयावर आमचे लक्ष असून फक्त आचार संहिता असल्याने मर्यादा आल्या आहेत.
लोक प्रतिनिधी असतानाही दुष्काळाबाबत बैठक घेता येत नाही. यावरूनच राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला आचार संहिता काढून न टाकता शिथिल करावी अशी विनंती केली आहे. यामुळे कॅबिनेटची बैठक घेऊन काही निर्णय घेता येतील. पण हा अधिकार निवडणूक आयोगाचा असून ते लवकरच निर्णय घेतली. यानंतर राज्यातील दुष्काळासह अवकाळी आणि वळवाच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई बाबत निर्णय घेता येईल असेही अजित पवार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.