Mumbai : राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्मल दूध मिळावे, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी राज्य शासन गंभीर आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही बुधवारी (ता.१०) उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. दूधभेसळीसंदर्भात विधानसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती सभागृहाला दिली.
दूध भेसळीच्या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन यापूर्वी राज्यसरकारने दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा केला होता. हा कायदा राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, दूध भेसळीच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देणे ही शिक्षा तुलनेने फार मोठी असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाचे मत असावे. त्यामुळे त्यावर अद्याप राष्ट्रपतींची सही झालेली नाही, असे अजित पवार म्हणाले.
दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना निर्मल-भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. याबाबत शासन गंभीर असून त्यासंदर्भात वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, संबंधित मंत्री महोदयांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक घेतली जाईल. दूध भेसळ रोखण्यासाठी विभागाला आवश्यक असणारे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दूध भेसळ रोखण्यासंदर्भातील प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतील, असेही आश्वासन अजित पवार यांनी सभागृहात दिले.
सध्याच्या परिस्थितीत दूध उत्पादकांच्या दुधाला बऱ्यापैकी दर मिळू लागले आहेत. अशावेळी झोपडपट्टी भागामध्ये किंवा इतर अज्ञात ठिकाणी काही व्यक्तींकडून भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जास्त दर असणाऱ्या ब्रॅन्डच्या दूध पिशव्यांमध्ये पाणी मिसळणे, इंजेक्शनने भेसळसारखे गैरप्रकार केले जातात. अशा भेसळयुक्त दुधामुळे आजार बळावतात, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या गोष्टी अतिशय गंभीर असून त्यासंदर्भात अत्यंत कडक भूमिका घेण्याची राज्य शासनाची तयारी आहे. या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला प्रश्न
राज्यात अनेक ठिकाणी दुधात भेसळ होत असल्यावरून आमदार बच्चू कडू यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. तसेच भेसळयुक्त दुधामुळे शेतकरी आणि ग्राहकही मरत आहेत. यावर ठोस कारवाई होत नाही, असे म्हणत खंत व्यक्त केली होती. तर भेसळयुक्त दुधावरून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना धारेवर धरले होते. त्यानंतर सभागृहात अजित पवार यांनी दूधात भेसळ करणाऱ्यांवर 'कडक' कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिलं. तसेच अन्न आणि औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भेसळयुक्त दूध किती जप्त केले? आणि किती दंड करण्यात आला? याची माहिती दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.