Gram Panchayat Election  Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गटाचा दबदबा

Election Update : लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीचा बोलबाला असताना जिल्ह्यातही सत्ताधारी महायुतीने मुसंडी मारली आहे.

Team Agrowon

Nashik News : लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीचा बोलबाला असताना जिल्ह्यातही सत्ताधारी महायुतीने मुसंडी मारली आहे. ४५ पैकी तब्बल २२ ग्रामपंचायतींवर महायुतीने वर्चस्व मिळविले. यातही अजित पवार गटाने सर्वाधिक ११ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले.

त्यापाठोपाठ १५ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन ग्रामपंचायती काबीज करत जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत खाते उघडले. चुरशीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के बसले असून, जनतेने परिवर्तन घडविले. निवडणुकीत मतदारांनी तरुणाईला पसंती दिली असून, सर्वाधिक तरुण उमेदवार विजयी झाले.

जिल्ह्यातील ४८ पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. रविवारी (ता. ५) उर्वरित ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तसेच १५ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्यांच्या रिक्त १८ जागांसाठी मतदान झाले. सोमवारी (ता. ६) सकाळपासून तालुका मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नसल्याने स्थानिक नेतृत्वाची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. ४८ ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर मागील निवडणुकांच्या तुलनेत अनेक ग्रामपंचायतीत परिवर्तन झाले. ४

५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सर्वाधिक ११ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविला. त्याखालोखाल शिंदे गटाने सहा ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली. त्यानंतर भाजप, काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी समसमान प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये आपला झेंडा फडकावला. मनसेने दोन ग्रामपंचायतींमध्ये आपले वर्चस्व राखले. अन्य आठ ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष उमेदवारांचा दबदबा राहिला. इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने तेथील निवडणूक स्थगित करण्यात आली.

येवला तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले. शिरसगाव लौकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, लौकीशिरस ग्रामपंचायत सरपंचपदी प्रदीप कानडे, तर खैरगव्हान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत समाधान सावंत, देविदास पिंगट विजयी झाले.

किती जागांवर कुणाचा दावा ?

एकूण ग्रामपंचायती ४५

भाजप ५

अजित पवार गट ११

शिवसेना (शिंदे गट) ६

काँग्रेस ५

राष्ट्रवादी शरद पवार गट ५

शिवसेना उद्धव ठाकरे गट ५

मनसे २

इतर ८

स्थगित १

इगतपुरीत मनसेची एन्ट्री इगतपुरी तालुक्यात मनसेने खाते उघडले असून, मोगरे ग्रामपंचायतीवर सरपंचपदी मनसेचे प्रताप विठ्ठल जाखेरे विजयी झाले, तर ओंडली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी प्रकाश वाळू खडके विजयी झाले. दौडत ग्रामपंचायतींवर काँग्रेसने बाजी मारली असून, सरपंचपदी पांडू मामा शिंदे विजयी झाले. कृष्णनगर ग्रामपंचायतीवर सरपंचपदी अपक्ष उमेदवार वैशाली सचिन आंबावने विजयी झाल्या.

या विजयाने विद्यमान आमदार हिरामण खोसकर व माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांना धक्का बसला. कुशेगाव ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी झाले असून, एकनाथ गुलाब कातोरे सरपंचपदी विराजमान झाले. लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या सावित्री सोमनाथ जोशी सरपंचपदी विजयी झाल्या. घोटी खुर्द ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी माणिक निवृत्ती बिन्नर विजयी झाले. तर इगतपुरीच्याच टाके घोटी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाची सत्ता आली.

त्र्यंबकेश्वरला संमिश्र प्रतिसाद

त्र्यंबकेश्वरला सर्वच पक्षांना मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला. बहुतांश ग्रामपंचायती ताब्यात घेण्यात काँग्रेसने पुन्हा यश मिळविले. माकपनेही काही जागा जिंकल्या. याशिवाय ठाकरे, शिंदे गटानेही ग्रामपंचायतींत विजय प्राप्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT