Beed News : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे उद्यापासून (ता. २१) परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध, विविध आधुनिक उपकरणे, शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांची माहिती खरेदी करता यावे या दृष्टीने महोत्सव महत्त्वाचा व शेतकऱ्यांना लाभदायक असेल. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (ता. २१) दुपारी १२ वाजता केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्र सामुग्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, नवनवीन संशोधन, चर्चासत्रे आयोजित केली आहेत. विविध उत्पादने, पशूंच्या विविध प्रजाती याठिकाणी पाहायला मिळतील. रविवारी (ता. १८) सकाळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांच्या समवेत कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे तसेच कृषी, महसूल, पोलिस अधिकारी आदी उपस्थित होते.
नियोजित जागेची केली पाहणी
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या अधिकाऱ्यांसमवेत कृषी महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या परळी शहरातील बाजार समितीच्या मैदानावर सुरू असलेल्या संपूर्ण तयारीची पाहणी केली. या वेळी मुख्य कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेले शेकडो स्टॉल्स, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा आदी बाबींची पाहणी करून सर्व व्यवस्थापन चोखपणे करण्याचे निर्देश मुंडे यांनी संबंधितांना दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.