Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Team Agrowon

Agriculture :

काजू

फुलोरा ते फळधारणा अवस्था

दोन दिवसांआड परिपक्व काजू बी व बोंडू ची वेचणी करावी. बोंडूपासून वेगळे करून काजू बी स्वच्छ पाण्याने धुवावेत. नंतर ती उन्हामध्ये ३ दिवस वाळवावी. बियांची एकसारखी वाळवण होण्याकरिता दर २ तासांनी बियांची उलटापालट करावी.

तीन दिवस वाळवणी झालेली काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी. काजू बी ची उगवण क्षमता तसेच गरांची प्रत चांगली राखण्याकरिता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लॅस्टिक खोलीमध्ये हवाबंद करून नंतर गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावीत.

फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर फुलकिडींचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीने खरवडल्यामुळे कोवळी पालवी, मोहोराचा देठ, कोवळ्या बिया व बोंडूवरील सालीवर भुरकट रंगाचे चट्टे पडतात. बियांचा आकार वेडावाकडा होतो. बियांची गळ होते.

किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन* (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा ॲसिटामिप्रीड* (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास दुसरी फवारणी ८ ते ९ दिवसांत कीटकनाशक बदलून घ्यावी.(* लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.)

फुलोरा ते फळधारणा अवस्थेत काजूवर मावा आणि ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी मोहोर फुटण्याच्या वेळी, प्रोफेनोफॉस* (५० टक्के प्रवाही) १ मि.लि. फळधारणेच्या वेळी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन* (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा ॲसिटामिप्रीड* (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम.

टीप ः फवारणी सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित करून घ्यावी. (*लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.)

फळधारणा अवस्थेतील काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. किडीची अळी बी व बोंडावरील भाग खरवडून त्याच्यावर आपली उपजीविका करते.या अळीच्या नियंत्रणासाठी, प्रोफेनोफॉस १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाड या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

नारळ

वाढीची ते फळधारणा

सध्या नारळावर रुगोज चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषून घेतात. पानांवर रुगोज चक्राकार माशीचे पांढरे मेणचट तंतू दिसून येतात. ही माशी गोड चिकट स्त्राव पानावर सोडते. त्यावर बुरशीची वाढ होऊन पाने काळी पडलेली दिसतात.

किडीच्या प्रादुर्भावाकडे बागेचे नेहमी निरीक्षण करावे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी माडावर निम तेल (०.५ टक्के) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. त्यानंतर १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या तीन फवारण्या प्रेशर पंपाच्या साहाय्याने कराव्यात. यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होऊन किडींच्या नियंत्रणास मदत होते

नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू शकतात. ते टाळण्यासाठी रोपांना वरून सावली करावी.

नारळाच्या पाच वर्षावरील प्रति माडास ५ किलो निंबोळी पेंड, ७५० ग्रॅम युरिया व ६६७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खताची तिसरी मात्रा बांगडी पद्धतीने द्यावी. वर दिलेली खताची मात्रा पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/५ पट, दुसऱ्या वर्षी अडीचपट, तिसऱ्या वर्षी तीनपट आणि चौथ्या वर्षी चारपट द्यावीत.

याशिवाय झिंक, बोरॉन, मॉलिबेन्डम व कॉपर इ. सूक्ष्म पोषण द्रव्ये २०० ग्रॅम प्रति माड वर्षातून एकदा शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या खताच्या मात्रेसोबत द्यावीत. खते दिल्यानंतर लगेचच माडाला पाणी द्यावे.

सुपारी

फुलोरा ते फळधारणा

कमाल तापमानात वाढ संभवत असल्याने सुपारी बागेस ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

नवीन लागवड केलेल्या सुपारीच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

कलिंगड

फळधारणा

कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत.

फळधारणा अवस्थेत असलेल्या कलिंगड पिकाला २ ते ३ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. फळे काढणीपूर्वी आठवडाभर अगोदर पिकास देणे बंद करावे.

फळांवर टिचकी मारल्यास तयार फळांचा टणटण असा आवाज आल्यास तसेच तयार फळाचा जमिनीलगतचा रंग पिवळसर झाल्यावर आणि देठाजवळील लतातंतू सुकल्यावर फळांची काढणी करावी.

डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
(नोडल ऑफिसर, कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT