Pune News : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी तर दुसरीकडे दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळी सणानिमित्त राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. याबाबत पणन संचालनालयाने आदेश दिले आहेत. याप्रमाणे ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत बाजार समित्या बंद असणार आहेत. यावरून सोलापूर बाजार समिती आणि बीडमधील रेशीम कोष खरेदी मार्केट समितीने शेतकऱ्यांनी आपला शेत माल बाजारात आणू नये, असे आवाहन केले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता एकच दिवस उरला आहे. यामुळे सध्या राज्याच्या विविध मतदार संघात सोमवारी (ता.२८) वसुबारसच्या मुहूर्तावर अर्ज भरण्यासाठी नेते घराबाहेर पडले आहेत. याचदरम्यान दिवाळीनिमित्त तीन दिवस बँकादेखील बंद असणार असून मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय देखील बंद राहणार आहे. यामुळे बँकांसह आर्थिक व्यवहारांशी निगडीत अनेक कामे बुधवारपर्यंत (ता.३०) उरकावी लागणार आहेत.
सोलापूर बाजार समिती कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथे कांद्याची आवक सध्या वाढत असून दररोज सरासरी २०० ते ३०० ट्रक कांद्याची आवक होत आहे. तर मागील पाच दिवसांमध्ये दोन हजार ट्रक कांद्याची आवक येथे झाली आहे. त्याचबरोबर सोयाबीन, उडीद, गूळ, सीताफळ, डाळींब आणि पेरूची देखील आवक चांगली होत आहे. याचदरम्यान आता बाजार समितीतील व्यवहार चार दिवस बंद राहणार आहे.
नरक चतुर्दशी (ता. ३१) लक्ष्मीपूजन (१ नोव्हेंबर) आणि बलिप्रतिपदा म्हणजेच दीपावली पाडवा शनिवारी (२ नोव्हेंबर) असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. शिवाय रविवारी (ता. ३) भाऊबीज असल्याने देखील बाजार समिती बंद असणार आहे. यामुळे बाजार समितीत सर्व व्यवहार बंद राहतील. मात्र अत्यावश्यक सेवेत भाजीपाला येत असल्याने भाजीपाला मार्केट सुरू असेल, अशी माहिती समिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान बाजार समितीतील अनेक दुकाने ही लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्यानिमित्त सुरू असणार आहेत. यावेळी कांदा मार्केटमधील अडते पाडव्याच्या मुहूर्तावर व्यापार करतात. यावेळी मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी माहिती अडते महेश ठेसे यांनी दिली आहे.
दिवाळीनिमित्त चार दिवस बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद असतील. याबाबत व्यापारी आणि आडते संघटनांनी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या काळात आपला शेतमाल घेऊन येऊ नये.- मोहन निंबाळकर, प्रशासक सोलापूर बाजार समिती
बीड रेशीम कोष खरेदी मार्केट पाडव्या दिवशी सुरू
दरम्यान बीडमधील रेशीम कोष खरेदीसाठी प्रसिद्ध असणारे छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीने देखील दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. समितीने, लक्ष्मी पुजन दिवशी बीड रेशीम कोष खरेदी मार्केट बंद राहील. पण बलिप्रतिपदा दिपावली पाडव्याला मार्केट चालू राहील, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिली आहे.
मुद्रांक शुल्क विभागासह बँकाही बंद
तसेच मुद्रांक शुल्क विभागाची कार्यालये देखील बंद राहणार आहेत. यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहारही बंद राहणार असून जागा, जमीन, घर खरेदी- विक्रीचे व्यवहार पुढील दोन दिवसात करावे लागणार आहेत. तर बँकासह बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून (४ नोव्हेंबर) सुरू होईल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.